esakal | सिताफळाच्या प्रक्रिया उद्योगात अमाप संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Custard-apple

जगातील काही निवडक फळे व शेती उत्पादनांना सुपर फुड म्हणून ओळखले जाते. त्यात सिताफळाचा समावेश होतो. सिताफळातील आरोग्यदायी घटक, चव, सुगंध या गुणवैशिष्ट्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले आहे.

सिताफळाच्या प्रक्रिया उद्योगात अमाप संधी

sakal_logo
By
विलास शिंदे

महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात समृध्दी आणण्यासाठी सिताफळासारख्या पिकांच्या इंडस्ट्री उभ्या करण्यावर प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सिताफळाचा पल्प हे महाराष्ट्रातील एक मोठे औद्योगिक उत्पादन म्हणून समोर येऊ शकते. दर्जेदार पल्पिंग आणि फ्रोजनच्या यंत्रणा उभ्या राहणं, पल्प बरोबरच रबडी, आईसक्रिम, पावडर आदी उपपदार्थांचे चांगल्या पध्दतीने ब्रॅन्डींग करुन मार्केटींग करता येणे शक्य आहे. हे सगळे एकाच ब्रॅन्ड खाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांमधूनच  प्रामाणिक व ध्येयनिष्ठ नेतृत्व पुढे येणे आवश्यक आहे. तरच शेतापासून ते ग्राहकापर्यंतच्या सर्व कड्यांना जोडणाऱ्या मूल्यसाखळ्या उभ्या राहतील.

जगातील महत्वाच्या फळांमध्ये सिताफळाचा समावेश होतो. उष्ण कटिबंधातील देशांमध्ये ते पिकवले जाते. भारत, थायलंड आणि मध्यपूर्वेतील देशांत सिताफळाचे उत्पादन होते. चिली, ऑस्ट्रेलिया व अन्य देशांतही सीताफळ व त्या वर्गातील फळांचे उत्पादन घेतले जाते. पारंपारिक सीताफळ मात्र भारत आणि थायलंड या दोन देशांतच जास्त प्रमाणात आढळून येते.

सुपर फुड
जगातील काही निवडक फळे व शेती उत्पादनांना सुपर फुड म्हणून ओळखले जाते. त्यात सिताफळाचा समावेश होतो. सिताफळातील आरोग्यदायी घटक, चव, सुगंध या गुणवैशिष्ट्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले आहे. थायलंडमधील सिताफळाच्या तुलनेत भारतीय सिताफळ हे चव व सुगंधाच्या बाबतीत सरस आहे. आईसक्रिम उद्योगासह अन्य प्रक्रिया उद्योगांतूनही सिताफळाच्या पल्पला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. भारतासह आखाती देशांतून ही मागणी वाढत आहे. सिताफळाचे बी, पाने तसेच इतरही भागांना औषधी गुणधर्मामुळे सातत्याने मागणी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्रात लागवडीत वाढ
देशात सर्वाधिक सीताफळ उत्पादन महाराष्ट्रात होते. मागील पाच वर्षांत राज्यात सीताफळ लागवडीत झपाट्याने वाढ झाली. सीताफळ हे अतिशय कमी पाण्यावर येणारे पीक आहे. इतर फळपिकांच्या तुलनेत सिताफळामध्ये व्यवस्थापन खर्च कमी आहे. बाळानगरी, गोल्डन, सुपर गोल्डन यासह अनेक चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. सीताफळ महासंघ तसेच सिताफळाच्या शेतीसाठी पूर्णपणे वाहून घेतलेले नवनाथ कस्पटे, श्याम गट्टाणी, कविवर्य ना. धों. महानोर, बाळासाहेब महानोर हे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दीर्घ काळाच्या प्रयत्नांमुळे सीताफळ हे एक व्यावसायिक पीक म्हणून महाराष्ट्रात रुजलं आहे.

कमी पाण्यातही मूल्यवर्धन
महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचा मुख्य प्रश्न पाणी हा आहे. सर्व प्रयत्न केले तरी राज्यातील सिंचन ३० टक्क्यांच्या वर जाऊ शकत नाही. उर्वरित शेतीसाठी कायमच पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. कमी पाण्यात जास्तीचे मूल्य देणारी पिके या दृष्टीने आपली सगळी धोरणं आखण्याची गरज आहे. आपल्या पाणी नियोजनात उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे.

राज्य सरकारने १९८९ मध्ये कोरडवाहू फळबाग लागवड योजना आणली. त्यामुळे कोरडवाहू भागांत फळबांगांचे क्षेत्र वाढले. त्यात सीताफळाचाही समावेश होता. मात्र या पिकाकडे एक इंडस्ट्री म्हणून आपण कधीच पाहिलं नाही. मूल्यसाखळी विकसित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. तसेच लागवडीच्या प्रॅक्टिसेस प्रमाणित करणे, छाटणीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान सोप्या भाषेत मांडणे, शेतकऱ्यांना नियमित पूर्णवेळ तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी यंत्रणा उभी करणे, याकडेही प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काढणीनंतरच्या हाताळणीकडे दुर्लक्ष..
सिताफळात सर्वात मोठी समस्या ही काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या पातळीवरची आहे. सीताफळ हे नाशवंत फळ असून पक्वतेनंतर वेळेत बाजारात पोहोचणं अत्यावश्यक असते. पक्वतेनंतर सिताफळात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. सिताफळात काढणी पश्चात तंत्रज्ञान विकसित करण्याकडे आपण नीट लक्ष दिलं नाही. पल्पिंगच्या यंत्रणा थोड्या फार प्रमाणत पुरंदर भागात तयार झाल्या आहेत. परंतु त्यांच्या दर्जात सुधारणा केली पाहिजे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करायला प्रचंड वाव आहे. 

