वृक्षसंगोपन केल्यास सातबारा मिळतो मोफत

मुकुंद पिंगळे
Friday, 20 November 2020

दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. हीच बाब ओळखून सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यातील खोकरविहीरचे तलाठी एस.बी.शेलार यांनी वृक्षसंगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा स्वखर्चाने मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

नाशिक : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षसंगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे. अलिकडच्या काळात स्वतंत्र जंगल निर्मिती शक्य नसली तरी पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर रोप लागवड करून त्यांचे संगोपन करता येते.यातून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. हीच बाब ओळखून सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यातील खोकरविहीरचे तलाठी एस.बी.शेलार यांनी वृक्षसंगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा स्वखर्चाने मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

हेही वाचा : फायदेशीर डाळिंब शेतीसाठी...

झाड जगविणे ही काळाची गरज आहे आहे,याच उद्देशाने  आदिवासी पाड्यावर वृक्ष लागवडीसोबत संगोपनाची चळवळ रुजविण्यासाठी एस.बी.शेलार यांनी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून वृक्ष  संगोपन व जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे|पक्षीही सुस्वरे आळवीती" हा  संतविचार  प्रसिद्धी पत्रकावर छापून आदिवासी गावांमध्ये मुख्य ठिकाणी लावण्यात आले आहे.  या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी कोतवालांची मदत घेऊन परिसरात दवंडी,थेट भेटी दिल्या जात आहेत.  सातबाऱ्याची फी ही अवघी १५ रुपये आहे. मात्र जनजागृती हा उद्देश समोर ठेऊन आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जात आहे. तलाठी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी शेती, घर परिसरात वृक्षाचे योग्य संगोपन करावे आणि त्याचा फोटो तलाठी कार्यालयास कळविल्यानंतर सातबारा मोफत देण्यात येत आहे. 

हेही वाचा : कंत्राटी शेती : फायद्याची की शोषणाची?

ग्रामविकासाच्या कार्यात वृक्षलागवड व संगोपन चळवळ वृंद्धीगत व्हावी हा मुख्य उद्देश आहे.सातबाऱ्याची रक्कम मोठी नाही, मात्र वृक्ष संगोपन  चळवळ वाढीस लागावी,यासाठी हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. लावलेल्या वृक्षाचे योग्य संगोपन करावे अन या उपक्रमात सहभागी व्हावे अशी शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली आहे.
-एस. बी. शेलार, (तलाठी, खोकरविहीर, ता.सुरगाणा, जि. नाशिक)

हेही वाचा : ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन करणारी करार शेती

अशी आहे सातबारा देण्याची पध्दत   
तलाठी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या  कुठल्याही भागात झाड लावावे आणि त्याचे पालकत्व स्वीकारून जबाबदारी घ्यावी.शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन झाडांचे संगोपन व झाडासोबतचा एक फोटो तलाठी यांच्याकडे व्हाट्सॲपवर पाठवावा. असे करणाऱ्या खातेदारास मोफत सातबारा तलाठी कार्यालयामार्फत देण्यात येत आहे. आत्तापर्यंत तीस शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला आहे. 

कार्यक्षेत्रातील गावे - खोकरविहीर, कहांडोळपाडा, खिर्डी, भाटी, बेलशेत, खोबळादिघर
एकूण शेतकरी संख्या :  साधारण पाच हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To provide Satbara free of cost to the farmers