सोलापुरात गवार, भेंडी, दोडका पुन्हा तेजीत

सुदर्शन सुतार
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, दोडक्‍याला चांगली मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमी होती; पण मागणी असल्याने  त्यांच्या दरात या सप्ताहात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, दोडक्‍याला चांगली मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमी होती; पण मागणी असल्याने  त्यांच्या दरात या सप्ताहात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

बाजार समितीच्या आवारात गवारची रोज २० क्विंटल, भेंडीची १० क्विंटल आणि दोडक्‍याची ४० क्विंटलपर्यंत आवक होती. या फळभाज्यांची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी असल्याने त्यात सातत्य राहिल्याने त्यांच्या दरात काहीशी तेजी राहिली. विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्या दरात तेजी आहे. अन्य सर्व भाजीपाल्याच्या तुलनेत गवार,भेंडी, दोडक्‍याला चांगला उठाव मिळतो आहे. गवारला प्रतिदहा किलोसाठी १५० ते ३०० रुपये, भेंडीला १०० ते ३०० रुपये आणि दोडक्‍याला १५० ते ३०० रुपये असा दर होता. त्याशिवाय कारले, बटाटा, वांग्याचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवक मात्र अगदीच कमी होती. प्रत्येकी १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक होती. कारल्याला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, बटाट्याला १०० ते २२० रुपये आणि वांग्याला ६० ते १०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात या सप्ताहातही पुन्हा तेजीचे वातावरण राहिले. भाज्यांची आवक मात्र तशी जेमतेमच रोज १० ते १२ हजार पेंढ्यांपर्यंतच होती. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते १२०० रुपये, शेपू ३०० ते ५०० रुपये आणि कोथिंबिरीला ३०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

लाल मिरची, लसूणही वधारला
फळभाज्या-भाजीपाल्याचा बाजार एकीकडे तेजीत असताना लाल मिरची आणि लसणालाही मागणी वाढल्याचे आणि त्यांच्या दरातही काहीशी तेजी राहिल्याचे चित्र या सप्ताहात दिसून आले. लाल मिरचीला प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये आणि लसणाला १२०० ते २७०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. या सप्ताहात काही किरकोळ चढ-उतार वगळता दोन्हींचेही दर वधारलेलेच राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables price high