सध्याची पल्पिंगची यंत्रणा अत्यंत विस्कळीत स्वरुपात सुरू आहे. स्वयंचलित यंत्रणेचा वापर करीत हायजीनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या पॅकहाऊसच्या यंत्रणांना जोडून ॲसेप्टीक फॅसिलिटी करण्याची गरज आहे. सिताफळाचा पल्प जर असुरक्षित पध्दतीने हाताळला गेला तर त्यात लार्वा व इतर किटक, अळ्या तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रक्रिया व्यवस्था पूर्ण तांत्रिक पध्दतीने शास्त्रशुध्द स्वरुपात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी यात काम करणाऱ्या यंत्रणांनी तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचा शेतकऱ्यांमध्ये विस्तार करणे गरजेचे आहे.

इंडस्ट्री प्रॉडक्ट म्हणून पाहा
थायलंड मध्ये मँगोस्टिन, रामभुतान ही तिथली लोकल फळं आहेत. या फळांना त्यांनी इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या धर्तीवर विकसित केलं आहे. वरील दोन्ही फळं प्रत्येकी चारशे रुपये किलो दराने विकली जातात. सिताफळाच्या बाबतीत आपण असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव औरंगाबादच्या परिसरातील अजिंठा डोंगररांगात, बीड जिल्ह्यातील धारुर, आष्टी, पाटोदा, वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी तर  नगर जिल्ह्यातील अकोले या भागात नैसर्गिकरित्या सिताफळाचे उत्पादन होते. यातून अत्यंत कमी उत्पादन खर्चात त्या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे चांगले स्त्रोत निर्माण झाले आहेत.  सिताफळाकडे इंडस्ट्री प्रॉडक्ट म्हणून पाहिले तर त्यातून या भागाचे अर्थकारण नक्कीच बदलून जाईल.

पिकवण्यापासून ते मार्केटींग पर्यंत चांगली साखळी जिथे तयार झाली आहे  तिथेच काही मोजक्या शेतकऱ्यांना सिताफळाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे मजबूत मूल्यसाखळी उभी करणे याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. 

बाजारपेठेचा विस्तार हवा
सिताफळाची बाजारपेठ अजून देशातच पूर्णपणे विकसित झालेली नाही. भारतातून फक्त १०० टन निर्यात होते. त्यातील ९७ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचाच आहे. पल्प साठी सुमारे दोन हजार टन उत्पादन वापरलं जातं.

सद्यस्थितीत फ्रेश सीताफळ पुणे, मुंबई, नाशिक व गुजरातच्या बाजारपेठेत विकले जाते. दक्षिणेकडील बंगळुरु, चेन्नई, उत्तरेला दिल्लीचा परिसर तर पूर्वेला सिलिगुडीचा परिसर या ठिकाणच्या बाजारपेठांतही शिरकाव करण्याची गरज आहे. शेतापासून ते पुणे, मुंबई किंवा गुजरात राज्यातील शहरांतील ग्राहकांपर्यंत एका दिवसात माल कसा पोहोचेल यासाठी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.

आखाती देशांमध्ये होणारी निर्यात ही विमानाद्वारे होते. ती तुलनेने खर्चिक आहे. ही निर्यात समुद्र मार्गेही कशी होईल, त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिताफळाची मोठी लागवड असलेल्या भागांत प्रिकुलिंग व कोल्ड स्टोरेजच्या सुविधांसह  इंटिग्रेटेड पॅक हाऊसच्या यंत्रणा उभ्या कराव्या लागतील. जेणे करून योग्य स्वरुपातील संकलन व प्रतवारी आणि पॅकींगच्या सुविधा उपलब्ध होतील. रिफर व्हेईकलच्या माध्यमातून सिताफळाचा ताजा पल्प ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकडेही लक्ष द्यायला हवे. द्राक्ष पिकाच्या धर्तीवर सिताफळातही यंत्रणा उभ्या कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्र हे सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून विकसित व्हायला हवे. 

महाराष्ट्रातील सीताफळ शेती
जमेच्या बाजू
उत्पादन खर्च कमी
सुपर फुड ही ओळख
पाण्याची कमी गरज 

कमजोर बाजू
कमी टिकवणक्षमता
प्रक्रियेसाठी किचकट
कमजोर विपणन यंत्रणा
साठवणूक यंत्रणेचा अभाव

संधी
प्रक्रियेत वाढती संधी
जागतिक बाजारात मागणी
रोजगार निर्मितीस वाव

धोके
 फळ नाशवंत असल्याने लवकर खराब होते.

सीताफळ उत्पादन  दृष्टीक्षेपात
भारतातील क्षेत्र : ५५ हजार हेक्टर
महाराष्ट्रातील क्षेत्र : ७ हजार हेक्टर
देशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा :  २८ टक्के
देशाची उत्पादकता : हेक्टरी ८.४४ टन 
महाराष्ट्राची उत्पादकता :  हेक्टरी ७.३६ टन हेक्टरी
देशाची वार्षिक सीताफळ निर्यात : १०० टन 
देशातील वार्षिक सीताफळ पल्प उत्पादन : २००० टन 
देशातील सीताफळ उत्पादक राज्ये :  महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू
राज्यातील सीताफळ उत्पादक जिल्हे :  पुणे, नगर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, नगर, अकोला, बुलडाणा

(लेखक ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’चे अध्यक्ष  व व्यवस्थापकीय संचालक आहेत.) 
info@sahyadrifarms.com.

loading image