esakal | देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘वसंतसुत’ कृषी पर्यटन केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

vasantsut

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले ‘वसंतसुत’ हे केशव खाडे यांचे कृषी पर्यटन केंद्र केवळच देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांचेदेखील आकर्षण व अभ्यासाचे केंद्र झाले आहे. खाडे कुटुंबाने आपल्या भागातील निसर्गसंपदेचे महत्त्व अोळखून या व्यवसायाला मोठी चालना दिली. विविध सुविधांसह मोठी रोजगारक्षमता तयार केली. इथला पाहुणचार घेऊन जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपण या कुटुंबाचा एक भागच आहोत, अशी भावना तयार होते हेच खाडे यांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या कृषी पर्यटन व्यवसायाचे मोठे यश म्हणाले लागेल. 

देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘वसंतसुत’ कृषी पर्यटन केंद्र

sakal_logo
By
शांताराम काळे

नगर जिल्ह्यात अकोले -भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसरात एका बाजूला डोंगररांग. दुसऱ्या बाजूने खोल दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी, डोंगराच्या पोटाने गेलेली काळीशार सडक. भंडारदऱ्यापासून एक ते दीड किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला पारंपरिक पद्धतीने वसलेले व ‘वसंतसुत’ हे काव्यात्मक नाव धारण करणारे केशव खाडे यांचे कौलारू व पत्र्याचे घर जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. खाडे यांचे घर व परिसर आता पर्यटकांचेदेखील घर झाले आहे. अौरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, गोवा, गुजरात, कर्नाटक.. कुठून कुठून लोक इथे येऊन राहतात. केशव यांच्या आईच्या हातच्या गरमागरम भाकऱ्या, गावठी कोंबडी, मासे खाऊन त्यांच्या रसना तृप्त होतात. ग्रामीण संस्कृती व जिव्हाळ्याचे दर्शन घडवणाऱ्या आदरतिथ्याने पर्यटक समाधानी होऊन जातात. 

पर्यटन व्यवसायात रमलेले कुटुंब  
केशव, आई, आजी, पत्नी, भाऊ, भावजय असे सारे खाडे कुटुंबच पर्यटन व्यवसायात रमून गेले आहे. नाशिक-नगरच्या सीमेवर तसेच शहरी लोकांच्या आवडीच्या भंडारदरा परिसरात डोंगराच्या कुशीत घरगुती स्वरूपात ‘वसंतसुत’ हे कृषी पर्यटन केंद्र वसले आहे. पर्यटनाबरोबरच उत्तम निवास, जेवण, न्याहारीसह परिसरातील गड किल्ल्यांचे ट्रेकिंग, कम्पेनिग यासाठीही हे उत्कृष्ट ठिकाण आहे. केशव यांना पर्यटनाची लहानपणापासूनच आवड. त्यातच भंडारदरा परिसरातील वास्तव्य. आणि आजूबाजूचे गड-किल्ले त्यांना नेहमी खुणावत राहिले. निसर्गप्रेमी केशव यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. खरे तर त्यांना ‘डीएड’ व्हायचे होते. पण कमजोर आर्थिक परिस्थितीमुळे तो विचार सोडून द्यावा लागला.लहान वयातच भंडारदरा येथे चणे-फुटाणे विक्री करण्याचा अनुभव त्यांना घ्यावा लागला. व्यवसाय केल्यास चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते हे तेव्हापासून समजू लागले. वाणिज्य शाखेतील शिक्षणामुळे व्यवसायाबतचा आर्थिक दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. 

