रब्बीसाठी ३८ टक्के क्षेत्रावर पेरणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

राज्यातील रब्बीच्या ५६ लाख ९३ हजार हेक्‍टरपैकी २१ लाख ३८ हजार हेक्‍टरवर म्हणजेच, ३८ टक्के पेरण्या आतापर्यंत झाल्या आहेत. 

नाशिक - राज्यातील रब्बीच्या ५६ लाख ९३ हजार हेक्‍टरपैकी २१ लाख ३८ हजार हेक्‍टरवर म्हणजेच, ३८ टक्के पेरण्या आतापर्यंत झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

गेल्यावर्षी याच कालावधीत १९ लाख ३० हजार २४३ हेक्‍टरवर पेरण्यात झाल्या होत्या. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या, तरीही अमरावती आणि नागपूर विभागातील पेरा साडेतीन लाख हेक्‍टरने कमी झाला आहे.

अमरावती विभागात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ४६ हजार ७६४, तर नागपूर विभागात ४ लाख ११ हजार ८०५ हेक्‍टर इतके आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत अनुक्रमे या विभागात ३ लाख ७१ हजार आणि १ लाख ८० हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा अमरावतीमध्ये ८७ हजार ६९८, नागपूरमध्ये १ लाख ४ हजार ३६६ हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. 

उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे यंदा साखर उत्पादन घटणार

बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा कमी पेरण्यांमध्ये समावेश आहे. याखेरीज नाशिक विभागात ४१ हजार ८६७ हेक्‍टरवर कमी पेरण्या झाल्या आहेत. नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांचा त्यात समावेश असून विभागाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३० हजार ५१८ हेक्‍टर आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत इथे ९८ हजार १०७ हेक्‍टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा आतापर्यंत ५६ हजार २४० हेक्‍टरवर पेरण्या उरकल्या आहेत. 

मका, ज्वारीला रोगाने ग्रासले
रब्बीची पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मका व ज्वारी पिकावर लष्करी अळीने थैमान घातले आहे. हरभऱ्यावर हेलिको व्हर्पा कीडीचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 

अवकाळीचा दणका 
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीचा गेल्या महिना अखेरपर्यंत कृषी विभागाला उपलब्ध झालेल्या अहवालानुसार ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यातील ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्‍टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, बाजरी, मका, तूर, भूईमूग, नाचणी, संत्री, लिंबू, डाळिंब, पपई आणि भाजीपाला पिकांचा त्यात समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabi sowing for 38 per cent of the area