देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता

अभिजित डाके
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

देशात यंदा हळदीच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. दरवर्षी देशात एक कोटी पोती बाजारात येतात. यंदा उत्पादन एक कोटी पोत्यांपेक्षा अधिक होईल. त्यामुळे वाढलेले उत्पादन हे तेजीला पोषक नाही.
- मनोहर सारडा,हळद व्यापारी, सांगली.

सांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गत हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार असा दर होता. सध्या नवीन हळद बाजारपेठेत आली आहे. ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे. मात्र, सध्या नवीन हळदीची आवक कमी असल्याने चढे दर मिळत आहेत.  

देशामध्ये तेलंगना तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ही राज्य हळद उत्पादनात अग्रेसर आहेत. देशाच्या एकूण उत्पादनापैकी या राज्याचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. या देशात चांगला पाऊस झाला. यामुळे हळदीचे पीक चांगले बहरले. देशात दरवर्षी सुमारे ७५ लाख पोत्यांचे (६० किलोचे पोते) हळदीचे उत्पादन होते. दरवर्षी देशात सुमारे २२ ते २३ लाख पोती हळदीची शिल्लक राहतात. याचा अर्थ असा की, देशात सुमारे शिल्लक हळद आणि उत्पादन झालेली हळद १ कोटी पोती बाजारात येतात. यामुळे दर स्थिर राहतात. गतवर्षी एप्रिल अखेर हळदीला ६ हजार ५०० ते १० हजार प्रति क्विंटल असा दर मिळाला होता.

राज्यात क्षेत्र वाढले,पण उत्पादन स्थिर
यंदा राज्यात हळदीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ झाली आहे. हळद पिकाच्या वाढीदरम्यान, पावसाचा खंड पडला. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे मराठवाडा आणि विदर्भात हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच थंडी वाढली. राज्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी उत्पादन स्थिर राहण्याची शक्यता असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली. 

एक कोटीवर उत्पादन तेजीला पोषक नाही
हळदीचे दर उत्पादन आणि शिल्लक हळदीवर ठरत असतात. गेल्या चार ते पाच वर्षांचा आढावा घेतला तर देशात अंदाजे एक कोटी पोत्यांचे हळदीचे उत्पादन मिळत होते. मात्र, यंदा हळदीला पोषक वातावरण होते. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा की, शिल्लक हळद २२ ते २३ लाख पोती आणि उत्पादन होणारी हळद ८५ ते ९० लाख पोती म्हणजेच १०७ ते ११३ पोती हळद बाजारात विक्रीस येणार आहे. त्यामुळे हळदीचे उत्पादन एक कोटी पोत्यांच्यावर झाले तर हळदीच्या तेजीला हे उत्पादन घातक ठरू शकते, असा अंदाज हळद उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशात यंदा हळदीच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. दरवर्षी देशात एक कोटी पोती बाजारात येतात. यंदा उत्पादन एक कोटी पोत्यांपेक्षा अधिक होईल. त्यामुळे वाढलेले उत्पादन हे तेजीला पोषक नाही.
- मनोहर सारडा,हळद व्यापारी, सांगली.

राज्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी हळद वाढीच्या दरम्यान, पावसाचा खंड झाला. त्यातच मराठावाडा, विदर्भात पाण्याचा अभाव असल्याने रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पादन स्थिर राहील.
- डॉ. जितेंद्र कदम, सहयोगी प्राध्यापक,  पदवीत्तर संस्था, रोहा, जि. रायगड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of growth in turmeric production in the country