शेतीमाल बाजारासाठी नवे वर्ष आशादायक

शेतीमाल बाजारासाठी नवे वर्ष आशादायक

येत्या वर्षात शेतीमाल बाजारपेठ तेजीत राहिली तर आश्चर्य वाटायला नको. यापुढील काळात संयम महत्त्वाचा ठरेल. नवीन पिकांमध्ये सुरुवातीचा आवकीचा बहर ओसरला, की किमतींत सुधारणा होतील. हा कालावधी मागील काही वर्षांत ३-४ महिन्यांचा राहिलेला आहे. परंतु पुढील काळात तो खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. याला कारण अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणांची अंमलबजावणी. यामुळे अन्नप्रक्रियादार आणि साठेबाज व्यापारी सुरुवातीच्या काळातच मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा नवीन कल प्रस्थापित होईल आणि त्यामुळे थोड्याच दिवसांत किंमत सुधारणा दिसू लागतील, असे अनेक कमोडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. याचे उदाहरण म्हणजे मागील वर्षातील मोहरी आणि सोयाबीनमधील तेजी. एकंदरीत वरील घटकांचा विचार करता २०२१ शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, अशी आशा केल्यास वावगे ठरणार नाही.

लवकरच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या आणि एकंदर मानव जातीच्या दृष्टीने चालू वर्ष म्हणजे कोरोनाच्या भयानक साथीमुळे काळे वर्ष म्हणूनच पहिले जाईल. परंतु शेतीमाल क्षेत्राचा विचार करता आलेल्या सक्तीच्या आणीबाणीसारख्या स्थितीमुळे या क्षेत्रामध्ये अनेक मोठे बदल अत्यंत वेगाने घडून येत आहेत. त्यातून पुढील काळासाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. अर्थात, यात तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्राचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. थोडक्यात, शेतीमाल विपणनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने व्यापार, आधुनिक गोदामीकरण आणि मालवाहतूक यांना चालना, तसेच इलेक्ट्रॉनिक व्यापार मंचांची निर्मिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन यामुळे पुरवठा साखळीत मोठे बदल अपेक्षित आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्राहक आणि उत्पादक यांच्यामधील अंतर आणि शोषणकर्त्या दलालांची साखळी कमी होऊ शकते. त्याचा उत्पादकांना फायदा होईल. हे घडून येण्याच्या दृष्टीने आश्वासक वातावरण निश्चितच निर्माण झाले आहे. त्यामुळे सन २०२१ मध्ये जाताना कृषी सुधारणा कायदे राहोत न राहोत, बाजार समित्या आपले काम करोत ना करोत, परंतु त्यातील राजकारणाला आपल्या जागी ठेवत आणि तंत्रज्ञानाची कास धरत शेतीमाल व्यापार नवीन स्वरूपात  पुढे जातच राहील. या प्रक्रियेत खाच -खळगे येतच राहतील किंवा निर्माण केले जातील. परंतु  शेती पुढे जातच राहील इतपत पराक्रम शेतकऱ्यांनी कोरोना काळात निश्चितच करून दाखवला आहे.  

कोरोना अजून संपायचे नाव घेत नाही. उलट भारताबाहेर त्याने नवीन आव्हाने निर्माण केली आहेत. लॉकडाउन वेगवेगळ्या स्वरूपात होतच आहेत. मात्र कृषी क्षेत्र हे एकच क्षेत्र असे आहे की सर्व प्रतिकूल परिस्थितीत त्याने सातत्य दाखवले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत जेवढी आव्हाने वाढत आहेत तेवढेच महत्त्व अन्नधान्य उत्पादनाला प्राप्त होत आहे. याचा सर्वात मोठा फायदा भारतासारख्या अतिरिक्त धान्य आणि इतर शेतीमाल पिकवणाऱ्या देशाला कसा घेता येईल यावर येथील धोरणकर्त्यांचा कस लागणार आहे.

प्रचंड उत्पादन - समस्या नव्हे संधी
शेतीमालासाठी २०२१ कसे राहील याचा विचार करता असे दिसत आहे की अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन त्याचा अपेक्षित परिणाम कोरोना साथीवर होण्यास निदान अजून ९ महिने लागतील. त्यामुळे २०२१ मध्ये अन्नधान्य क्षेत्रात परावलंबी असणारे सर्वच देश परत एकदा अन्न पदार्थांच्या साठेबाजीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यात गहू, तांदळापासून इतर पोषक अन्नपदार्थ आणि प्रथिनेयुक्त पोल्ट्री - मांसाहारी पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे प्रचंड अन्न उत्पादन ही समस्या न राहता त्याचे संधीत रूपांतर करण्याची आयती संधी भारताला मिळाली आहे. त्याचे सोने कसे करता येईल याकडे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आपल्या देशात तुरीची आवक सुरू झाली असून, पुढील चार महिन्यांमध्ये रब्बी हंगामाच्या काढण्या सुरू होतील. यात गहू, हरभरा, आणि मोहरी ही प्रमुख पिके आहेत. तर खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाचे मोठे साठे अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षात आपल्या पिकांच्या किमती कशा राहतील याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. परंतु किमतीचे अंदाज बांधण्यापेक्षा त्या ठरवणाऱ्या घटकांकडे पाहणे अधिक योग्य ठरेल.

