सोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घट

Soybean
Soybean

या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील. 

या सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने चांगली प्रगती केली. त्यामुळे १ जूनपासून २२ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, सौराष्ट्र व रायलसीमा येथे झालेला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस केरळमध्ये झाला आहे. पुढील सप्ताहातसुद्धा पाऊस समाधानकारक असेल. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. 
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर) किमती जुलै महिन्यातील १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,८०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०२६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९  टक्क्यांनी कमी आहेत  (रु. ६,८९०). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाउस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. 

मका
रब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी वाढून रु. १,३५१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२९८ वर आल्या आहेत.

नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४०१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिव्हरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.  

साखर
साखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,१४६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१३२ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१४६ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत. 

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,१८२ वर आल्या आहेत.   स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,३०० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,२५३, रु. ३,३१३ व रु. ३,३७३ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.    

गहू     
गव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९७८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९९५). पुढील दिवसात मर्यादित वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या ७.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ६.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,१४८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२३३).  

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२  या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,९६७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत.

नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,१११). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे.  

कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात १.२ टक्क्यांनी घसरून त्या २३,१९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,१९७ वर आल्या आहेत.  डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,७७० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. पण पाऊस समाधानकारक होत असल्याने ही घट होत आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठी).
 - arun.cqr@gmail.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com