पाऊस थांबला, पण डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही

orange
orange

नागपूर (Narpur): पावसाची संततधार सुरू असल्यानं संत्र्यावर बुरशीजन्य ( fungal disease) रोग आला. ही बुरशी ब्राऊनरॉट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या बुरशीचे निदान मात्र कोणाकडेच नव्हते. परिणामी, उघड्या डोळ्यांनी हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळांची गळ पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. फळगळ पाहण्यासाठी तज्ज्ञ, राजकारण्यांचे दौरे झाले, पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. पाऊस थांबला पण डोळ्यातलं पाणी थांबायचं काही नाव नाही, अशा शब्दांत काटोल तालुक्यातील खंडाळ्याचे मोहन चरडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.  

विदर्भातील संत्रा(Orange) लागवडीखाली एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ७२९५ काटोल,  ८१२१ नरखेड आणि ४१५६ हेक्टर क्षेत्र कळमेश्वर तालुक्यात आहे. यावर्षी संततधार पावसामुळे ब्राऊनरॉट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव संत्र्यावर झाला. परिणामी, ९० टक्के फळगळ झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. उत्पादकता घटल्याने चांगले दर मिळतील अशी अपेक्षा संत्रा उत्पादकांना होती. ऑक्टोबर हीटचा तडाखा बसत देशाच्या विविध भागांतून विटामिन सी असलेल्या संत्र्याला मागणी वाढते आणि दरही तेजीत राहतात. या वर्षी मात्र परिस्थिती विपरीत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी ३५ रुपये किलो असा दर असलेल्या संत्र्याचे या वर्षी दहा ते बारा रुपये किलोनेच व्यवहार होत आहेत, अशी माहिती मोहन चरडे यांनी दिली. 

जिल्ह्याच्या रामटेक, मौदा, कामठी, पारशिवणी या तालुक्यात धान लागवड केली जाते. या भागात १४५, १५५ दिवसांत परिपक्व होणाऱ्या धानाची विक्री केली जाते. काही कंपन्यांनी मात्र त्यांच्या बियाण्यात १२० दिवसांत परिपक्व होणाऱ्या वाणांची सरमिसळ केली. याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधला. त्या वेळी ‘‘तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या’’ अशी मुजोरीची भाषा त्यांच्याकडून वापरली गेल्याचे शेतकरी संजय सत्येकार यांनी सांगितले. ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला देखील याच कंपनी प्रतिनिधींनी दिला. कृषी विभागाचे पाठबळ असल्यानेच या कंपन्यांची मुजोरी वाढल्याचा दावा देखील सत्येकार यांनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भेसळयुक्त बियाण्यांसोबतच या वर्षी पाऊस आणि वाऱ्यामुळे धान जमिनीवर लोळले. झोपलेल्या या धानावर पुढे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतरही आशावादी असलेल्या शेतकऱ्यांना काहीतरी हाती लागणार अशी अपेक्षा असताना तुडतुड्यांनी धान लोंबीचा फडशा पाडला. आता तणसच शिल्लक  राहिल्याचे पारशिवनी तालुक्यातील मेहंदी येथील पंकज वासनिक यांनी सांगितले.

काटोल तालुक्यातील कोहळा शिवारात स्वप्नील धोटे यांनी पाच एकर सोयाबीन लागवड केली. सुरुवातीला सोयाबीनवर येलो मोजॕक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर संततधार पावसामुळे उर्वरित क्षेत्रातील सोयाबीन शेंगांत दानाच भरला नाही. परिणामी, मनावर दगड ठेवत सोयाबीन शिवारात बैल चारण्याचा निर्णय घ्यावा लागला असे स्वप्नीलने सांगितले. सोयाबीनच्या एकरी व्यवस्थापनात सरासरी सहा हजार रुपयांचा खर्च होतो. कापूस पिकाने देखील या वर्षी निराश केले. त्यांची कपाशी लागवड १७ एकर. पावसामुळे वाढ खुंटली. पहिल्यांदाच बोंडधारणा झाली. एवढेच एक समाधान, मात्र एक-दोन वेचण्यांतच कपाशीचे पीक निघून जाईल. पावसामुळे फुलगळ झाल्याने ही परिस्थिती उद्‌भवली.

जिल्ह्यात ३०, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजीच्या अतिवृष्टी व पुरामुळे १९२६१ हेक्टर क्षेत्रावर पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाला सादर केला आहे. परतीच्या पावसामुळे जास्त नाही तर ३६७० हेक्टर वरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान देखील पावसामुळे झालेले नसून धानपट्ट्यात वाऱ्यामुळे झाल्याचे  कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ७८  हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्वाधिक २ लाख १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होते. 

पीकविम्याकडे पाठ
 गेल्या वर्षी ५१ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. परंतु भरपाई देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांनी या वर्षी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे.  या वर्षी केवळ २८ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. विमा हप्त्यापेक्षा भरपाई तुटपुंजी राहते असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com