प्लॅस्टिक टबांत सोपी गांडूळखत निर्मिती

विकास जाधव
Wednesday, 27 February 2019

खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही तेवढाच वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील सरडे येथील शरद हनुमंत भोईटे या तरुण शेतकऱ्याने यावर उपाय शोधला आहे. प्लॅस्टिकच्या पाच टब्सचे युनिट, त्याआधारे महिन्याला दीडशे किलो तर वर्षाला सुमारे १८०० किलो गांडूळ खत निर्मितीचे सुलभ तंत्र त्यांनी विकसित केले आहे. आपली शेती सुपीक करण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनादेखील या तंत्राचा फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही तेवढाच वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील सरडे येथील शरद हनुमंत भोईटे या तरुण शेतकऱ्याने यावर उपाय शोधला आहे. प्लॅस्टिकच्या पाच टब्सचे युनिट, त्याआधारे महिन्याला दीडशे किलो तर वर्षाला सुमारे १८०० किलो गांडूळ खत निर्मितीचे सुलभ तंत्र त्यांनी विकसित केले आहे. आपली शेती सुपीक करण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनादेखील या तंत्राचा फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. गावात बहुतांश शेती बागायत आहे. यात उसासह भाजीपाला, फळबाग लागवड केली जाते. गावातील शरद हनुमंत भोईटे यांनी पदविका घेतल्यानंतर शेतीतच करियर करण्यास सुरवात केली. घरची दीड एकर शेती होती. सन २००० मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या माध्यमातून जयपूर येथील मुरारका फौंडेशन येथे गांडूऴ खत प्रशिक्षणासाठी जाण्याचा योग आला. त्यानंतर या खताच्या निर्मितीची दिशा मिळाली. 

सुरू केले खताचे उत्पादन
शरद यांनी प्रशिक्षण घेऊन आल्यावर गांडूळ खत उत्पादनास सुरवात केली. कृषी विभागाच्या माध्यमातून गांडूळ खत कल्चर सेंटरही सुरू केले. त्या माध्यमातून वर्षाकाठी २० टनांपर्यंत खताची विक्री केली जात होती.

दरम्यान, गांडूळशेतीबाबत शरद यांनी सविस्तर अभ्यास सुरू केला. या काळात मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. गायकवाड यांची मोठी मदत झाली. या प्रकल्पास शेतकरी, अधिकारी तसेच शैक्षणिक सहली अशा भेटी घडू लागल्या. सन २०१० पर्यंत हा व्यवसाय सुरू होता. गांडूळ खत निर्मितीत काही त्रुटी रहात असल्याचे शरद यांच्या लक्षात येत होते. यामध्ये संपूर्ण ‘बेड’मध्ये एकसारखे खत तयार न होणे, उपयुक्त व्हर्मीवॅाश संकलित करता न येणे आदी समस्या जाणवत होत्या. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे यासाठी शरद यांनी प्रयत्न सुरू केले. 

त्रुटींवर मात करण्याचा प्रयत्न 
गांडूळ खत दर्जेदार होण्यासाठी शरद यांनी प्रयोग करण्यास सुरवात केली. गांडूळ खताचे ‘बेडस’ तयार करण्याऐवजी ५० ते १०० किलोच्या बॅरल व त्यानंतर बादल्या यांचा वापर केला. मात्र खेळती हवा नसल्याने आर्द्रता टिकून न राहणे, व्हर्मिवॅाश योग्य संकलित न होणे अशा यातही समस्या जाणवत होत्या. पाच ते सहा वर्ष हे प्रयोग सुरू ठेवले. या कालावधीत गांडूळ खत कमी परिश्रमात, कमी खर्चात व उत्तम गुणवत्तेत तयार करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. 