असा झाला व्यवसायाचा श्रीगणेशा   
राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गाइड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ५० युवकांसोबत केशवही सहभागी झाले. या वेळी योगेश कर्डीले या उत्साही मार्गदर्शकाने पर्यटकांसोबत आपले वागणे, त्यांची निवास, भोजन व्यवस्था याबरोबरच भंडारदरा परिसरातील सह्यगिरी पर्वत, किल्ले, नद्या, जलाशये, देवराई, मंदिरे, आदिवासी संस्कृती, परिसरातील जैविविधतेची माहिती सखोलपणे सांगितली. कार्यक्रमांतर्गत केशव यांना निवासासाठी चार तंबूही उपलब्ध झाले. त्यातूनच त्यांना पर्यटन व्यवसायासाठी वेगळी दिशा मिळाली. भंडारदरा जलाशयाच्या काठी केशव यांनी उभारलेल्या तंबूत केरळचे पर्यटक आले होते. त्यांना केशव यांनी घरून बनवून आणलेले भात-भाकरी, गावरान चिकनचे जेवण खूपच आवडले. हाच खरा तर केशव यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा ठरला.

व्यवसायाला चालना  
आपल्या भागातील संस्कृती, भौगौलिक महत्त्व आणि त्या अनुषंगाने पर्यटन व्यवसायाचे महत्त्व केशव यांना उमगले. त्यांनी व्यवसायाला आकार देण्यास सुरवात केली. आज गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नांतून व्यवसायाला चांगलीच चालना मिळाली आहे. एकेकाळी असलेले चार तंबू आता शंभरपर्यंत पोचले आहेत. आपल्या कुटुंबाबरोबर मित्रांनाही केशव यांनी व्यवसायात सहभागी करून घेतले आहे. खाडे या शेतकरी कुटुंबात होणारा पाहुणचार हा अनेकांच्या आनंदाचा विषय ठरला आहे. केवळ भारतातूनच नव्हे तर पर्यटन, अभ्यास, प्रकल्प यांच्या माध्यमातून स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, व्हेनिस, अमेरिका, इंग्लड, चीन, नेपाळ आदी देशातूनंही पर्यटक इथे येऊन गेले आहेत. 

पर्यटनाच्या सुविधा  
व्यवसायाची गरज अोखळून केशव यांनी सुविधा वाढविल्या आहेत. चार निवासी खोल्या आहेत. भंडारदऱ्याचे बॅकवॉटर असल्याने पर्यटकांना राहण्यासाठी तंबूंची सुविधा उपलब्ध केली जातेच. 

त्याबरोबरच रतनगड, कळसूबाई, अलंग, कुलंग या गड-किल्ल्यांवरही तंबू उभारले आहेत. केशव यांची आजी व आई यांच्या हातच्या बाजरी, तांदळाच्या भाकरी, गावठी चवदार चिकन, पाट्यावरची मिरची ,जलाशयातील चवदार मासे पर्यटकांना आवडतात. पत्नी तसेच भावजयही स्वयंपाकात मदत करतात. केशव यांचा भाऊ भंडारदरा जलाशयात होडी चालवतो. 

‘गाइड’ म्हणून जे कौशल्य आवश्यक आहे ते केशव यांनी आत्मसात केले. त्याबरोबरच उत्तम छायाचित्रणाची कलाही अवगत करून घेतली. जून-जुलै महिन्यात या परिसरात खेकडे मोठ्या संख्येने सापडतात. उत्साही पर्यटकांना केशव अथवा त्यांचा भाऊ रात्रीच्या वेळी टेंभ्याच्या उजेडात खेकडे पकडायला घेऊन जातता. स्वतः पकडलेल्या खेकड्यांचे कालवण घेताना पर्यटकांना वेगळेच समाधान मिळत असल्याचे केशव यांनी सांगितले.