तेजीचे संकेत
रॅबो बँक या कृषी क्षेत्राशी संबंधित अनुभवी आणि मोठ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार २०२१ मध्ये कृषी आणि अन्नपदार्थांच्या किमती तेजीत राहण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मागील काही महिन्यांत आपण सोयाबीनमधील मजबूत दरस्थिती पाहत आहोतच. या बँकेच्या अनुमानानुसार अमेरिकेत सोयाबीनचे दर बुशेलमागे  १५ डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या भाव १२.५ डॉलर आहे. ला-निना या वातावरणीय बदलामुळे अमेरिका आणि इतर देशांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती शेतीमाल किमतींसाठी आधारभूत ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच अमेरिका, जपान, युरोप आणि काही आशियाई देशांमध्ये अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी घोषित केलेल्या मोठाल्या पॅकेजेसमुळे प्रचंड प्रमाणात चलन छापले जात आहे. अर्थव्यवस्थेच्या नियमानुसार अशा परिस्थितीत पैशाचे अवमूल्यन होऊन त्याचे महागाईमध्ये परिवर्तन होते. ही प्रक्रिया येत्या वर्षात चालूच राहणार आहे. थोडक्यात सांगायचे, तर या परिस्थितीमुळे शेतीमाल बाजारपेठ इतर वस्तूंप्रमाणे प्रमाणे तेजीत राहिली तर आश्चर्य वाटू नये. विशेष म्हणजे या वर्षात डॉलर निर्देशांक मार्चनंतर १० टक्क्यांनी घसरला असून, ही घसरण येत्या वर्षात चालूच राहणार असल्याचे वित्तीय सल्लागारांचे म्हणणे आहे. येथे एक लक्षात घेणे जरुरीचे आहे. डॉलरमधील मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक बाहेर पडते तेव्हा ती शेअर आणि कमोडिटी बाजाराकडे वळत असते.

कमोडिटी बाजाराच्या चालीचा अंदाज घेताना चीनकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त आहे. कारण चीन जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश आहे. अलीकडेच तेथील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चीन सोयाबीनची सुमारे १०० दशलक्ष टनांची विक्रमी आयात करणार आहे. चीनमध्ये  वराहपालन उद्योग रोगमुक्त होऊन पूर्वीच्या स्तराजवळ आल्यामुळे पशुखाद्याला मागणी वाढली आहे. त्यासाठी सोयामिलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ही आयात असेल. एकंदरीत कोरोना काळात जगात सगळ्याच कमोडिटीजना मागणी मंदावली असताना एकट्या चीनने अनेक पदार्थांचा मोठा स्टॉक निर्माण करण्यावर भर दिला होता. त्याचा त्यांना आता महागाईच्या काळात फायदा होत आहे. कोरोनाचा प्रसार अनेक देशांत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत असताना हाच कल पुढे चीनबरोबरच इतर देशांमध्ये देखील दिसून आला. आणि अशी लक्षणे आताच दिसू लागलीत देखील, तर वस्तू बाजारपेठ अजून तेजी दाखवेल हे उघड आहे. कदाचित याची कल्पना असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने देखील महागाई एवढ्यात कमी होण्याची शक्यता नाही, असे म्हटले असावे. भारतात कापूस या महत्त्वाच्या पिकाच्या किमती मागील ३-४ महिन्यांत चांगल्याच सुधारल्या असल्या तरी आजही भारतीय कापूस जागतिक बाजारात ६-८ टक्के डिस्काउंटमध्ये असल्यामुळे निर्यातीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण राहील. जर कोरोनाची स्थिती नियंत्रणात राहिली तर कापसाची मागणी परत एकदा जोर धरून त्याचा किंमतीला फायदा होईल, असे कॉमट्रेंड्झ या जोखीम व्यवस्थापन क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांचे म्हणणे  आहे. 

एकंदरीत यापुढील काळात संयम महत्वाचा ठरेल. नवीन पिकांमध्ये सुरवातीचा आवकीचा बहर ओसरला, की किमतींत सुधारणा होतील. हा कालावधी मागील काही वर्षांत ३-४ महिन्यांचा राहिलेला आहे. परंतु पुढील काळात तो खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. याला कारण अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणांची अंमलबजावणी. यामुळे अन्नप्रक्रियादार आणि साठेबाज व्यापारी सुरवातीच्या काळातच मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा नवीन कल प्रस्थापित होईल आणि त्यामुळे थोड्याच दिवसांत किंमत सुधारणा दिसू लागतील, असे अनेक कमोडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. याचे उदाहरण म्हणजे मागील वर्षातील मोहरी आणि सोयाबीनमधील तेजी. एकंदरीत वरील घटकांचा विचार करता २०२१ शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, अशी आशा केल्यास वावगे ठरणार नाही.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी  मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com