लोकसहभागातून ग्रामस्थांनी केली पाझर तलावाची दुरुस्ती

भगवान जगदाळे 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे, जि. धुळे : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारामध्ये ३ ऑक्‍टोबर २०१६ रोजी फुटलेल्या घटबारी पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग आणि श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. गावकऱ्यांनी मे २०१७ मध्ये सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी काम जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केले. लोकसहभागातून ५६ लाखांचे काम केवळ ते दहा लाखांत पूर्ण झाले.

निजामपूर-जैताणे, जि. धुळे : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारामध्ये ३ ऑक्‍टोबर २०१६ रोजी फुटलेल्या घटबारी पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग आणि श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. गावकऱ्यांनी मे २०१७ मध्ये सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी काम जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केले. लोकसहभागातून ५६ लाखांचे काम केवळ ते दहा लाखांत पूर्ण झाले.

घटबारी पाझर तलावाच्या दुरूरुस्तीसाठी औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानतर्फे चार लाख; तर देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशनतर्फे दीड लाखाची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे तीन-साडेतीन लाख रुपये निधी जमवला. सुमारे ५६ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम सुमारे दहा लाखांत पूर्ण झाले.

पाच हजार एकर जमीन ओलिताखाली
घटबारी पाझर तलावामुळे सुमारे चार ते पाच हजार एकर जमीन ओलिताखाली आली असून, एक हजारावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. पाझर तलावाच्या परिसरातील विहिरींमध्ये अवघ्या पाच ते दहा फुटांवर जलसाठा आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कापूस, कांदा, मिरची, डाळिंब, मका, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे.

पाझर तलावामुळे परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. खुडाणे व डोमकानी ही दोन्ही गावे वगळता अन्यत्र पाच किलोमीटर परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने  पाझर तलावामुळे ही समस्या निकाली निघाली. साधारण जून-जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी पाझर तलावामध्ये शिल्लक आहे.

पाझर तलाव फुटल्यानंतर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकर शेतजमिनीचा पंचनामा झाला होता. परिसरातील शेतकऱ्यांच्या सुमारे साडेचारशे ते सहाशे विहिरी गाळाने बुजल्या होत्या. उभी पिके नष्ट झाली होती. जनावरे मृत्युमुखी पडली होती; परंतु शासनाकडून आजतागायत एक पैसाही मोबदला मिळालेला नाही, अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शासनाने नुकसान भरपाई दिल्यास पाझर तलावाची दुरुस्ती
पाझर तलावामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत प्रचंड चांगली वाढ झाली असून, त्यामुळे या वर्षी शेतीत पिके चांगली आली आहेत. शासकीय पातळीवरून जर नुकसान भरपाई मिळाली, तर तो पैसा आम्ही घटबारी जलसंधारण समितीकडे सुपूर्त करून पाझर तलावाच्या दुरुस्तीची उर्वरित कामे पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी उत्तम हेमाडे, दशरथ हेमाडे, राजसबाई हेमाडे, दादाजी गवळे, हिलाल गवळे आदींनी दिली   आहे.

निजामपूर-जैताणेसह  माळमाथा परिसरात अनुकरण
खुडाणे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून निर्माण झालेल्या घटबारी  पाझर तलावाच्या या आदर्शवत कामाचे अनुकरण संपूर्ण माळमाथा परिसरात होत आहे. त्यानुसार नुकतेच रायपूर व कळंभीर येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सालदरा पाझर तलावातील गाळ काढायच्या कामाला सुरवात केली; तर निजामपूर-जैताणेतील ग्रामस्थांनीही लोकसहभागातून रोहिणी नदीच्या पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.

घटबारी पाझर तलावाच्या दुरुस्तीचे खरे श्रेय खुडाणे ग्रामस्थांसह खुडाणे ग्रामपंचायत, घटबारी जलसंधारण समिती, स्थानिक ट्रॅक्‍टर युनियन, अनुलोम, देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशन, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान (औरंगाबाद) यांच्यासह ज्यांनी श्रमदानासह आर्थिक योगदान दिले, अशा सर्व ज्ञात-अज्ञात लोकांना जाते. 
-पराग माळी, (सरपंच, खुडाणे)

अवघ्या आठ महिन्यांत लोकवर्गणी, लोकसहभाग व श्रमदानातून पाझर तलावाची दुरुस्ती ही जिल्ह्यातीलच नव्हे; तर राज्यातील विशेष घटना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खुडाणे ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत.
- गणेश मिसाळ,  प्रांताधिकारी, धुळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rehabilitation of lake by villagers through public participation