पर्यटकांकडूनच होते प्रसिद्धी 
बैलगाडीतून शिवारफेरी, जंगल भ्रमंती, व्हॅली कॅम्प आयोजन ते करतात. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या "निवास - न्याहारी "योजनेअंतर्गत "वसंत सूट"ची नोंदणी करण्यात आली आहे. स्वयंपाकासाठी लागणारा तांदूळ, गहू , बाजरी, बटाटा, लसूण, मिरची असा बहुतांश शेतीमाल घरचाच व सेंद्रिय असतो. बराचसा स्वयंपाक चुलीवरच केला जातो. केशव यांनी ‘अमेझिंग भंडारदरा’ नावाची वेबसाइट सुरू केली अाहे. तरीही पर्यटकांकडून होणारी मौखिक प्रसिद्धी नवीन पर्यटकांना इथे घेऊन येते. पावसाळ्यातही त्यांची संख्या वाढते. हिवाळ्यात पर्यटक धरणाकाठच्या अथवा गड-किल्ल्यांतील तंबू निवासाला प्राधान्य देतात. पावसाळ्याच्या तोंडावर रखरखीत उन्हाळ्यातही या परिसरात अवतरणाऱ्या काजव्यांची मोहमयी दुनिया पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत.

कायम रोजगार झाला उपलब्ध  
वर्षभर पर्यटकांचा राबता असल्याने कायम रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबरच मित्र परिवार शेजारी यांनाही रोजगार मिळाला आहे. त्यातील कुणी गाइड, कुणी तंबू उभारण्यासाठी, कुणी घराच्या सफाईसाठी तर महिला स्वयंपाकासाठी मदत करतात. यात २० ते २५ जणांना ४०० रुपये असा दररोजचा मेहनताना मिळतो. 

बहरलेला व्यवसाय  
सुमारे १२५ पर्यटकांची भोजन व निवासाची व्यवस्था उपलब्ध करण्याची क्षमता आद केशव यांनी तयार केली आहे. वडील वसंतराव, आई सीताबाई, पत्नी सौ. मनीषा, भाऊ निवृत्ती, विजय, महेश व आजी  या सर्वांच्या सहकार्यामुळे आपला व्यवसाय बहरला हे केशव नम्रपणे कबूल करतात. 

आपल्या वडिलोपार्जित पाच एकर जागेत शेततळे, मत्स्यबीज रोपण, मासे पालन, विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड, गोशाळा, मुलांसाठी छोटेसे उद्यान आदी सुविधा उभारण्याचा त्यांचा मानस आहे. प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, वयाचे शतक नुकतेच पूर्ण करणारे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील आदी मंडळींनीही खाडे कुटुंबाचे आदरातिथ्य अनुभवले आहे. याशिवाय राजकारणी, अधिकारी, ‘ट्रेकर्स’चे ग्रुप, शाळांच्या सहली नेहमीच इथे येत असतात.

परदेशी पर्यटकांचे  अविस्मरणीय अनुभव  
देशी-परदेशी पर्यटकांचे अनेक अनुभव केशव यांच्याकडे आहेत. इंग्लडमधून आलेल्या एका पर्यटकाने अत्यंत कमी कालावधीत हरिश्चंद्र गड, तारामती, रोहिदास कोकणकडा, कळसूबाई अशी विरुद्ध दिशेला असणारी शिखरे पादांक्रात केली होती. तर २० ते २२ वयोगटातील एक चिनी तरुणी ‘वेबसाइट’च्या आधारे वसंतसुतचा पत्ता शोधत एसटी बसने प्रवास करीत इथपर्यंत अाली होती. ‘आर्किटेक्ट’ असलेली ही तरुणी तीन दिवस या केंद्रात राहिली. केशव यांनी आपल्या दुचाकीवरून तिला परिसरातील स्थळांचे दर्शन घडवले. इथला पाहुणचार घेतल्यानंतर अत्यंत समाधानाने ती मायदेशी गेली. हा अनुभव आपल्यासाठी विशेष होता, असे केशव सांगतात. 

