पाण्याने भाताची लोंबी गळून पडली, गवतही कुजले

rice-crop
rice-crop

सिंधुदुर्ग - साडेतीन महिने काबाडकष्ट केल्यानंतर भाताला सोनेरी रंगाच्या लोंब्या शेतात चमकू लागल्या, तसा शेतकऱ्यांचा चेहरादेखील खुलू लागला. गेल्या वर्षी काहीच हातात आले नाही, त्यामुळे या वर्षी चांगले पीक हातात येणार असल्यामुळे सर्वच कुटुंब भात कापणीच्या तयारीत होते. परंतु १४ आणि १५ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस झाला. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. पूरस्थिती निर्माण झाली आणि चिंचवली येथील चंद्रकांत वसंत पेडणेकर आणि रवींद्र वसंत पेडणेकर यां बंधूंची परिपक्व स्थितीत असलेली चार एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली. तब्बल दोन दिवस संपूर्ण शेत पाण्याखाली राहिले. लोंबी गळून पडलीच परंतु गवतही कुजून गेले. एका दिवसांत होत्याचे नव्हते झाले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक उत्पादन भातपीकाचे घेतले जाते. या वर्षी ५५ हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आली. या वर्षी सुरुवातीपासून शेती उपयुक्त पाऊस झाल्यामुळे पीक उत्तम होते. कणकवली तालुक्यातील चिंचवली भंडारवाडी येथील चंद्रकांत पेडणेकर आणि रवींद्र पेडणेकर हे एकत्र कुटुंबात राहतात. या कुटुंबाची घरालगतच चार एकर शेतजमीन आहे. या जमिनीत खरिपात भातपीक तर रब्बीत भाजीपाला पिके ते घेतात. या वर्षी देखील चार एकरवर भातशेती केली होती. या भागात भिजवणीची रोपे लागवड केली जातात. जेणेकरून भाजीपाला पिके घेण्यासाठी अवधी मिळतो. श्री. पेडणेकर बंधूंनी खरिपाकरिता गावातील सहकारी सेवा सोसायटीकडून प्रत्येक १५ हजार रुपये कर्ज घेऊन भात लागवड केली. 

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पिकाला पिवळसर रंग येऊ लागला. सोनेरी चमकदार लोंबी आल्यामुळे या उत्पादनाची आशा वाढली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे भातकापणी करता येत नव्हती, परंतु पावसाने उघडीप देताच कापणी करायचा निश्चय त्यांनी केला. मात्र १४ आणि १५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात दोन दिवसांत २३९ मि.मी.ची नोंद झाली. त्यामुळे या भागातील नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील सहा प्रमुख नद्या आणि कित्येक नाल्यांचे पाणी शुकनदीला मिळून चिंचवली, खारेपाटणला जाते. शुकनदीने पूररेषा ओलांडली आणि चिंचवली गावातील भातशेती पुराचे पाणी गिळकृंत करू लागले. खारेपाटण खाडीला भरती असल्यामुळे पुराचे पाणी खाडीतून माघारी येऊ लागले. या परिसरातील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली गेले. खाडीला भरती असल्यामुळे दोन दिवस पाणी ओसरले नाही. पेडणेकर कुटुंबाचे भातपीक पाण्याखाली राहीले. त्यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. भाताला लोंबी नाहीच, परंतु गवतदेखील मिळणार नाही. संपूर्ण गवत कुजले आहे. निसर्गापुढे हतबल असलेले चंद्रकांत पेडणेकर आपली व्यथा सांगत होते. 

गेल्या वर्षी देखील सर्व पिकांचे नुकसान झाले. यावर्षी तरी पीक हातात येईल, अशी अपेक्षा होती, परंतु या वर्षीसुद्धा बुडालो. चार एकर मधून ६० ते ७० क्विंटल भात मिळाला असता. परंतु आता १० किलोसुद्धा मिळणार नाही. त्यांच्या मळ्यात कुजलेल्या गवताचा वास येत होता. त्यातच उभे राहून ते बोलत होते. मळ्याच्या एका कोपऱ्यात जमिनीवर पडलेल्या भाताला कोंब फुटल्याचे सुद्धा त्यांनी दाखविले. वर्षभराला पुरेल इतके भात ते घरी ठेवायचे आणि उर्वरित भाताची विक्री करायचे. परंतु आता त्यांना घरी खाण्यासाठी सुध्दा भात विकत घ्यावे लागणार आहे. भातपिकाचा विमा उतरविलेला नाही.

शेतीवरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.  कुटुंबात आठ माणसे आहोत. परंतु संपूर्ण शेतीचे सलग दोन वर्षे नुकसान होत आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड भातविक्रीतून केली असती, परंतु आता आमच्या हातात काहीच राहिलेले नाही. 
- चंदकांत पेडणेकर, शेतकरी, चिंचवली, ता.कणकवली

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या वर्षीची नुकसानभरपाई नाही
गेल्या वर्षी नुकसान झालेल्या भातपिकाची नुकसानभरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे या वर्षी तरी आम्हाला भरपाई मिळणार का, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. सलग दोन वर्षे आमचे नुकसान होत आहे. सरकारने आता तरी आमचा विचार करावा ही आमची कळकळीची विनंती आहे, असे श्री. पेडणेकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com