काजूबोंडापासून बनवले अतिनील किरणे शोषक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

काजूबोंडाच्या आवरणापासून मिळवलेल्या द्रवातून अतिनील किरणांचे शोषण करणारे घटक वेगळे करण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे.

काजूबोंडाच्या आवरणापासून मिळवलेल्या द्रवातून अतिनील किरणांचे शोषण करणारे घटक वेगळे करण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे. जर्मनी येथील जोहान्स गुटेंनबर्ग विद्यापीठ, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील विटवॉटर्सरॅंड विद्यापीठ, टांझानिया येथील डार -इस- सलाम विद्यापीठ येथील संशोधकांनी एकत्रितपणे केलेल्या या संशोधनातून पेट्रोलियम घटकांना पर्याय मिळवणे शक्य होणार आहे. पर्यायाने आजवर टाकाऊ मानल्या जाणाऱ्या काजूबोंडाचा अधिक उपयोग होऊन अधिक पर्यावरणपूरक त्वचा मलम तयार करता येतील. हे संशोधन ‘युरोपियन जर्नल ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

काजू प्रक्रिया उद्योगामध्ये बोंड व आवरण हा भाग टाकाऊ मानला जातो. त्यापासून द्रव (सीएसएसएल) मिळवून त्याचे विविध औद्योगिक वापर होतात. आता या द्रवापासून संपूर्ण सेंद्रिय असे किरणांचे शोषण करणारे घटक तयार करण्यात आले आहेत. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या संपर्कामुळे मानव आणि जनावरांच्या आरोग्याला धोका पोचू शकतो. सातत्याने अतिनील किरणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागणे, त्यांना प्राणघातक अशा कर्करोगाची शक्यताही वाढते. या किरणाचा फटका पेंट, विविध आवरणे आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंनाही बसतो. सध्या अतिनील किरणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी रासायनिक अतिनील  फिल्टर्स (उदा. टिटॅनियम डाय ऑक्साईड) वापरले जातात. त्वचेवर लावण्याच्या मलम, रंग किंवा अन्य अतिनील किरणांपासून वाचवण्याच्या वस्तूंमध्ये कार्बन अणू असलेल्या घटकांचा (पेट्रोलियम) सेंद्रिय फिल्टर म्हणून वापर केला जातो. मात्र, हे दोन्ही प्रकार जलचरांसाठी घातक ठरत असल्याने त्यांना पर्याय शोधले जात आहेत.  
प्रो. टिल ओपाट्झ, प्रो. चार्ल्स डी कोनिंग यांच्यासह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने काजू बोंडाच्या आवरणापासूनच्या द्रवातून नवे फिल्टर बनवले आहेत. ते मानवी त्वचेसाठी व अन्य जिवांसाठी कोणत्याही प्रकारे धोकादायक नसल्याचे काही चाचण्यातून दिसून आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UV radiation absorbent made from cashew nuts