ज्ञानातून समृद्धीकडे! : बहुपीक पद्धत फायदेशीर

विवेक शिंदे, महाळुंगे पडवळ
बुधवार, 15 जानेवारी 2020

लौकी (ता. आंबेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी रखमाजी विठ्ठल थोरात आणि त्यांची दोन मुले शांताराम व निखिल यांनी तीन एकर क्षेत्रात मल्चिंग व ठिबकचा वापर करून बहुपीक पद्धत अवलंबली आहे. काकडी, बीट, दोडका, स्वीटकॉर्न, दुधी भोपळा आदी पिकांचे त्यांनी उत्पादन घेतले आहे.

लौकी (ता. आंबेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी रखमाजी विठ्ठल थोरात आणि त्यांची दोन मुले शांताराम व निखिल यांनी तीन एकर क्षेत्रात मल्चिंग व ठिबकचा वापर करून बहुपीक पद्धत अवलंबली आहे. काकडी, बीट, दोडका, स्वीटकॉर्न, दुधी भोपळा आदी पिकांचे त्यांनी उत्पादन घेतले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुपीक पद्धतीबाबत रखमाजी थोरात यांनी सांगितले की, तीन एकर क्षेत्रातील मुरमाड जमिनीची मशागत करून घेतली. कुटुंबांत चर्चा केली. तीन एकर क्षेत्रात एकाच पिकाची लागवड करण्यापेक्षा प्रत्येकी २० गुंठ्यांत काकडी, बीट, दोडका, स्वीटकॉर्न, दुधी भोपळा आदी वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यासाठी बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने बेड तयार केले. शेणखत व अन्य रासायनिक खतांचा वापर करून बेड पूर्णपणे भरून घेतले. त्यानंतर ठिबक सिंचनाच्या नळ्या बेडवर अंथरुण घेतल्या. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन बेड ओले केले. त्यानंतर मजुरांच्या साह्याने बेडवर मल्चिंग पेपर अंथरुण घेतला. आवश्‍यकतेनुसार योग्य अंतरावर मल्चिंग पेपरला छिद्रे पाडली. 

टोकन पद्धतीने लागवड
अवकाळी पाऊस उघडल्यानंतर ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काकडी, बीट, दोडका, स्वीटकॉर्न मका, दुधी भोपळा आदी बियाण्यांची लागवड मजुरांच्या साह्याने टोकन पद्धतीने केली. आवश्‍यकतेनुसार खते आणि पाणी दिले. दर्जेदार बियाण्यांमुळे चांगली उगवण झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत बदलत असलेले वातावरण पिकांना हानिकारक ठरत होते. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधांची वेळोवेळी फवारणी करण्यात आली. दोडका, काकडी व दुधी भोपळा आदी पिके वेलवर्गीय आहे. त्यामुळे तारा ओढून ताण देऊन वेल त्यावर चढविण्यात आले. तारांना मध्यभागी कारव्यांद्वारे आधार दिला. फळ लोंबकळते राहिल्यामुळे गुणवत्ता चांगली राहते, अशा पिकांना बाजारात चांगली मागणी मिळते. तसेच अधिक उत्पादनही मिळते, म्हणून तारांचा मंडप उभारला आहे. पत्नी सुनीता थोरात व सून शिल्पा थोरात यांचीही शेतातील कामांसाठी मदत मिळते, असे रखमाजी थोरात यांनी सांगितले.        

मल्चिंग पेपरचा वापर
बिटाची लागवड २० गुंठे क्षेत्रात करण्यात आली. आतापर्यंत दोन टन उत्पादन मिळाले आहे. सुमारे २५ ते ३० रुपये किलो बाजारभाव मिळत आहे. मक्‍याचे दोन हजार किलो उत्पादन मिळाले आहे. सरासरी १५ रुपये किलो या बाजारभावाने व्यापाऱ्यांनी मक्‍याची खरेदी केली आहे. सुमारे २० गुंठे क्षेत्रात काकडी पीक आहे. या पिकासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आहे. पहिला तोडा ३०० किलो निघाला. सरासरी २० ते २१ रुपये किलो बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत तीन टन उत्पादन मिळाले आहे. दोडका पिकाचेही २० गुंठे क्षेत्र आहे. आतापर्यंत दोन टन उत्पादन मिळाले असून ४० रुपये किलो बाजारभाव मिळत आहे. भोपळ्याचे उत्पादन तीन टन मिळाले असून १५ ते २० रुपये बाजारभाव मिळत आहे. गुणवत्तेनुसार बाजारभावातील चढ उतार होत आहे. 

खासगी कंपनीस विक्री 
उत्पादित सर्व शेतीमालाची विक्री कळंब येथील एका खासगी कंपनीच्या विक्री केंद्रात केली जात आहे. सतत बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. विशेष काळजी घेतल्यामुळे पीक वाचली आहेत. बाजारभाव चांगला मिळत असल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते. बहुपीक पद्धतीचा चांगला परिणाम दिसत आहे, असे शांताराम थोरात यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The polynomial method is beneficial