प्लॅस्टिक टबचे युनिट
शरद यांनी पुढचा प्रयत्न म्हणून प्लॅस्टिकचे पाच टब्स वापरून गांडूळखत तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. प्रत्येकी २० किलो गांडूळखत मावेल या क्षमतेचे हे टब होते. यात व्हर्मीवॅाश मिळावे यासाठी ते बादलीवर ठेवण्यात आले. टबाच्या बुडाला छिद्र पाडून बुडात खडी, वाळू, विटाचे तुकडे घातले. त्यावर शेण टाकले. मात्र छिद्र बंद पडत असल्याने व्हर्मीवॅाश योग्य उपलब्ध होत नव्हते. अजून अभ्यास व प्रयत्न करीत हे युनिट क्षमतेने सुरू करण्यात शरद यांना यश आले. 

शेतीचा विस्तार 
शेतीला जोड म्हणून शरद यांनी रेशीम शेतीचे युनिट सुरू केले आहे. टप्पाटप्प्याने दीड एकर असलेले क्षेत्र आठ एकरांपर्यंत पोचवले आहे. सर्व पिकांना गांडूळखताचा वापर करतात. शरद यांच्या या प्रयत्नांची दखल घेत सातारा जिल्हा परिषदेच्या जे. के. बसू सेंद्रिय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

असे आहे हे युनिट
पाच टब्सच्या युनिटमध्ये बुडाला छिद्र पाडून त्यावर व्हॉल्व्ह आहे. बुडाच्या आकाराची प्लॅस्टिक प्लेट तयार करून त्यास पाच ते सहा छिद्रे घेतली आहेत. त्यावर जाळी बसविली असून त्यावर शेण टाकले जाते. टबाच्या बुडाला ‘व्हॉल्व्ह’ ला साधारण पाच लिटर क्षमतेचे कॅन ठेवला जातो. शेणामध्ये प्रत्येक टबाला एक किलो पेक्षा अधिक गांडूळे वापरली जातात. प्रत्येक टबात दररोज दीड लिटर पाणी वापरले जाते. 

तंत्राचा वापर 
या तंत्राद्वारे दिवसाला प्रति टबातून एक लिटर तर पाच टबांद्वारे पाच लिटर व्हर्मीवॅाश मिळू लागले. तर दर पंधरा दिवसांना पाच टबांद्वारे ७५ किलो म्हणजेच महिन्याला १५० किलो गांडूळ खत मिळू लागले. (वर्षभरात हे खत १८०० किलो पर्यंत होते.) टबांत हवा खेळती राहू लागल्याने दर्जेदार खत मिळू लागले. शरद यांनी आपल्या शेतात या खताचा वापर सुरू केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यानंतर अन्य शेतकऱ्यांत त्याचा प्रसार करण्यास सुरवात केली आहे. सध्या हे युनिट अनेक शेतकरी वापरत असल्याचे शरद यांनी सांगितले. 

एकरासाठी पुरेसे युनिट - साधारणपणे प्रति एकरासाठी दीड टन गांडूळ खताची गरज आहे. पाच टबांच्या माध्यमातून तेवढी निर्मिती होते. साधारण तेवढेच व्हर्मीवॅाश मिळते.   

युनिटची वैशिष्ट्ये
वजनाने हलके असल्याने कोणत्याही ठिकाणी ने आण करता येते.
कमी जागेत युनिट बसवता येते.
दररोज अवघा अर्धा तास वेळ दिल्यास एक एकर क्षेत्राला पुरेल एवढे खत तयार होऊ शकते. 
कोणत्याही प्रकारची दुर्गधी येत नाही.
दर्जेदार खतामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे.
या युनिटची सध्याची किंमत सुमारे ४२५० रुपये आहे. 
आठ ते दहा वर्षे सतत संशोधन केल्यानंतर हे तंत्र विकसित करणे शक्य झाले.
यात कृषी विभागाचीही मोठी मदत झाली आहे. 

- शरद हनुमंत भोईटे, ९४२३८६३७८७, ९६०४४०००७९ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vermicompost Fertilizer Generation in Plastic Tub