भाजीपाला उत्पादनातून मनपाडळेच्या महिला झाल्या सक्षम

एस. आर. माने
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

भाजीपाला उत्पादन व विक्रीव्दारे महिलांना दरमहा ६००० रुपये इतके उत्पन्न मिळे लागले. तसेच रोजच्यारोज शेतातील ताजा भाजीपाला खायला मिळू लागला. महिलाच्या हातामध्ये खेळता पैसा आल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचाच नव्हे तर समाजाचा दृष्टीकोन बदलला.

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करुन त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचे काम कोल्हापूर जिल्हयात महिला आर्थिक विकास महामंडळाने हाती घेतले आहे. हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून 9 बचतगटातील 30 महिलांनी एकत्र येऊन 19 एकर जमीनीमध्ये भाजीपाला उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. 

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कोल्हापूर जिल्यातील पाच तालुक्यातील १०८ गावामध्ये काम सुरु आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यामातून तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलांचे सहा लोकसंचलीत साधन केंद्रे स्थापन केली आहेत. 

मनपाडळे  हे गाव हातकणंगले तालुक्यात आहे. गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. येथील शेतकरी अल्पभूधारक आहेत.  तर  बरेचसे ग्रामस्थ भूमिहिन आहेत.  ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय, कुकुटपालन व कंपन्यामध्ये मजुरी यासारखे व्यवसाय येथे चालतात. गावातील लोकाचा चरितार्थ शेती व पशुपालनावरच आहे. शेती व दुधाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपले कुटुंब चालवतात.

 माविममार्फत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्याक्रमांतर्गत स्थापन केलेल्या प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून मनपाडळे गावात बचत गट स्थापन करण्याच्या कामास प्राधान्य दिले. गावाची लोकसंख्या ४ हजार ५०० इतकी असूनही येथे एकही महिला बचत गट नव्हता. परंतु माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांच्या पुढाकाराने २०११ साली बचत गट स्थापन करण्यात आले.  सुरवातीला गावामध्ये एकच गट सुरु करण्यात आला. नंतर सहयोगिनी व ग्रामस्थांच्यामदतीने गावामध्ये ३० बचत गट स्थापन झाले. या गटाच्या माध्यमातून महिलांना  विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्याने बचत गटातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला.  महिला बचत गटांना बँकेच्या माध्यमातून व माविमच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले.

बचत गटातील सर्व महिलांची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे सतत काहीतरी करण्यासाठी त्या धडपडत असतात. या जिद्दीने त्यांनी शेतीव्यवसायात एकसुत्रीपणा आणून त्याव्दारे अधिक उत्पादनातून आथिक परिवर्तनाचा ध्यास त्यांनी घेतला. यासाठी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी पुढाकार घेऊन सर्व महिलांना प्रोत्साहन दिले. परंपरागत शेतीमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे उत्पन्न निघत नव्हते,  त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर कामाला जावे लागते. म्हणून गावातील सर्व महिलांनी मिळून व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानंतर सहयोगिनींनी गावातील बचतगटाच्या सर्व महिलांना एकत्र करुन त्यांना भाजीपाला व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींची माहिती दिली. यातून सर्व महिलांनी भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवसाय करण्याचे निश्चित केले. यासाठी गावातील  नऊ बचतगटातील ३० महिलांनी पुढाकार घेऊन भाजीपाला व्यवसायाचा प्रस्ताव तयार केला. 2015 मध्ये MLP ची स्थापना केली. या सर्व महिलांकडे ४५ एकर जमीन आहे. भाजीपाला व्यवसायावर होणारा खर्च कमी करणे व उत्पादनात वाढ करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन MLP तयार केला. MLP चा उद्देश साध्य करण्यासाठी माती- पाणी परीक्षण, गादी व वरंबा पद्धतीचा अवलंब, विविध शासकीय योजनांचा लाभ, नवीन बी-बियाणांचा वापर, खतांची योग्य मात्रा, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब या गोष्टींना प्राधान्य दिले.

बचतगटातील ३० महिलांनी भाजीपाला लागवडीसाठी १९ एकर जमीनीचा वापर केला. महिलांना भाजीपाला व्यवसायामध्ये बी- बियाणे, ठिबक तसेच तुषार सिचंन, रोपवाटिका यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ लाख, आयसीआयसीआय बँकेकडून 9 लाखाचे कर्ज उपलब्ध करून प्रगतशील शेती करण्यास प्रारंभ केला. या महिलांना माविमच्या माध्यमातून 2 लाखाचे अर्थ सहाय्य देण्यात आले. महिलांना शेतीमध्ये  ठिबक तसेच तुषार सिंचन संच बसवून घेतले. तसेच नवीन बी- बियाणे, फवारणी पंप, कटर इत्यादी आवश्यक बाबी खरेदी केल्या. या सर्व महिलांना माविमच्या पुढाकाराने ३ दिवसाचे भाजीपाला व्यवसायाचे  प्रशिक्षण देण्यात आले.   प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांनी शेतातील मातीचे व पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांना शेताची आरोग्य पत्रिका तयार करून घेतली.  त्यामध्ये औषधांचे प्रमाण किती वापरायचे याची माहिती त्यांना मिळाली. स्वत: रोपवाटिका रोपे तयार केली. नवीन बियाणांचा वापर केला. पिक पद्धतीमध्ये बदल केला. अंतर्गत पिक लागवड व हंगामानुसार पिक घेण्यात आले. भाजीपाल्याबरोबरच काही महिलांनी  आंतरपीकही घेतले. त्यामुळे या व्यवसायावर होणार  खर्च कमी झाला.

महिलांनी भाजीपाला उत्पादनात वेळोवेळी योग्य खतांचा मात्रा वापरल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारले. खतांवरील खर्च कमी झाला. तसेच त्यांना भाजीपाल्याचे मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी जुगाई गाव विकास समितीच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडी बाजार चालू करण्यात आला.  महिलांनाही गावामध्ये ताजा भाजीपाला मिळू लागला. भाजीपाला उत्पादन व विक्रीव्दारे महिलांना दरमहा ६००० रुपये इतके उत्पन्न मिळे लागले. तसेच रोजच्यारोज शेतातील ताजा भाजीपाला खायला मिळू लागला. महिलाच्या हातामध्ये खेळता पैसा आल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचाच नव्हे तर समाजाचा दृष्टीकोन बदलला. महिलांच्या या नाविण्यपूर्ण व्यवसायामुळे घरातील निर्णय प्रक्रियेत त्यांना मोलाचे स्थान मिळाले.

              (लेखक कोल्हापूर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S R Mane article