केरळमधील शेतकऱ्यांनी जपल्या २५६ भातजाती

सतीश कुलकर्णी
सोमवार, 2 डिसेंबर 2019

केरळ येथील थानल ॲग्रो इकॉलॉजी संस्थेमार्फत पानावल्ली परिसरातील १० गावांमध्ये सुमारे २५६ भात जातींचे संवर्धन आणि लागवड केली जाते. ‘आपला भात वाचवा’ या नावाने ही मोहीम देशभर राबवण्यात येत आहे. 

संकरित बियाण्यांच्या आगमनानंतर उत्पादनाची तुलना होत हळूहळू पारंपरिक, स्थानिक जाती मागे पडत गेल्या. मात्र, भविष्यामध्ये विविध कीड, रोग आणि ताणांना सामोरे जाण्यासाठी या स्थानिक जातींची जैवविविधता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचे महत्त्व ओळखून या स्थानिक जाती अनेक वैशिष्ठ्यांनी परिपूर्ण असून, त्यांच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू झाले आहेत. केरळ येथील थानल ॲग्रो इकॉलॉजी संस्थेमार्फत पानावल्ली परिसरातील १० गावांमध्ये सुमारे २५६ भात जातींचे संवर्धन आणि लागवड केली जाते. ‘आपला भात वाचवा’ या नावाने ही मोहीम देशभर राबवण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एकेकाळी आहारात असलेली अनेक पिके व त्यांच्या जाती नामशेष होण्याचा धोका वाढत आहे. आपल्याकडे विविध पिकामधील जैवविविधतेचा ठेवा पर्यावरणासाठी आणि जनुकांच्या समृद्धतेसाठी जपण्याची गरज सातत्याने व्यक्त होते. अशा वेळी केरळ मधील वायानाद जिल्ह्यातील पानावल्ली गावातील थानल अॅग्रो इकॉलॉजी सेंटर’ सारख्या काही संस्था आशादायक काम करताना दिसतात. या संस्थेने वायानाद परिसरातील १० गावांमध्ये राबवलेली आपला भात वाचवा ही मोहीम वेगाने पसरत चालली आहे. या मोहिमेअंतर्गत देशी भात जातींच्या लागवडीला आणि संवर्धनाला प्रोत्साहन दिले जात आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवर २५६ भातजातींची लागवड आणि संवर्धन येथील शेतकरी करत आहेत, ही अत्यंत मोलाची बाब आहे.  

संकरीत आणि अन्य भात जातींची लागवड वेगाने वाढत गेल्याने देशी जातींची लागवड अनेक गावांमध्ये संपुष्ठात आली आहे. उदा. एकेकाळी कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या कोथंबरी कझामा ही भात जात आता अनेकांच्या केवळ स्मरणातच राहिल्याचे चित्र आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा जातींच्या लागवडीसाठी केरळ येथील थानल ही स्वयंसेवी संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या आपला भात वाचवा या मोहिमेविषयी माहिती देताना संस्थेचे विश्वस्त जयकुमार सी आणि राज्याचे समन्वयक लेनिश के यांनी सांगितले की, अधिक उत्पादनक्षम संकरीत जातींचे प्राबल्य वाढत गेल्याने स्थानिक आणि देशी चांगल्या जातीही मागे पडत गेल्या. कन्नूरच्या काही लहान शेतकऱ्यांकडे अद्यापही कमी अधिक प्रमाणात कोथंबरी कझामा या जातीची लागवड होत असली तरी प्रमाण अत्यंत कमी झाले. कोथंबरी कझामा या भातजातीला धन्यासारखा किचिंत सुगंध येतो. 

आणखी वाचा : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?

अशा शेतकऱ्यांच्या भेटी घेत लेनिश यांनी बियाणे बचाव अभियान सुरू केले. ग्रामीण भागातील वयस्कर लोकांच्या भेटीमधून पूर्वीच्या विविध जाती आणि त्यांच्या वैशिष्ठ्यांची माहिती गोळा करण्यात आली. आणि यापैकी एखादी जात परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांकडे लागवडीखाली असली तरी त्याची भेट घेऊन बियाणे गोळा करण्यात आले.

