हेलपाटे मारून जीव आला घाईला

Satbara-Utara-Issue
Satbara-Utara-Issue

सोलापूर - पीककर्जासाठी सातबारा उताऱ्याची गरज हाय, आनलाइन उताऱ्यासाठी महा- ई- सेवा केंद्रात हेलपाटे मारून थकलो, तलाठ्याच्या मागं लागून घाईला आलू, ते बी देतू म्हणत्यात, पण काई देईनात, बॅंकंवाले मातर उताऱ्याशिवाय काम करत न्हाईत, आता दीड महिना झाला बगा, सगळीकडे हेलपाटे मारून जीव पार घाईला आलाय, अशा शब्दांत उत्तर सोलापूर तालुक्‍यातील रानमसलेच्या घनश्‍याम गरड यांनी आपली व्यथा सांगितली. 

सातबारा उतारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पीककर्ज, पीकविमा, खरेदी-विक्रीसह अन्य सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना उताऱ्याशिवाय काहीच करता येत नाही. राज्यात सगळीकडेच ऑनलाइन सिस्टिमचा सर्व्हर डाउन असल्याने सातबारा उतारा मिळू शकत नाही, तर अनेक ठिकाणी सातबारा उताऱ्याची नोंद ऑनलाइन झालेली नाही, तरीही तलठ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मधल्या मध्ये भरडून चालला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रानमसले गावातील काही शेतकऱ्यांशी याबाबत संवाद साधला. 

त्यापैकीच एक श्री. गरड त्यांची १५ एकर शेती आहे. ऊस, लिंबू आदी पिके आहेत. गतवर्षी त्यांनी सोलापुरातील ओरिएन्टल बॅंक ऑफ काॅमर्सकडून तीन लाख ३० हजाराचे कर्ज घेतले आहे. आता ते सगळे भरूरुन पुन्हा नव्याने जादा कर्ज त्यांना उचलायचे आहे. पण बॅंक उताऱ्याशिवाय कर्ज नाही म्हणतेय, सेवा केंद्रात सर्व्हर डाउनमुळे उतारे मिळत नाहीत आणि तलाठी ऑफलाइन देता येत नाही, असे म्हणत माघारी पिटाळत आहे. आता देतू म्हणत्यात, पण ते गावाकडं फिरकत न्हाईत, त्यांना शोधत फिरावं लागतं.

अशा पद्धतीने या प्रत्येक ठिकाणी त्यांची ससेहोलपाट सुरू आहे. घनश्‍याम म्हणाले, ‘‘दीड लाखाच्या वर असल्यानं आधीचं कर्ज माफ व्हवू शकलं न्हाई. आता हाय ते तर नवं-जुनं करून थोडं जादा उचलून काय तर करावं म्हटलं, तर हे असलं सरकारी काम, पार वैतागलोय बघा, सर्व्हर डाउन म्हणत्यात, पण किती दिस हे चालणार, हंगाम आता संपत आला, बॅंकांना पुन्हा माघारी पाठवलं, तर करायचं काय. नव्या-जुन्यामुळं थोडं वझं कमी व्हईल. म्हटलं तर वझंच वाढत चाललंय.’’ असं सांगत सरकारचा निर्णय चांगलाय ओ, पण या खोळंब्याचं करायचं काय? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. 

रानमसलेतील रामचंद्र गजघाटे यांची दहा एकर शेती आहे. त्यांच्या उताऱ्यावर पाच भावाच्या वारसाहक्क नोंदी करायच्या आहेत. पण उतारे बंद असल्याने नोंदीच होऊ शकत नाहीत, त्यासाठी आवश्‍यक असलेले शपथपत्र त्यांनी बॉण्डवर करून आणले आहे. ते घेऊन तलाठ्याकडे ते सारखे हेलपाटे मारत आहेत. पण तलाठी गावाकडं फिरकंना, त्याला शोधतच फिरावं लागयतंय. विचारलं तर तेबी ऑनलाइनकडे बोट दाखवत आहेत. एका कामाला एवढा वेळ कंस होणार, हेलपाटे मारून आम्हीबी पार थकलोय, असे रामचंद्र गजघाटे म्हणाले.

