soyabean-farm
soyabean-farm

चाळीस एकरांतील सोयाबीनवर फिरवला रोटावेटर

Published on

वर्धा - देवळी तालुक्यातील मुरदगाव (खोसे) येथील शेतकरी हरीश ओझा यांनी ४० एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला. शासनाकडून भरपाई मिळणार नाही या नैराश्यातून त्यांनी हा निर्णय घेतला. 

हरीश ओझा यांची मुरदगाव खोसे येथे ८० एकर शेतजमीन आहे. यातील ४० एकरांवर त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. त्यावर त्यांचा मोठा खर्च झाला. पीक जोमात बहरले. मात्र, शेंगधारणा न झाल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. संबंधित बियाणे कंपनीला देखील कळविण्यात आले. मात्र, कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यावरच ही प्रक्रिया थांबली. शासन तसेच बियाणे कंपनीच्या स्तरावर कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही याची खात्री पटलेल्या ओझा यांनी ४० एकरांतील सोयाबीन काढण्याचा निर्णय घेतला. सोयाबीनसाठी सुमारे ३७ बॅग बियाणे लागले. प्रति बॅग २६०० रुपये प्रमाणे खर्च झाला त्यासोबतच आंतरमशागत, डवरणी, नागरणी, तीन कीटकनाशकांच्या फवारण्या, खत, मजुरी असा प्रति एकर सुमारे नऊ हजार रुपयांचा खर्च झाला. 

दरवर्षी मी फक्त चार एकर सोयाबीन लावतो. परंतु कापूस वेचणीकामी मजूर मिळत नसल्याने या वर्षी ४० एकर सोयाबीन लावले. हार्वेस्टरच्या साह्याने सोयाबीन काढण्याचा विचार होता. परंतु शेंगांमध्ये दाणे भरले नाही. त्यामुळे मोठा खर्च वाया गेला. २७ नोव्हेंबरला माझ्या मुलाचे लग्न आहे. त्याकरिता पैशाची गरज होती. आता उसणवारी करावी लागणार आहे. 
- हरिश ओझा, शेतकरी, मुरदगाव खोसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com