पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या संत्रा उत्पादक वरुड तालुक्‍यातील सिंचन प्रकल्प निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. संत्रा बागा जगविण्यासाठी पाण्याची उपलब्धतेचे आव्हान असतानाच आता विजेच्या समस्येने देखील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या संत्रा उत्पादक वरुड तालुक्‍यातील सिंचन प्रकल्प निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. संत्रा बागा जगविण्यासाठी पाण्याची उपलब्धतेचे आव्हान असतानाच आता विजेच्या समस्येने देखील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वरुड तालुक्‍यात नऊ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात सरासरी ४० टक्‍केच जलसाठा संचयित झाला. एकेकाळी जानेवारीपर्यंत वाहत्या राहणाऱ्या नदीला एकही पूर गेला नाही. ऑक्‍टोबर महिन्यात ९ सिंचन प्रकल्पांपैकी जामगाव प्रकल्पात ७८.८४ व वाईमध्ये ६८.२५ टक्‍के जलसाठा उरला आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. शेकदरी प्रकल्पात १० ऑक्‍टोबरपर्यंत १९.८९ टक्‍के, पुसली प्रकल्पात १७.२४ टक्‍के, सातनूर प्रकल्पात ३०.४१ टक्‍के, पांढरी प्रकल्पात ५७.२४ टक्‍के, नागठाणा प्रकल्पात ४५.३१ टक्‍के जलसाठा आहे.

जमालपूर व बेलसावंगी प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्‍यात दहा ऑक्‍टोबरपर्यंत केवळ ५४० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ७६७.९० मि.मि. पावसाची नोंद झाली होती. पाऊस कमी झाल्याने यावर्षी जलसंकट अधिक गडद होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सिंचनाची गैरसोय
वरुड तालुक्‍यात सुमारे २३ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. सद्या आंबीया बहारातील संत्राफळे झाडावर आहेत. पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी मृग बहाराची फळे घेतात. परंतु भुजल पातळी खालावल्याच्या परिणामी अनेक ठिकाणी बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडण्यास सुरवात झाली आहे. त्यातच कृषिपंपांना दिवसाऐवजी रात्री ११ किंवा १२ वाजतानंतर वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

पाणी असेल तर झाडावर फळे अधिक काळ टिकतात. परंतु सद्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने फळावर एका बाजूने सूर्याची किरणे पडून फळे चांदणी (डागाळतात) पडून खराब होतात. त्यासोबतच फळांना लवकरच रंगधारणा होऊन ती परिपक्‍व होत असल्याने विक्रीसाठी काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याचा दरावर परिणाम होतो.
- शेषराव घोडेराव, संत्रा उत्पादक, गव्हाणकुंड, ता. वरुड, जि. अमरावती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orange Water Shortage