सरपंच परिषद राबविणार ‘ग्रामविकास’ पर्यटन उपक्रम

सूर्यकांत नेटके 
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

राज्यभरात आदर्श गाव हिवरेबाजार, राळेगण सिद्धी या गावांचा आदर्श घेऊन अनेक गावांत लोकसहभाग, श्रमदानातून कामे सुरू आहेत. मात्र अजूनही अनेक गावे पुढे आलेली नाहीत. त्यामुळे आता राज्य सरपंच परिषद स्वयंस्फूर्तीने कामे करणारी शंभर गावे जाहीर करून त्यांचे काम राज्यासमोर आणणार आहे.

नगर - राज्यभरात आदर्श गाव हिवरेबाजार, राळेगण सिद्धी या गावांचा आदर्श घेऊन अनेक गावांत लोकसहभाग, श्रमदानातून कामे सुरू आहेत. मात्र अजूनही अनेक गावे पुढे आलेली नाहीत. त्यामुळे आता राज्य सरपंच परिषद स्वयंस्फूर्तीने कामे करणारी शंभर गावे जाहीर करून त्यांचे काम राज्यासमोर आणणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून तीन गावे त्यासाठी निवडून त्या गावांचा गौरवही केला जाणार आहे. शिवाय सरपंच निवडून आला की त्या सरपंचाला दहा गावे सरपंच परिषद दाखविणार आहे. त्यासाठी सरपंच परिषद ‘ग्रामविकास’ पर्यटन उपक्रम सुरू करणार आहे. 

ग्रामविकासाचा हेतू घेऊन राज्यात लोकसहभागाची चळवळ सुरू झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी आणि आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या पुढाकारातून हिवरे बाजार गावाने आदर्श काम करत राज्य, देशात नाव नेले. या दोन्ही गावांचा आदर्श घेऊन राज्यात अनेक गावांतही लोकसहभाग, श्रमदानातून कामे केली जात आहेत. मात्र अनेक गावांचे काम अजूनही राज्यासमोर आले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने अशी चांगली कामे करणाऱ्या शंभर गावांचे काम पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चांगले काम आहे, मात्र सरकार आणि अन्य संस्थांकडूनही दुर्लक्षित असलेल्या राज्यभरातील साधारण प्रत्येक तालुक्यातून तीन गावे निवडली जाणार आहेत. त्या गावांची माहिती राज्यातील जास्तीत जास्त सरपंचांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. त्या अनुषंगाने ‘ग्रामविकास’ पर्यटन उपक्रम उपक्रम परिषद सुरू करत आहे. त्यातून एका विभागातील सरपंचाला दुसऱ्या विभागातील दहा गावे दाखवली जाणार आहेत. 

राज्यात दरवर्षी २७ हजारांपैकी साधारण पाच ते सहा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतात, त्यामुळे निवडणूक झाली की परिषद नवीन सरपंचाशी संपर्क करेल. केवळ गावांनी केलेले चांगले कामच नव्हे तर त्या-त्या भागातील शेती, पाणी व्यवस्थापन व अन्य बाबीही दाखवण्याचा प्रयत्न असेल. जी गावे चांगली काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम परिषद करणार आहे. चांगले काम करणाऱ्या सरपंचांचा गौरवही करणार आहोत, असे परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले.

चांगले काम करणाऱ्या गावांचे, सरपंचांचे काम पुढे आणणे हाच सरपंच परिषदेचा मुळ हेतू आहे. त्यामुळे ‘ग्रामविकास पर्यटन’ उपक्रम ही संकल्पना पुढे आली. नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना परिषद दहा गावांचे काम दाखविणार आहे. चांगले काम करणाऱ्या सरपंचांचा गौरवही करणार आहोत. 
- जयंतराव पाटील कुर्डूकर, संस्थापक अध्यक्ष, सरपंच परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch Parishad implemented Rural Development tourism activities