पाषाणावर दरवळतोय सोनचाफ्याचा सुगंध

Mhatre-Family
Mhatre-Family

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी उंचावले आहे. ॲग्रोवनच्या सातत्यपूर्ण वाचनातून आपली शेती विकसित करणे त्यांना शक्य झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात काल्हेर (ता. भिवंडी) येथील विष्णू म्हात्रे म्हणजे तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाचे सुमारे ७२ वर्षे वयाचे शेतकरी. त्यांचा मुख्य व्यवसाय रस्ता बांधकाम होता. मात्र, आपल्या सिव्हील इंजिनियर असलेल्या मुलाकडे (प्रसाद) हा व्यवसाय सोपवून म्हात्रे सुमारे पाच ते सहा वर्षांपासून पूर्णवेळ शेती करीत आहेत. 

अनेक वर्षे सांभाळली जमीन 
म्हात्रे यांनी सन १९८९ साली शहापूर तालुक्यातील (जि. ठाणे) वांद्रे येथे १४ एकर पाषाणाची जमीन विकत घेतली. येथे झाडेझुडपे, जंगली वेलींचे साम्राज्य होते. साहजिकच तेथे व्यावसायित शेती करणे आव्हानाचे होते. पण, अनेक वर्षे या जमिनीला म्हात्रे यांनी जंगलाच्या सहवासात ऊन, पाऊस, थंडीत जिद्दीने सांभाळले. पाच- सहा वर्षांपूर्वी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने जमीन समतल करून ती लागवडीखाली आणली. 

पाषाणात सोनचाफ्याची निवड 
म्हात्रे ॲग्रोवनचे पहिल्या दिवसापासूनचे वाचक आहेत. आपल्या पाषाण जमिनीत कोणती शेती पध्दती राबवायची यासाठी ॲग्रोवनचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरले. यातील यशोगाथा वाचून ते प्रसंगी शेतकऱ्यांशी संपर्कही साधत. वसई भागातील सुभाष भट्टे यांची सोनचाफ्याची यशकथा वाचनात आली. त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष शेती अभ्यासली. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ उत्तम सहाणे यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. अन्य पीकपध्दतीचाही विचार करून तशी रचना आखली.

पाणी व्यवस्थापन 
  क्षेत्र माहुली गडाच्या पायथ्याशी 
असून जमिनीला उतार. सुमारे १० ते १२ फूट जमिनीखाली सलग 
दगड आहे. त्यामुळे बोअरवेलला पाणी ५०० फुटांपेक्षा खोल. अशा स्थितीत सुमारे ९ बोअरवेल्स खोदल्या. केवळ दोन बोअरवेल्सना पाणी लागलं.
  हे पाणी शेततळ्यात सोडले. त्याची साठवण क्षमता एक कोटी लिटर.  
  पावसाळ्यामध्ये भरलेले पाणी एप्रिलअखेर संपून जाते. ते झाडांना काटेकोर दिले जाते. 
  यंदा अजून एक बोअरवेल घेतली. त्याला चांगल्याप्रकारे पाणी.
  जलयुक्त शिवार योजनेतून शेतीला लागूनच बंधारा. त्याचाही फायदा.  

सोनचाफा व्यवस्थापन : 
ठळक बाबी 

  ठिबकद्वारे पाणी.    दहा स्थानिक देशी गायींचे पालन. त्यांचे  शेण व मूत्र यांचा शेतीत वापर.    सोनचाफा व अन्य झाडांना महिन्यातून एक वेळा खोडाजवळ जीवामृत. रासायनिक खतचा वापर नाही.    झाडे मोठी झाल्यानंतर शेंडे उंच जातात. फुले लागल्यानंतर तोडणी अवघड होते. अशा झाडांचे शेंडे दोरीने खालच्या दिशेला बांधावे लागतात.    पावसाळ्यात खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता. बुंध्याला पाणी साचल्यास ते झाड मरते असा अनुभव.  

फुलांची तोडणी, पॅकिंग, विक्री व्यवस्था 
 दररोज सकाळी फुलांची तोडणी मजुरांकरवी होते. शेजारच्या पिवळी गावातील आश्रमशाळेतील शिकणारी मुलेही एक तास फुले तोडण्याचे काम करतात. त्याचा मोबदला त्यांना मिळतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका या सुरेख संकल्पनेचाच हा परिपाक आहे. हे उत्पन्न विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचते आहे याची काळजी म्हात्रे घेतात.

शेतकऱ्यांचा गट   
म्हात्रे यांनी गावातील १०० आदिवासी शेतकऱ्यांचा गट तयार केला असून यावर्षी त्यांना प्रत्येकी २० सोनचाफ्याची रोपे मोफत देणार आहेत. या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन तयार करण्याचा त्यामागे विचार आहे. म्हात्रे यांना पत्नी सौ. प्रतिभा यांची समर्थ साथ आहे. त्यांची मुलेही उच्चशिक्षित आहेत. म्हात्रे भिवंडी येथील शेतकरी उन्नती मंडळ या शिक्षण संस्थेतही कार्यरत आहेत.  

पुरस्काराने सन्मान 
म्हात्रे यांना शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन नुकतेच (एक जुलै) सन्मानित करण्यात आले आहे. 

म्हात्रे यांची आजची पीकपद्धती 
  १४ एकरांपैकी पाच एकर सोनचाफा- १० बाय १० फूट तसेच १२ बाय १२ फूट. एकूण सुमारे १८६० झाडे.
  आठ एकर शेवगा लावला. सन २०१५ व १६ मध्ये चांगले उत्पादन. परंतु जोरदार पाऊस, हवा यामुळे फूल व फळधारणा उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणाम. चांगला दर मिळाला नाही.
  मागील वर्षी शेवगा काढून त्या जागी बांबू, साग आणि आंबा लागवड.
  शेतरस्त्याच्या दोन्ही बाजूला शिंदीच्या सुमारे १००० झाडांची लागवड. कोसबाड केव्हीकेमधून रोपे आणली. सध्या वाढ जोमदार.
  आंब्याची सुमारे ३०० झाडे. हापूस, केशर, राजापुरी, कोकण रुची, पायरी आदी जाती. 
  यंदा सुमारे एकहजार केशर आंब्याची सघन लागवड.
  बांधावर बहाडोली जांभूळ २५ तर नारळाचीही तेवढीच रोपे.
  अशाप्रकारे फूल, फळबाग आणि वनशेती असा समतोल. 

उत्पादन, उत्पन्न 
पाच एकरांत दररोज ५ हजार ते १० हजार फुलांचे उत्पादन. काही वेळा १५ हजारांपर्यंतही.
प्रतिशंभर फुलांची प्लॅस्टिक बॅग. दररोज १०० ते १५० बॅग्ज दोन मजुरांच्या मदतीने मुंबई- दादर मार्केटमध्ये विक्रीसाठी.
सोनचाफ्याचा दर वर्षभर कमी- जास्त होत राहतो.
किमान दर प्रतिबॅग ४० ते ५० रुपये तर कमाल २५० ते ३०० रुपये.
गणपती, दसरा, दिवाळी व सणासुदीवेळी अधिक मागणी व दर.
सुमारे २० त ३० आदिवासी कुटुंबांना वर्षभर रोजगार.

- विष्णू म्हात्रे, ९८२०६८६७८७ 
- उत्तम सहाणे, ७०२८९००२८९ 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू  जि. पालघर येथे पीक संरक्षण तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com