पोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदी

डॉ. आर. टी. पाटील
Monday, 25 March 2019

आरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये हे तिन्ही घटक वेगवेगळे खाल्ले जात. मात्र आधुनिक प्रक्रिया पद्धतींमुळे तिन्ही घटकांपासून पेयांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. पेयस्वरूपामध्ये असल्यामुळे ती आबालवृद्धांना सहजतेने खाता येतात. सर्वात महत्त्वाचे पचनशक्ती कमी असण्याच्या स्थितीमध्येही उत्तम रीतीने पचतात. भारतीय बाजारपेठेमध्ये दही, गोड दही (योगर्ट) आणि लस्सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. गेल्या काही वर्षांमध्ये वाढत गेलेल्या मध्यमवर्गामुळे तयार खाद्य पदार्थांच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत आहे.

आरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये हे तिन्ही घटक वेगवेगळे खाल्ले जात. मात्र आधुनिक प्रक्रिया पद्धतींमुळे तिन्ही घटकांपासून पेयांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. पेयस्वरूपामध्ये असल्यामुळे ती आबालवृद्धांना सहजतेने खाता येतात. सर्वात महत्त्वाचे पचनशक्ती कमी असण्याच्या स्थितीमध्येही उत्तम रीतीने पचतात. भारतीय बाजारपेठेमध्ये दही, गोड दही (योगर्ट) आणि लस्सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. गेल्या काही वर्षांमध्ये वाढत गेलेल्या मध्यमवर्गामुळे तयार खाद्य पदार्थांच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच अशा नव्या पदार्थांचा स्वीकारही वाढला आहे. त्यामुळे दूध, फळे आणि भाज्यापासून प्रक्रियेने पेयांची निर्मिती उद्योगासाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. 

स्मुदी म्हणजे काय?
स्मुदी हे कच्च्या भाज्या, फळे आणि काही वेळेस डेअरी उत्पादनांच्या साह्याने तयार केले जाणारे घट्ट, मलईदार पेय आहे. बहुतांश घटक हे बारीक करून थंड स्वरूपामध्ये दिले जातात.  

डेअरी उत्पादनामध्ये दूध, योगर्ट, आइस्क्रीम किंवा पनीर यांचा वापर केला जातो. दुग्धजन्य पदार्थांचा वापर केलेल्या स्मुदी या मिल्कशेकसारखे असू शकतात. मात्र पारंपरिक मिल्कशेकमध्ये फळांचे प्रमाण कमी असून, त्यात आइस्क्रीम किंवा गोठवलेल्या योगर्टचा वापर केला जातो. 

स्मुदीमध्ये वापरले जाणारे अन्य घटक पाणी, बर्फाचा चुरा, फळांचे रस, गोडी आणणारे घटक (मध, साखर, स्टिव्हिया, पाक), व्हे पावडर, वनस्पतिजन्य दूध (उदा. नारळाचे दूध) विविध शेंगा, शेंगदाणे, शेंगदाण्याचे लोणी, सुकामेवा, चहा, चॉकलेट, वनस्पतिजन्य पूरक व पोषक घटक.

स्मुदीची पोषकता ही त्यात वापरलेल्या विविध घटकांच्या प्रमाणानुसार ठरते. अनेक स्मुदींमध्ये आहाराच्या शिफारशीप्रमाणे फळे आणि भाज्यांचे प्रमाण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे एकवेळच्या जेवणाला पर्याय असे त्याचे स्वरूप ठेवले जाते. मात्र फळांच्या रसामध्ये शर्करेचे प्रमाण अधिक असल्यामुळे कॅलरीचे प्रमाण अधिक होण्याचा धोका राहतो. त्याच प्रमाणे स्मुदीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रथिन पावडर, स्वीटनर किंवा आइस्क्रीम यांच्यामुळे स्वाद वाढतो. अशा प्रकारामुळे वजन वाढण्याचा धोका लक्षात घ्यावा लागेल. 

स्मुदीमध्ये सामान्यतः कच्ची फळे, भाज्या यांचा वापर असल्यामुळे त्यात तंतुमय पदार्थांचे (डायटरी फायबर) प्रमाण अधिक असते. गर, काही फळांच्या खाद्य साली, बिया यांचा प्राधान्याने वापर केला जातो. त्यामुळे स्मुदीही नुसत्या फळांच्या रसापेक्षा अधिक घट्ट होते. 

ग्रीन स्मुदीमध्ये प्रामुख्याने ४० ते ५० टक्के हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्यात पालक, कोथिंबीर, सेलेरी, पार्सेली, ब्रोकोली यांचा समावेश असतो. उर्वरित भाग हा फळांच्या गराने भरून काढला जातो. या प्रकाराकडे आरोग्याप्रति जागरूक असलेल्या लोकांचा मोठा ओढा आहे. कच्च्या भाज्या या अनेक वेळा तुरट, कडवट लागू शकतात. मात्र स्मुदीमध्ये कडवट नसलेल्या भाज्यांसह काही फळे (उदा. केळी) स्वाद आणि उत्तम पोत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 

स्मुदींचे विविध प्रकार हे भारतीय, मध्य पूर्वेतील आहारामध्ये घेतले जातात. उदा. पश्चिम आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये लोकप्रिय असलेले फळांचे सरबत. यात काही वेळा योगर्ट आणि मध यांचाही वापर होतो. भारतामध्ये लस्सी किंवा मिल्कशेक हा एक स्मुदीचाच प्रकार आहे. त्यात अलीकडे बर्फाचा चुरा, योगर्ट, साखर आणि आंबा गर यांचा समावेश केला जातो. दक्षिणेमध्ये अननसाच्या स्मुदीमध्ये बर्फाचा चुरा, साखर अत्यंत लोकप्रिय आहेत. यात योगर्ट वापरले जात नाही.

स्मुदीसाठी पाऊच पॅकिंग
जगभरामध्ये स्मुदीच्या पॅकिंगसाठी पाऊच हा प्रकार प्रामुख्याने वापरला जातो. हा प्रकार सहज वाहून नेण्याजोगा, वजनाला हलका असून, एकावेळेचे उच्च दर्जाची स्मुदी, उच्च प्रथिनयुक्त पेय त्यातून देता येते. स्वतः उभे राहतील असे पाऊचेसमुळे स्टोअरमध्ये मांडणीही सोपी होते. कोणत्याही रेफ्रिजरेशनशिवाय १२ महिन्यांपर्यंत उत्तम राहू शकतात. या काळापर्यंत पोषकता, स्वाद आणि पोत टिकून राहतो.
ई-मेल - ramabhau@gmail.com, (लेखक लुधियाना येथील सिफेट संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nutrition food fruit vegetable smoodi