स्मार्ट शेतकऱ्यांचा होणार गौरव 

स्मार्ट शेतकऱ्यांचा होणार गौरव 

पुणे -  संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना यंदाही ॲग्रोवन स्मार्ट ॲवाॅर्डस देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारांचे यंदाचे  हे तिसरे वर्षे असून, राज्यस्तरीय आठ व विभागीय पाच गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०१९ आहे.

राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, असे आहे. तसेच, ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी या पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपल्या धडपडीतून पुन्हा उभं करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यासाठी आहे. तसेच, ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार, ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय, ॲग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण) विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले  जाणार आहे. 

यंदापासून दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ॲग्रोवनने २०१९ हे जलव्यवस्थापन वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी हा पुरस्कार दिला जाईल. कमी पाण्यात उत्तम शेतीचे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार असेल. ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी हा पुरस्कारही देण्यात येणार आहे. आपल्या शेतीमध्ये शास्त्रीय प्रयोग व संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे. विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे.  या पुरस्कारांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली त्रयस्थ निवड समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी करून विजेत्यांची निवड करणार आहे. हा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल. पुणे येथे शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

असे पाठवा प्रस्ताव ः
    राज्यातील कोणीही व्यक्ती स्वतःचा किंवा परिचितांचा प्रस्ताव पाठवू शकते. 
    प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०१९ आहे. 
    प्रस्ताव फक्त दोन पानी असावा. त्यात संबंधिताचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती, वेगळेपण व इतर तपशील नमूद करावेत. याआधी मिळालेल्या पुरस्कारांचीही माहिती द्यावी. 
    प्रस्तावावर तो कोणत्या गटातील पुरस्कारासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा. 
    अतिरिक्त माहिती, तपशील, छायाचित्रे प्रस्तावासोबत जोडता येईल.
    एका व्यक्तीला एकाच पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविता येईल. अधिकचे प्रस्ताव बाद करण्यात येतील.

 

प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : 
    ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डस, 
 ॲग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि., 
५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२ 
    ई मेल : agrowonawards@esakal.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com