अशा काही जाती नामशेष होण्यापासून वाचवणे शक्य झाले. मात्र, लाल दाण्याची एक वैशिष्ठ्यपूर्ण जात नष्ट झाल्याचेच मानले जात होते. कारण फार प्रयत्न करूनही त्याचे बियाणे कोठेही उपलब्ध होत नव्हते. अखेर वायानाद भागातील एका लहान शेतकऱ्यांकडे त्याचे नाममात्र बियाणे उपलब्ध झाले. लहान दाण्याची अत्यंत सुबक अशी जात आता संस्थेच्या क्षेत्रामध्ये छोट्या तुकड्यात लावली जाते.  

वायनाड भाग हा पश्चिम घाटाच्या निळसर काळ्या डोंगरांनी आणि जंगाने व्यापलेला आहे. पानावल्ली गावाच्या परिसरामध्ये कालिंदी नदीमुळे सिंचनाची व्यवस्था मुबलक आहे. या भागामध्ये थानल अॅग्रो इकॉलॉजी सेंटर कार्यरत असून, या भागामध्ये २५६ भातजातींची लागवड केली जात आहे. त्यामध्ये कोथंबरी कझामा, चुवन्ना कुंजिनेलू यासारख्या दूर्मिळ जातींची लागवड दीड एकरमध्ये आहे. येथे केरळ येथील १६८  स्थानिक देशी जातींची लागवड असून, उर्वरीत जाती तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर भारत, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तिसगढ येथील आहेत. काही जाती थायलंड आणि व्हियतनाम येथूनही आणल्या आहेत. गेल्या तेरा वर्षापासून थानल संस्थेचे स्वयंसेवक भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बदलांची बीज रोवत आहेत. देशी जातींच्या लागवडीसाठी त्यांना प्रोत्साहन देत आहेत.  

भात जैवविविधता मंडल (राईस डायव्हर्सिटी ब्लॉक) अंतर्गत या परिसराचे ड्रोनद्वारे छायाचित्र घेतले होते. त्यामध्ये लाल, काळा, जांभळा, हिरवा, सोनेरी अशा छटांमध्ये भाताची शेती फुललेली आपल्याला आढळून येते. हीच मोहीम केरळच्या अन्य दहा भागांमधील शेतकऱ्यांसह राबवली जात असल्याचे संस्थेने सांगितले. 

आकडेवारी 
   ब्रिटीश गॅझेटनुसार, एकट्या केरळमध्ये ३ हजारपेक्षा अधिक भातजाती असल्याच्या नोंदी आहे. आज ते प्रमाण २०० पेक्षा कमीवर आले आहे. आपल्या पर्यावरणाशी जुळलेले पारंपरिक ज्ञान आणि पिके याकडे आपले प्रचंड दूर्लक्ष झाले आहे. १९६० नंतर संकरीत जातीच्या आगमनांनंतर देशी जातींचे प्रमाण घटले आहे. 

   सेव्ह आवर राईस या मोहिमेमुळे तांदळाचे विविध प्रकार आता बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. या पारंपरिक पण नव्याने उपलब्ध झालेल्या जातींना आरोग्य आणि वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने चांगले दर मिळत असल्याची माहिती मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक श्रीधर राधाकृष्णन यांनी दिली. 

   नव्याने आलेल्या बियांच्या तुलनेमध्ये या पारंपरिक जातींचे उत्पादनही समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक लाभही मिळत आहे. 

   केरळच्या भाषा, संस्कृती आणि एकूणच जीवनशैलीमध्ये भात आणि भाताची लागवड हे अत्यंत सुंदररित्या गुंफले गेले असल्याचे लेनिश सांगतात. त्यामुळे पारंपरिक भात जातींच्या संवर्धनाची मोहीम सर्वत्र नक्कीच यशस्वी होईल, असा आशावादही ते व्यक्त करतात.  

