रानभाज्यांचे लोणचे, चटणी, टाकळ्यापासून पेय

रानभाज्यांचे लोणचे, चटणी, टाकळ्यापासून पेय

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात रानभाज्या- फळांची प्रचंड विविधता आहे. ही संधी ओळखून येथील शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाची दिशा मिळाली आहे. लोणची, चटण्यांचे विविध प्रकार व पेय निर्मिती करून त्यांना ‘मार्केट’ तयार करण्यास सुरुवात केली आहे. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रानेही रानभाजी महोत्सवातून त्यास अधिक चालना दिली आहे. 

पावसाळ्यात रानभाज्या व फळे बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागतात. आदिवासींच्या आहारात त्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. कुर्डू, तांदूळजा, भारंगी, कोळीभाजी, करटोली, नळीची भाजी, अंबाडी, पाथरी, घोळ, मायाळू, बाफळी, जाईचा वेल, कोहरेल, काटेमाठ, टेटू, शेवगा, रताळी, कोनफळ, सुरण, वास्ते, भोकर, वराकली, काकड, जांभूळ, करवंद, चिंच, आवळा, महुवा, पेंढर, बेल, कवठ, रानकेळ अशी प्रचंड विविधता येथे पाहण्यास मिळते.  

प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ 
या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्मही आहेत. या अनुषंगाने कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) चार वर्षांपासून दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्यांचा महोत्सव व रानभाज्या पाककृती स्पर्धांचे आयोजन करते. रानभाजींचे महत्त्व वाढावे, त्यांच्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा त्यामागील हेतू असतो. काही आदिवासी या भाज्या व फळे सुकवून वर्षभर खाण्यासाठी वापरतात. त्यांच्यापासून जॅम, जेली, लोणचे, सरबत, पाकवलेल्या फोडी, चटण्या आदी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार होऊ शकतात. काही आदिवासी शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ मिळवणे शक्य झाले आहे. असे छोटेखानी उद्योग आदिवासी भागात निर्माण झाले तर गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. काही प्रमाणात स्थलांतराचा प्रश्न सुटेल असे प्रयत्न होत आहेत. 

हिलीम यांचा प्रक्रिया उद्योग 
विक्रमगड तालुक्यातील माडाचा पाडा येथील जगन्नाथ कृष्णा हिलीम बचत गटाच्या साहाय्याने सुमारे सहा ते सात वर्षांपासून प्रक्रिया उद्योगात कार्यरत आहेत. खरशिंग, टेटू, काकड, भोकर, बांबू, पेंढर आदींपासून लोणचे तर खुरासणी, मोहाच्या फुलांपासून ते चटणी तयार करतात. सुमार ३० प्रकारचे ‘हर्बल टी’ त्यांनी तयार केले आहेत. टाकळ्याच्या बियांपासून त्यांनी कॉफीसारखे पेय तयार केले आहे. विशेष म्हणजे या सर्व पदार्थांना मार्केट मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आत्तापर्यंत वर्षाला सुमारे २० हजार ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्यापर्यंत मर्यादा असलेल्या त्यांच्या उद्योगाने आता मागील वर्षापासून व्यावसायिक पाऊल उचलले आहे. त्यातून मागील वर्षी ७० हजार रुपयांपर्यंत विक्रीची मजल त्यांनी मारली आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाजारपेठ मिळवली 
हिलीम यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे १६ एकर शेती आहे. ते सध्या एका संस्थेत कार्यरत आहेत. मात्र ती जबाबदारी सांभाळून त्यांनी प्रक्रिया उद्योग व त्यातही मार्केटिंगची धुरा सांभाळली आहे. वर्षाकाठी शंभर ते दीडशे किलो लोणचे, २०० ते ३०० किलो चटणी यांची विक्री त्यांनी साध्य केली आहे. टाकळा बी आधारीत पावडरयुक्त पेयाची ८०० किलोपर्यंत विक्री मुंबई येथील एका मोठ्या हॉटेलला ते करतात. या पेयासाठी आकर्षक पॅकिंग व डिजाईनही तयार केले आहे. पुणे येथील एका कॉफी व्यावसायिकालाही त्यांनी ही पावडर पुरवली आहे. लोणचे उद्योगातील एका कंपनीनेही त्यांच्याकडे उत्पादनांची विचारणा केली आहे. आपल्या उत्पादनांना ‘फूड सेफ्टी’ विषयक केंद्रीय संस्थेचे प्रमाणपत्रही मिळवले आहे. प्रदर्शन, महोत्सवातून ते या उत्पादनांविषयी जागृती व प्रसार करतात. सध्या लॉकडाऊनच्या काळात विविध समस्यांमुळे उद्योगात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र पुढील काळात ही बाजारपेठ वाढवण्याचा हिलीम यांचा प्रयत्न आहे. 

सकस आहार बगिचा प्रकल्प 
केव्हीकेमार्फत आयोजीत रानभाज्या महोत्सव व पाककृती स्पर्धांमध्ये दरवर्षी १०० ते १५० आदिवासी महिलांचा सहभाग
यंदा कोरोना संकटामुळे केवळ २० महिलांचाच सहभाग. सुमारे ६० प्रकारच्या रानभाज्या, फळे व कंद यांचा समावेश. २० प्रकारच्या भाज्यांच्या पाककृती बनविण्यात आल्या.
उत्कृष्ट पाककृती असलेल्या महिलांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव

जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी केव्हीके राष्ट्रीय स्तरावरचेन्नई येथील डॉ. एम.एस. स्वामीनाथन संस्थेच्या सहकार्यातून सकस आहार बगीचा प्रकल्प राबवत आहे. चांगले पोषणमूल्य असलेल्या भाज्या, कंदमुळे व फळांचे जतन, बियाणे वाढविणे व गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे हा त्यामागे उद्देश आहे. यंदा सुमारे २५० आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन लागवड करवून घेतली. केव्हीके प्रक्षेत्रात त्याची रोपवाटिका तयार केली आहे.  

तयार केल्या रोजगारसंधी
या उद्योगातून स्वतःबरोबर बचत गटातील ११ महिलांना हिलीम यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या महिला डोंगरदऱ्यांमधून विविध रानभाज्या वा फळांचे संकलन करतात. त्यानंतर घरगुती स्वरूपात त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. काही स्वयंसेवी संस्थांनी या उद्योगाला अर्थसाह्य व विपणनासाठी मदत कली आहे. हिलीम यांच्यासोबतच किनवली डहाणू येथील मोहन चौधरी देखील रानभाज्यांवर आधारित   डोंगरजीरा, बाफळी, खरशिंग, खुरासणी, मोहाच्या फुलांची चटणी बनवितात. खरशिंग, बांबू, करवंद, पेंढरपासून लोणचे बनवून स्थानिक पातळीवर मागणीनुसार विक्री करतात. 

जगन्नाथ कृष्णा हिलीम, ७०२०६३४६२८,  अनुजा दिवटे, ९९२०९३५२२३ 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com