कृषी पर्यटनाला वाव देणारा भंडारदरा परिसर 
भंडारदरा परिसराला अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड आदी डझनभर गड किल्ले या भागात आहेत. अभिजात शिल्प कलेचा नमुना असणारी रत्नेश्वर सारखी मंदिरे, निसर्गाची अनोखी निर्मिती असलेली साम्रद येथील सांदणदरी, भंडारदरा धरण, घाटघरचा कोकणकडा, पावसाळ्यात काळ्या कातळावरून कोसळणारे लहान-मोठे अनेक धबधबे, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डोंगर उतारावर फुलणारी विविध रंगी रानफुले अशी समृद्ध निसर्गसंपदा या भागात पाहायला मिळते. साहजिकच या भागात कृषी पर्यटन व्यवसाय एक सक्षम रोजगार देऊ शकतो याची जाणीव या भागातील स्थानिकांना जाणीव झाली आहे. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायात उतरले आहेत. 

असा शोधला तरुणांनी व्यवसाय 
भंडारदरा जलाशयाच्या काठावर उडदवणे, पांजरे, मुरशेत, साम्रद, घाटघर, रतनवाडी, वाकी आदी ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी इथले स्थानिक तरुण तंबू लावतात. त्यांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे. काहीजण पर्यटकांना घरगुती पद्धतीचे जेवण पुरवितात. पावसाळ्याच्या दिवसात जलाशयाच्या भोवताली रिंग रोडवर ठिकठिकाणी तात्पुरती उपहारगृहे उभी राहतात. गरमागरम चहा, कॉफी, वडा, भजी असा न्याहरीचा आनंद पर्यटकांना दिला जातो. पर्यटकांना जलाशयात फेरफटका मारून आणण्याचे कामही अनेक तरुण आपल्या होड्यांमधून करतात. या सर्व बाबींमधून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे या भागातून रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर काही प्रमाणात तरी निश्चितपणे थांबले आहे. येथील तरुण आता फेसबुक, व्हाॅटसअॅप आदींद्वारेही पर्यटकांसोबत संपर्क साधून संवाद करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. अनेक ठिकाणी मोबाईलला ‘नेटवर्क’ नसणे हीच त्यांची प्रमुख अडचण झाली आहेत.  

पर्यटकांचे बोल  
खाडे यांचे कृषी पर्यटन केंद्र शहरी व ग्रामीण भागाचा समतोल राखणारे आहे.
- डॉ. उल्हास कुलकर्णी,  वैद्यकीय व्यावसायिक, अकोला  

वसंतसुत पर्यटन केंद्रातील बाजरीची भाकरी, पिठले व ताजी मासळी यांची जिभेवरील चव आजही जात नाही
- रुपाली सावंत, बोरीवली, मुंबई 

केशव हा अतिशय प्रामाणिक व जिद्दी तरुण आमच्यासाठी कुटुंबातील घटक बनला आहे भंडारदरा परिसर त्याच्याशिवाय आम्ही पाहूच शकत नाही. असा तरुणांना सरकारने प्रोत्साहीत करून त्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता आहे 
- नितीन सोनवणे, मुंबई 

खाडे यांचे प्रेम, आपुलकी यामुळे त्यांच्याच कुटुंबाचा भाग म्हणून आम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेतो. 
- शिवाजी म्हस्के, नाशिक 

कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. धकाधकीच्या जीवनात परस्परातील संवाद कमी होत आहे. त्यामुळे ताणतणाव वाढतो आहे. तो कमी करण्याचा कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदित होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना किमान आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत. 
- केशव खाडे 

गेल्या १५ वर्षांपासून चुलीवर स्वयंपाक करून येणाऱ्या पर्यटकांच्या आवडीनुसार जेवण बनवते. पर्यटक मला भेटल्याशिवाय इथून जात नाहीत, हीच माझ्या कामाची पावती आहे. पर्यटक आमच्यासाठी ग्राहक नसतो, तर कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच होऊन जातो.
- जानकाबाई लक्ष्मण खाडे (केशव यांच्या आजी)  

 केशव खाडे, ९७६५३०८७१९ 

loading image