उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे यंदा साखर उत्पादन घटणार

प्रतिनिधी
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. साखर हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पादनात घट झाल्याने साखर उत्पादनात यंदा मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुणे -साखर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात पाणी, चाराटंचाई व पुरामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे साखर हंगाम धीम्या गतीने सुरू झाला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. साखर हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पादनात घट झाल्याने साखर उत्पादनात यंदा मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. पुणे जिल्ह्यात अजूनही पूर्णपणे सर्व कारखाने सुरू झालेले नाही. आता डिसेंबर महिना सुरू झाला असून, येत्या आठवडाभरात सर्व कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात संथ गतीने हंगाम सुरू झाला आहे. साखर कारखाना स्थळावर ऊसतोड मजुरांच्या टोळ्याही परिसरात कमी दाखल झाल्या असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

चालू वर्षी उसाच्या टंचाईमुळे सुमारे ८२ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३५ लाख ८२ हजार टनाने गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा दिसत असला, तरी पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. त्यामुळे हंगामात उसाची परिस्थिती बिकट झाल्याने साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याच जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे व पाणीटंचाई व चाराटंचाईमुळे जवळपास ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या वर्षीचा विचार केल्यास गतवर्षी एक डिसेंबरपर्यंत सर्वच कारखाने सुरू झाले होते. यंदा या कालावधीत अजूनही निम्मेही साखर कारखाने सुरू झालेले नाहीत.

पुणे जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ८५ लाख टन साखरेचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे जवळपास ३५ हजार हेक्टरने उसाच्या लागवडीत घट झाली असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे एक लाख ३७ हजार ९०४ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा : केरळमधील शेतकऱ्यांनी जपल्या २५६ भातजाती

मागील वर्षी कारखान्यांनी सुमारे १ कोटी २० लाख टन उसाचे गाळप केले होते. चालू वर्षी ८२ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सहकारी कारखान्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, विघ्नहर, भीमाशंकर आणि खासगी साखर कारखान्यामध्ये अनुराज शुगर्स असे एकूण चार साखर कारखाने सुरू झाले आहे. या साखर कारखान्यांनी ४२ हजार ९८७ टन उसाचे गाळप केले असून, त्यातून २३ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ५.५१ टक्के एवढा आहे, असे पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षी ऊस गाळपाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. यामुळे कारखानेही उशिराने सुरू झाले असून, साखर उत्पादनातही घट होईल. 
- धनंजय डोईफोडे,  प्रादेशिक सहसंचालक, पुणे विभाग, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar production will decline this year due to reduced sugarcane area

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: