Sharad Pawar : शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची धडपड भविष्यासाठी फायद्याची ठरणार; शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar : शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची धडपड भविष्यासाठी फायद्याची ठरणार; शरद पवार

माळेगाव : शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली. तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नवीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत. हीच बाब अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात केली.

शारदानगर (ता.बारामती) येथील कृषिक प्रदर्शास आज ( चौथा दिवस) शरद पवार, राज्याची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे तसेच आमदार निलेश लंके, आमदार रोहित पवार यांनी कृषी प्रदर्शनाला धावती भेट दिली. या ठिकाणी शेतीतील नवीन प्रात्यक्षिके व नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी तज्ञांकडून घेतली.

त्यावेळी सायन्स पार्कमध्ये पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,`` या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे. मागील पंधरा वर्षात जी शेती विषयक धोरणे झाली, त्यातून अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. 262 दशलक्ष टणावरून आज 300 दशलक्ष टणाच्यापुढे गेलेले अन्नधान्याचा साठा हेच दर्शवते की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे.

या कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले. त्यांनाही हे नवे तंत्रज्ञान खुणावत आहे. 80 टक्के ही तरुणांची या प्रदर्शनामधील संख्या पाहून मला अतिशय आनंद वाटला.`` ``शेतीतील हे नवे बदल टिपण्याबरोबरच आता नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग शेतीमध्ये सुरू होत आहे.

त्या दृष्टीने बारामती मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र सुरू होत आहे. त्यामुळे शेती आणि शेतीच्या क्रांतीमध्ये खूप मोठा बदल होईल,`` असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सीईओ निलेश नलावडे यांनी केले. दुसरीकडे, कृषिक प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कृषि विज्ञान केंद्र प्रशासनाने सोमवार (ता.२३) रोजी एकदिवस प्रदर्शन कालावधी वाढवल्याचे सांगण्यात आले.