जातींचे स्थलांतर
स्थानिक जातींच्या नोंदी घेण्यासाठी देशभर प्रवास करताना अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्याचे लेनिश सांगतात. थानलचे दोन कार्यकर्ते सुंदरबन भागामध्ये भातांच्या जातींच्या नोंदी घेत होते. त्यावेळी त्या भागामध्ये केरळ सुंदरी नावाची एक भातजात असल्याचे समजले, पण स्थानिकांना हे नाव कसे पडले याविषयी काही सांगता आले नाही. केरळमधून ही जात तिकडे गेली असावी, हा अंदाज लावता येतो. अशाच प्रकारची काळ्या रंगाच्या दाण्याची भातजात ईशान्य भारतामध्ये आढळली. ही चिकट भाताची जात तिथे बुर्मा ब्लॅक नावाने ओळखली जाते. 

प्रत्येक प्रदेशामध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण जाती असून, त्यांची तेथील भौगोलिक स्थान आणि वातावरणानुसार लागवड केली जाते. उत्तर भारतामध्ये रामलिला आणि गोविंदभोग भात जातींचा उगम अगदी कृष्ण आणि महाभारतकाळापर्यंत जोडला जातो. मात्र, ही नावे दक्षिणेमध्येही चांगल्या प्रकारे रुजलेली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये अशा अनेक जाती व त्या संबंधीची पारंपरिक माहिती नष्ट होत गेली. आज हे सारे जैववैविध्य जपण्याची आवश्यकता आहे. 

अशी चालते ‘आपला भात वाचवा’ मोहीम
भात जैवविविधता मंडलमधील कोणत्याही भात जातीची लागवड करायची असल्यास ५००० रुपये लागतात. लोकांच्या अर्थसाह्यावरच आपला भात वाचवा ही मोहीम चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. एकदा भाताच्या शेतामध्ये लेनिश यांची सोन्याची अंगठी हरवली होती. ती कधीही सापडली नसली तरी त्या निमित्ताने पिवळ्या भात शेतांचा सोन्यापेक्षाही मोलाचा खजिना सापडल्याचे ते हसत सांगतात. 

विविध भातजातींची वैशिष्ट्ये 
   ख्रिश्चन परंपरेतील काही भात जातींनाही त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे चांगली मागणी असल्याची नोंद आहे. त्यातील कारींजन आणि कारीमलाकारण या जातींमध्ये तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असून, त्यांच्या आहारातील वापरामुळे मधूमेहाचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जाते. 

   मुंडकन जातींचा भात खाल्ल्याने काम करण्याची क्षमता वाढत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कष्टाची कामे करणाऱ्या लोकांकडून त्याला प्राधान्य दिले जाते. 

  वालिया चेन्नेल्लू आणि चुलन्ना चेन्नेल्लू : वालिया चेन्नेल्लू ही जात सहा फुटापर्यंत उंच वाढणारी असून, पक्वतेसाठी सुमारे ७ महिन्यांचा कालावधी लागतो. कन्नुर भागातील परंपरानिष्ठ आणि आदिवारी लोक गर्भारपण आणि गर्भाचे पोषण यासाठी गर्भवती महिला, रजोनिवृत्ती काळातील महिलांना या भाताचा आहार देतात. यामुळे या काळात होणाऱ्या संप्रेरकांच्या असंतुलनावर मात करता येत असल्याचे वयस्कर महिला सांगतात. 

आणखी वाचा : ममताबाई झाल्या परसबागेच्या गाइड

   चुवन्ना कुंजिनेलू : ही पांढरीशुभ्र सुगंधी भातजात असून, एकेकाळी फक्त देवांच्या नैवेद्यासाठी पायसम आणि खीर बनवण्यासाठी वापरली जात असे. अलिकडे फ्राईड राईस, बिर्याणी आणि तूपभातासाठी सर्वसामान्य लोकही वापरू लागले आहेत. आजही भात उकळलेल्या पाण्यात औषधी टाकून फीट येणाऱ्या व्यक्तीला दिले जातात. 

   वेल्लानावारा आणि रक्थशाली : या दोन्ही जाती औषधी कारकिडा कांजी बनवण्यासाठी संपूर्ण भारतभर विकल्या जातात. त्यांचे रेडिमेड एकत्रित पॅकेट सर्वत्र उपलब्ध होत आहेत. याचे आरोग्यासाठी खूप फायदे सांगितले जात असून, प्रामुख्याने मळ्याळम महिना कारक्किडकम (जून- जुलै) मध्ये खाण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Kerala maintain 256 rice varieties