पोपट पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

मोहन काळे 
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर - शेतकऱ्यांचा मित्र म्हणून आेळखल्या जाणाऱ्या पोपट पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आल्याने त्यांची संख्याही घटली आहे. असे असताना सोमवारी (ता. १) वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ढेकळेवाडी (ता. मोहोळ) येथील एका सूर्यफुलाच्या शेतात हे पक्षी दिसून आल्यामुळे शेतकरी व पर्यावरणप्रेमींना ही एक पर्वणीच ठरली आहे.   

पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचा परिणाम विविध पक्ष्यांवर झाला आहे. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने फेरफटका मारला असता वृक्षतोडीमुळे अनेक पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला असल्याचे दिसून आले. रस्त्याची कामे एकाचवेळी सगळीकडे सुरू आहेत. रस्ता रूंदीकरणामुळे त्यात अनेक मोठी व जुनी झाडे तोडली गेली. त्यामुळे घार, साळुंखी, पोपट आदी पक्ष्यांची घरटी मोडली गेली. या पक्ष्यांची घरटी मोठ्या झाडावरच असतात. त्यामुळे या पक्ष्यांना या विकासकामामुळे बेघर व्हावे लागले आहे. 

आपल्याकडे हमखास दिसणारे पोपट आता फारच कमी दिसू लागले आहेत. शहरातील मोठ्या झाडांवर त्यांचा थोड्याफार प्रमाणात अधिवास दिसत असला तरी ग्रामीण भागात मात्र पोपट सहसा दिसून येत नाही. त्यामुळे झाडाच्या डोलीत राहणारे पोपट पक्षी आता फारच दुर्मीळ दिसू लागले आहेत. विविध पक्ष्यांच्या अधिवासाची माहिती घेत असताना सोमवारी दिवसभराच्या भटकंतीनंतर ढेकळेवाडी (ता. मोहोळ) येथील शेतात पोपट पक्षी सूर्यफुलाच्या शेतात दिसून आले. चार पोपट काढणीला आलेल्या सूर्यफुलावर बसून डोलू लागल्याचे मोहक चित्र दिसू आले. हा पक्षी थोडीफार फळे खात असला तरी जास्त नुकसानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांचा मित्रच आहे. मका व सूर्यफूल हे त्याचे आवडीचे खाद्य असल्यामुळे शेतमालाचे नुकसान त्याच्याकडून होत नाही. 

पोपट पक्षी सध्या निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडले आहेत. वृक्षतोड, कमी पाऊस व वाढत्या तापमानामुळे या पक्ष्यांची संख्या आता कमी झाली आहे.
- डॅ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक, अकलूज

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parrot has declined