संत्रा, मोसंबी पट्ट्यातील फळबागधारक अडचणीत

प्रतिनिधी
Friday, 25 January 2019

नागपूर - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अधिस्वीकृतीप्राप्त रोपवाटिकेतूनच संत्रा, मोसंबी रोपांच्या खरेदीची सक्‍ती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या मुळावर उठल्याचा आरोप फळबागधारकांकडून होत आहे. आंबा, पेरूप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीचे निकष बदलावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

नागपूर - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अधिस्वीकृतीप्राप्त रोपवाटिकेतूनच संत्रा, मोसंबी रोपांच्या खरेदीची सक्‍ती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या मुळावर उठल्याचा आरोप फळबागधारकांकडून होत आहे. आंबा, पेरूप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीचे निकष बदलावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

फळबाग लागवड योजनेच्या कक्षेत यापूर्वी अल्पभूधारक शेतकरीच होते. मोठ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान योजनांचा लाभ मिळावा, याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची घोषणा करण्यात आली. त्याला शेतकऱ्यांकडून देखील वाढता प्रतिसाद आहे. परंतु संत्रापट्ट्यात योजनेच्या लाभासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतूनच रोपांच्या खरेदीची सक्‍ती आहे. या दोन्ही संस्थांकडून संत्रा, मोसंबी रोपांचा पुरवठा मर्यादित होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या लॉटरीत नंबर लागूनही ते योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शासनमान्य अधिकृत रोपवाटिकाधारकांकडून परमिटद्वारे रोप खरेदीची मुभा मिळावी, अशी मागणी संत्रा, मोसंबी बागायतदारांकडून होत आहे. 

आंबा पेरूसाठी बदलले निकष
शासनाने बुधवारी (ता. २३) एका परिपत्रकाद्वारे आंबा आणि पेरू रोपांच्या उपलब्धतेची अडचण लक्षात घेतली. त्यानंतर एन.एच.बी. ॲक्रीडेटेड रोपवाटिकेतूनच रोप/कलमे खरेदीची अट शिथिल करण्यात आली. आंबा, पेरू रोपांची खरेदी आता शासनमान्य रोपवाटिकेतून देखील करता येणार आहे. असाच निकष आता संत्रा, मोसंबी रोपांकरिता देखील लावावा, अशी मागणी होत आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेकडून एका सातबारावर एका शेतकऱ्याला अवघी ११० रोपे पुरविली जातात. कृषी विद्यापीठाची रोपवाटिका नावापुरतीच आहे. योजनेत मात्र या दोनच संस्थांकडून रोपे खरेदीची अट आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी व्हावी, असे सरकारलाच वाटत नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह बहुतांश सत्ताकेंद्र विदर्भात असताना याच भागातील शेतकरी अडचणीत असावा, यापेक्षा दुर्देवाची बाब काय असेल.
- मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक, काटोल, जि. नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orange Sweet lemon farmer In trouble