दराअभावी टोमॅटो उत्पादकांना १०० कोटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

नारायणगाव, जि. पुणे - मागील दोन महिन्यांपासून टोमॅटो, कांदा या प्रमुख पिकांसह वांगी, कोबी, फ्लॉवर, काकडी, कलिंगड या उन्हाळी पिकांचे दर घटल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. नीच्चांकी बाजारभावामुळे वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटो पीक सोडून दिले आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील सुमारे दहा हजार एकर क्षेत्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी या वर्षी फेब्रुवारी ते मार्चदरम्यान उन्हाळी हंगामासाठी संकरित टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.

उन्हाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला. मात्र, बाजारभावात वाढ झालेली नाही. टोमॅटो पिकासाठी थंड हवामान पोषक असते. साधारणपणे वीस अंश सेल्सिअस तापमानाला टोमॅटो पिकाचे कमी खर्चात उत्पादन घेता येते. मात्र, उन्हाळी हंगामात टोमॅटोला बाजारभाव मिळतो, या अपेक्षेने जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील शेतकरी ठिबक व तुषार सिंचन, मल्चिंग याचा वापर करून प्रतिकूल उन्हाळी हंगामात टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेतात. सध्या सुमारे दहा हजार एकर क्षेत्रातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू आहे. मोठ्या आकाराच्या उच्च प्रतीच्या टोमॅटो क्रेटला येथील उपबाजारात पन्नास ते साठ रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. मध्यम प्रतीचा टोमॅटो टाकून द्यावा लागत आहे. बाजारभावाची हीच स्थिती गेले एक महिन्यापासून आहे. या बाजारभावात वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाले आहेत. किमान पुढील एक महिना बाजारभाव वाढण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितल्याने उत्पादकांनी तोडणी सुरू झालेल्या टोमॅटो पीक काढून टाकण्यास सुरवात केली आहे. यामुळे उत्पादकांना एकरी एक लाख रुपयांचा फटका बसला आहे. महिनाभरात जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील टोमॅटो उत्पादकांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा भांडवली तोटा सहन करावा लागला आहे.

भाजीपाला मातीमोल 
वांगी, काकडी, कोबी, फ्लॉवर आदी उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना प्रतिकिलो पाच ते सात रुपये भाव मिळत आहे. वाहतूक, कडता, दलाली, तोडणी मजुरी, पॅकिंग आदींसाठी प्रतिकिलो दहा रुपये खर्च येतो. सध्याच्या बाजारभावामुळे तोटा सहन करावा लागत असल्‍याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tomato 100 crore rupees loss by rate