नव्या लष्करी अळीचा महाराष्ट्रात शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 September 2018

पुणे - अमेरिकेत मका पिकावर आढळणाऱ्या स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी अळी) या नव्या किडीने  आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची नोंद डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली.

पुणे - अमेरिकेत मका पिकावर आढळणाऱ्या स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी अळी) या नव्या किडीने  आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची नोंद डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली.

भारतातील या किडीची पहिली नोंद शिमोगा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मका पिकात झाली होती. त्यानंतर कर्नाटकातील चिकमंगलूर, चित्रदुर्ग, दावणगिरी या जिल्ह्यांतही या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले होते. याबाबतची बातमी व महाराष्ट्रासाठीचा इशारा २९ ऑगस्टच्या ‘ॲग्रोवन’मध्ये देण्यात आला होता.

कीड नोंद व खात्री 
तांदुळवाडी (ता. माळशिरस) परिसरामध्ये खरिपात मका लागवड मोठ्या प्रमाणात असते. येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकात सुमारे ३० ते ४० टक्के क्षेत्रावर स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा या किडीचा प्रादुर्भाव आढळला. त्याची ओळख व खात्री पटवण्यासाठी डॉ. अंकुश चोरमुले यांनी सदर मका पिकातील अळ्यांचे नमुने बंगळूरू येथील ‘नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रीकल्चरल इंसेक्ट रिसोर्स’ या संस्थेमध्ये पाठवले होते. डीएनए सिक्वेन्सिंग या तंत्राद्वारे या किडीची ओळख पटवण्यात आली असून, ती फॉल आर्मी वर्म असल्याबाबतचा अहवाल डॉ. व्यंकटेशन (प्रमुख शास्त्रज्ञ) यांच्याकडून नुकताच प्राप्त झाला आहे.

किडीची ८० प्रकारच्या पिकांवर उपजीविका
स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही कीड प्रामुख्याने अमेरिकन फॉल आर्मी वर्म या नावानेही ओळखली जाते. या किडीसाठी मका हे मुख्य यजमान पीक आहे. तसेच भात, भुईमूग, ऊस, ज्वारी, कापूस अशा सुमारे ८० पिकांवर ही कीड उपजीविका करू शकते. या किडीच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. आफ्रिकेतील नायजेरिया देशांमध्ये २०१६ मध्ये प्रथम आढळलेल्या या किडीने आफ्रिकेतील ४४ देशांमध्ये शिरकाव केला आहे. या किडीमुळे आफ्रिका खंडामध्ये हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spodoptera frugiperda worm