परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तीन लाख क्विंटल कापूस खरेदी

प्रतिनिधी
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

परभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३ क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली.

परभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३ क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली.

कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्या परभणी विभागात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदाच्या खरेदी हंगामामध्ये पणन महासंघातर्फे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. परंतु खुल्या बाजारातील कापसाचे दर आधारभूत किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस खरेदी झाली नाही. भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) खासगी व्यापाऱ्याप्रमाणे बाजार भावाने खरेदी सुरू केली आहे. 

सध्या परभणी जिल्ह्यातील १० आणि हिंगोली जिल्ह्यातील ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. परभणी जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) ३२६ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयकडून सरासरी ५ हजार ४५० रुपये दर मिळाले. खासगी व्यापाऱ्यांकडून २ लाख ८५ हजार २४८ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल ५ हजार ४६० ते ५ हजार ७१५ रुपये दर मिळाला. 

हिंगोली जिल्ह्यात सीसीआय तर्फे १ हजार ४४९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये दर मिळाला. खासगी व्यापाऱ्यांकडून १७ हजार ६५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रतिक्विंटल ५ हजार ४६०  ते ५ हजार ५८० रुपये दर मिळाले असे सूत्रांनी सांगितले.

एकूण कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
जिल्हा    कापूस खरेदी
परभणी    २,८५,२४८    
हिंगोली    १७,०६५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase three lakh quintals of cotton in Parbhani, Hingoli districts