नातवाच्या नावावर शेतीसाठी आजोबाचं हेलपाटं
रानमसल्यातीलच पांडुरंग तगारे यांनी आपल्या पाच एकर शेतीतील दोन एकर शेती स्वखुशीने आपल्या नातवाला देण्यासाठी खरेदी-विक्रीचा दस्त तयार करून घेतला आहे. पण उताऱ्यावर नोंद नसल्याने पुढची काहीच कामे नातवाला करता येत नाहीत. खरेदी मिळूनही सातबारा उताऱ्यावर नोंद नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. यामध्ये नातवापेक्षा आजोबाच पुढं होऊन तलाठ्याकडे हेलपाटे मारत आहेत. पण उतारा आणि तलाठी दोघं पण त्यांना सापडत नाहीत. याबाबत तगारे म्हणाले, की दस्त करून महिना-दीड महिना होवून गेलाय, पण सातबारा उताऱ्यावर नोंद काही व्हत न्हाई. तलाठीही गावाकडं न्हाई, ते सोलापुरातच राहून काम करतात. त्यांना म्हणं मामलेदारांना त्या उताऱ्याच्या कामासाठी डुयटी लावलीया, पण आमचं हितं कसले हाल व्हतात, हे त्याना दिसंना.  

सोलापूर जिल्ह्यात ७०० व्यवहार रखडले
काही दिवसांपासून सातबारा उताऱ्याचा सर्व्हर डाउनच आहे. तो कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत आजच्या घडीला कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्यामुळे पैसे देऊनही खरेदी-विक्रीची नोंद लवकर नाही झाली तर जागा अथवा जमीन विकणारा पुन्हा दुसऱ्या व्यक्‍तीला तीच मालमत्ता विकण्याची शक्‍यता आहे. कारण जोवर खरेदी-विक्रीची नोंद ऑनलाइन होत नाही, तोवर संबंधित मालमत्ताधारकाचेच नाव त्या मालमत्तेवर राहते. सध्या जिल्ह्यातील अकरापैकी मोहोळ, दक्षिण व उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुका वगळता अन्य तालुक्‍यांमध्ये ऑनलाइन ई-फेरफारचे काम सुरू असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तोही सर्व्हर मागील काही दिवसांपासून डाउनच आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला असून सध्या मालमत्तेची खरेदी अथवा विक्री होऊनही सुमारे सातशे व्यवहारांची दस्तनोंदणी रखडली असल्याचे मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

खरेदी-विक्रीचा व्यवहार रखडला
याच गावातील अंगद गरड यांची समस्या थोडी वेगळी आहे. त्यांनी सव्वापाच एकर शेती विकत घेतली आहे. त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार रखडला आहे. दोन महिन्यांपूर्वी २९ मे रोजी चलनाद्वारे शेतीची जवळपास ६२ हजाराची स्टॅम्पड्युटी भरली आहे. पण ई-फेरफार नोंदीचा सर्व्हर वारंवार स्लो होत असल्याने खरेदी-विक्रीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय सातबारा उताऱ्याची समस्या आहेच. खरेदी-विक्री करताना संबंधित मालमत्तेचा ऑनलाइन सातबाराच दिसत नाही. त्यामुळे ऑफलाइन खरेदी-विक्रीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर मालमत्ता विक्रेत्याकडून धोका होण्याची शक्‍यता असल्याने त्याचीही अडचण होऊन बसली आहे. आधीच चलन भरून घेतले आहे. पण काम काही होईना.

समोरचा शेती विकणारा शेतकरी मात्र आता घाई करायला लागला आहे. या व्यवहाराचं काय व्हणार, असा प्रश्‍न करताना अंगद गरड म्हणाले,""दोन्ही बाजूनं आम्ही कात्रीत पकडलूय बघा. काहीच मार्ग मिळत न्हाई. सरकारचं हे चाललंय काय तेच कळतं न्हाई, बरं थांबायचं तर किती एक-दोन दिवस ठिक हाय की, पर दोन-दोन महिने म्हणजे जरा जास्तच व्हतंय.'' 

खरेदी-विक्रीनंतर ऑनलाइन फेरफार नोंद होत नाही. त्यासाठी ऑफलाइन खरेदी-विक्री करण्याची सोय करण्यात आली आहे. ऑफलाइन खरेदी-विक्री झाल्यानंतर ऑनलाइन सेवा सुरळीत सुरू झाल्यानंतर खरेदी अथवा विक्रीचे अ पत्रक आम्ही संबंधित तहसीलदारांकडे देऊ. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार संबंधित तलाठ्यांनी तत्काळ नोंद घेणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यासाठी खातेदार पुढे येत नाहीत. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. 
- जी. डी. कराड, मुद्रांक, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com