ऊस, शेवग्याचे सेंद्रिय उत्पादन

Ghanshyam-and-Anita-Pawar
Ghanshyam-and-Anita-Pawar

बारामती तालुक्‍यातील काऱ्हाटीसारख्या जिरायती भागात सेंद्रिय ऊस आणि शेवग्यापासून भरघोस उत्पादनाचा मार्ग येथील प्रयोगशील शेतकरी घनश्‍याम जयसिंग पवार व त्यांच्या पत्नी अनिता या दांपत्याने शोधला आहे. सूक्ष्म सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात सेंद्रिय पद्धतीने अधिक उत्पादन कसे मिळेल, यावर त्यांचा भर आहे. 

एकत्र कुटुंबातील घनश्‍याम यांच्या वाट्याला सुमारे सात एकर जमिनीचे क्षेत्र वहिवाटीस आहे. यापैकी पाच एकर जमीन हलकी, पाण्याची निचरा होणारी आहे, तर दोन एकर क्षेत्र मध्यम स्वरूपाचे आहे. शेतीच्या पाण्यासाठी त्यांनी एक विहीर, दोन कूपनलिका व सुमारे १६ हजार लिटर क्षमतेची एका सिमेंटच्या टाकीची व्यवस्था केली आहे.

कूपनलिकांचे पाणी विहिरीत साठविले जाते. विजेच्या उपलब्धतेनुसार कूपनलिकेतून ठिबक सिंचनाद्वारे थेट पिकांना पाणी देण्याचीही व्यवस्था केली आहे.  विहिरीतून टाकीत पाणी साठा केला जातो. सुमारे १६ हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून वीज नसतानाही पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. या टाकीजवळून ठिबकद्वारे पिकांना सेंद्रिय विद्राव्य खते व औषधे देण्याची व्यवस्था आहे. या टाकीशेजारी कंपोस्ट खतासाठी विटांची टाकी केली आहे. तीत झाडांचा पालापाचोळा टाकून चांगल्या प्रतीचे खत मिळत आहे. 

सेंद्रिय शेतीच का?
सेंद्रिय शेतीच का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, रासायनिक खते व औषधांमुळे विषयुक्त भाजीपाला व शेतीमाल खाण्यात येत असल्याने आरोग्यास अपायकारक ठरत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळलो. गावात आठवड्यातून एकदा शेती कार्यशाळा भरते. या कार्यशाळेसाठी परिसरातून सुमारे पाऊणशे शेतकरी उपस्थित असतात. त्यात कृषी सहायक अमोल लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीतज्ज्ञ, अधिकारी तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभते. त्याचा फायदा होतो. 

बांधावरही जपली झाडे
सध्या विविध पिकांबरोबरच शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंब, जांभूळ, कवठ, चिंच, फणस, पपई, लिंबू, संत्री, मोसंबी, लाल फुलांचा हादगा, पळस, चाफा आदी झाडे लावली आहेत. याआधी लावलेली काही झाडे जपली आहेत. या सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

सेंद्रिय ऊस लागवड 
प्रथमच राबविलेला सेंद्रिय ऊस शेतीचा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. ऑक्‍टोबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात फुले-२६५ या संकरित वाणाचा ऊस लावला. त्यासाठी एकरी सुमारे ४ हजार २०० रोपे लागली. लागणीपूर्वी बेसलडोस म्हणून १० पिशव्या गांडूळ खत व काही सेंद्रिय खते टाकली. लागणीनंतर चार दिवसांनी ठिबकद्वारे सेंद्रिय द्रावणाचे ड्रेचिंग केले. त्यानंतर आठ दिवसांनी फवारणी केली. महिनाभरानंतर पानांची लांबी, रुंदी वाढण्यासाठी व पानांना काळोखी येण्यासाठी आळवणी (ड्रेचिंग) केली. सध्या उसाला सुमारे २५ ते ३० फुटवे फुटले असून ऊस चांगला तरारला आहे. यासाठी डॉ. सुभाषचंद्र कराळे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पवार यांनी सांगितले.

शेवगा लागवड
काऱ्हाटीतील सुमारे ४० शेतकऱ्यांनी या हंगामात महिनाभराच्या फरकाने शेवगा लावला होता. त्यापैकी अनेकांच्या शेवग्याची वाढ झाली नाही. पण योग्य नियोजन, सेंद्रिय खतांचा वापर यामुळे घनश्‍याम पवार यांचा शेवगा चांगलाच बहरला आहे. पवार यांनी शेवग्यात कांदा व लसणाचे आंतरपीक घेतले आहे. ओडिसी वाणाच्या शेवगा बियाची पवार यांनी सुमारे १२ बाय ६ फुटांवर लागण केली. हे बियाणे जामखेड येथून ५ हजार रुपये किलोप्रमाणे आणले. एकरी ३०० ग्रॅम किंवा सुमारे ९०० बिया लागतात. सप्टेंबर-२०१९ मध्ये बेडवर ठिबकद्वारे पाणी देऊन लावलेला शेवगा आता सुमारे १० फूट वाढला आहे. गांडूळखत, निंबोळीखत व सेंद्रिय खतांचा त्यांनी शेवग्याला बेसल डोस दिला आहे. बेडवर सुमारे एक फूट खड्डा घेऊन बियाण्याची लागण केली. चार दिवसांतून एकदा एक तास पाणी दिले. दहाव्या दिवशी शेवगा उगवला. 

सेंद्रिय खतांचे ड्रेचिंग
पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी, जमिनीतील अन्नघटक शोषून घेण्यासाठी, रोपांची वाढ आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी २० दिवसांनंतर ड्रेचिंग स्वरूपात सेंद्रिय खतांच्या मात्रेची आळवणी केली. मावा, तुडतुडे, पांढरी माशीसाठी किडरोग नियंत्रण व खबरदारी म्हणून फवारणी केली. रोपांची वाढ सुमारे एक फूट झाल्यानंतर पानाद्वारे पिकात शोषल्या जाणाऱ्या सेंद्रिय अर्काची फवारणी केली. त्यामुळे शेवग्याला तजेलदारपणा व चैतन्य आले. 

एक टन उत्पादनाचा अंदाज
सुमारे दोन महिन्यांनंतर फुलकळी निघण्यासाठी व फूलगळती होऊ नये यासाठी फवारणी केली. आता शेवग्याला मोठ्या प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. सुमारे दीड महिन्यानंतर शेवग्याचा पहिला तोडा होईल. एका हंगामात ७ ते ८ तोडे होतात. सुमारे एक टन उत्पादन निघेल. त्यापासून सुमारे एक लाखाचे उत्पन्न मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. बियाणे, खते, औषधे व मजुरी मिळून सुमारे ४० हजार रुपये खर्च झाला आहे. मुलगा सौरभ व वैभव सध्या कृषी पदवीचे शिक्षण घेत आहेत. सुटीला आल्यावर दोन्ही मुले शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवतात. सकाळी-संध्याकाळी सेंद्रिय खते व औषधांची विक्री करत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com