‘मार्केट’केंद्रित उत्कृष्ट शेडनेट शेती

shednet Farming
shednet Farming

अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा अभ्यास, व्यापाऱ्यांशी नेटवर्क आणि तांत्रिकदृष्ट्या चांगले व्यवस्थापन हीच वैशिष्ट्ये आहेत कडबनवाडी (जि. पुणे) येथील तानाजी शिंगाडे यांची. याच जोरावर अडीच एकरांवरील रंगीत ढोबळी मिरची, काकडी व  खुल्या शेतात दर्जेदार टोमॅटोची शेती त्यांनी यशस्वी केली आहे. म्हणून आपल्या दर्जेदार मालाला चांगला दरही मिळवण्यात ते कायम यशस्वी होतात. 

इंदापूर हा पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात माळरानावर सुमारे एक ते दोन हजार लोकसंख्येचे कडबनवाडी गाव वसले आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते. गावात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे क्षेत्र आहे. ठिबक सिंचन, पॉली मल्चिंगचा वापर करून येथील युवा शेतकरी संरक्षित व अत्याधुनिक शेतीकडे वळले आहेत. गावात दहा ते पंधरापर्यंत शेडनेट व पॉलीहाउसेस आहे. त्यामुळे गावची ओळख शेडनेटवाडी अशीही करता येऊ शकते. 

अभ्यासू युवा शेतकऱ्याची शेती 
गावातील तानाजी शिंगाडे हे अभ्यासू शेतकरी आहेत. त्यांची सोळा एकर शेती आहे. पूर्वी डाळिंब त्यांचे मुख्य पीक होते. मात्र हे क्षेत्र कमी करून संरक्षित शेती म्हणजेच शेडनेटकडे वळल्याचा निर्णय त्यांनी अभ्यास व शेतकऱ्यांच्या चर्चेतून घेतला. पिकांचा तांत्रिक अभ्यास करीत उत्तम व्यवस्थापनातून हे पीक तानाजी यांनी यशस्वी केले. या शेतीत आत्मविश्‍वास आल्यानंतर मग त्याचा विस्तार केला. 

तानाजी यांची आजची शेती 
सध्या शेडनेटमध्ये 
  ढोबळी मिरची- अडीच हेक्टर- मेमधील लागवड 
  मिरची काढणीनंतर नोव्हेंबरमध्ये काकडी 
खुल्या शेतातही 
  ढोबळी- पाच एकर 
  टोमॅटो- दीड एकर
  अन्य डाळिंब 
तानाजी सांगतात
  ढोबळी मिरची हिरवी किंवा रंगीत (लाल किंवा पिवळी) असे विकण्याचे पर्याय 
  बाजारपेठांचा अभ्यास करून ज्याला दर चांगले त्या रंगातील मिरचीची विक्री  
  हिवाळ्यात काकडीची खुल्या शेतात चांगली वाढ होत नाही. अशावेळी शेडनेट फायदेशीर होते. 
उत्पादन
  ढोबळी मिरची
  हिरवी- ४० ते ४५ टन- दर १७ ते १८ रुपये प्रतिकिलो 
  रंगीत मिरची- त्यापेक्षा १० टनाने कमी- दर- ३० ते ७० रुपये  काकडी- ४० ते ५० टन
मुख्य बाजारपेठा
पुणे, मुंबई, नवी दिल्ली 
मजबूत नेटवर्क उभारल्याचा फायदा 
  तानाजी यांनी रोपवाटिकाधारक, बियाणे उद्योग, व्यापारी व शेतकरी अशा सर्वांचे मजबूत नेटवर्क उभारले आहे. 
मालविक्रीपूर्वी ते यातील विविध व्यक्तींशी बोलून दरांची 
माहिती घेतात.
  उत्पादनाची क्वालिटीही चांगली असते. त्यामुळे दर चांगला मिळण्यास मदत होते. 
  कोलकता, बिहार भागात हिरव्या मिरचीला अधिक मागणी असल्याने तेथे माल जातो.
  रंगीत ढोबळीसाठी मुंबई व दिल्ली मार्केट चांगले असल्याचे तानाजी सांगतात. 

तानाजी यांच्या  शेतीची वैशिष्ट्ये  
  शेडनेटमध्ये पॉली मल्चिंगचा वापर. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होऊन उत्पादनात चांगली वाढ होते असा अनुभव आला. मग खुल्या शेतातही मल्चिंगचा वापर करण्यास सुरवात
  त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन पाण्याची व काही प्रमाणात खुरपणी खर्चातही बचत 
  तीन विहिरी. कॅनोलचीही मदत. दररोज ठिबकद्वारे ३० मिनिटे पाणी.   
  शेडनेटमध्ये लागवडीपूर्वी शेणखत, कोंबडी खत आदींचा आठ ते दहा ट्रेलर असा वापर.
  लागवडीनंतर निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा, स्युडोमानास आदी जैविक घटकांचाही वापर
  रासायनिकपेक्षा जैविक निविष्ठा वापरण्यावर भर 
  माल पाठविताना खास करून पॅकिंगवर लक्ष. काकडीची प्रतवारी करून २० किलो कॅरिबॅग तर सिमला मिरची तीस किलो बॉक्स पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविली जाते. त्यामुळे चांगले दर मिळण्यास मदत  
  शेडनेट उभारणीसाठी एकरी १६ लाख रुपये भांडवल. बॅंकेकडून घेतले कर्ज.

वर्षभर मजुरांना रोजगार 
शेतीत वर्षभर विविध पिके व शेडनेटचा वापर असल्याने मजुरांना वर्षभर संधी उपलब्ध असते. त्यादृष्टीने  सध्या एकूण १० ते १२ मजूर कार्यरत असून त्यांना चांगला रोजगार मिळाला आहे. साहजिकच मजूरही आपल्या कामांत कुशल झाले आहेत. 

घरच्यांची मोठी मदत व मार्गदर्शन 
तानाजी यांना वडिलांसह आई सौ. शालन, भाऊ अनिल यांची मदत शेतीत होते. पत्नी सौ. मनिषा ट्रॅक्टर चालवतात. मजुरांचे नियोजन, पीक काढणी आदी कामांत त्यांचा महत्त्वाचा हातभार असतो.  नातेवाईक अतुल शिंगाडे यांचे मोलाचं मार्गदर्शन मिळते. उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव, मंडल कृषी अधिकारी के. आर. माळवे, कृषी सहाय्यक ए. बी. धेंडे यांचे मार्गदर्शन लाभते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तानाजी यांच्या शेडनेट शेतीला भेट देऊन तंत्रज्ञान समजावून घेतले आहे. नव्या तंत्रज्ञानाची इंटरनेट, व्हॉटस ॲप ग्रुपद्वारेही माहिती घेत तानाजी ज्ञानवृध्दी करतात.  

जोडओळ  पद्धतीने  टोमॅटो
तानाजी यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना टोमॅटोत जोडओळ पद्धतीचा वापर केला आहे. यामध्ये चार फुटी पट्टा ठेवला आहे. या पद्धतीमुळे जागा रुंद मिळाल्याने फवारणी करणे सोपे होते. खते देणे, खुरपणी करणे, मालाची काढणी अशा बाबी देखील सुलभपणे करता येतात. झाडांच्या वाढीसही त्यामुळे चांगली चालना मिळते. 

 तानाजी शिंगाडे, ९८९०४२९०८९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com