
‘ॲग्री बिझनेस’ विकसित करणारे ‘वेसाटोगो’
पुणे : शेतमाल काढायला आला असेल तर त्याला किती दर मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना असते. त्यामुळे सध्या मार्केटची स्थिती काय आहे? हे समजून घेण्यासाठी त्यांना चार ठिकाणी फोन करावे लागतात किंवा प्रत्यक्ष मार्केटमध्ये जावे लागते. तसेच लागवडीपासून शेतमाल विकण्यापर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
माल बाजारात कसा पाठवायचा, त्यासाठी कोणती वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. यासह शेतीविषयक विविध सेवा पुरविणाऱ्या ‘वेसाटोगो इनोव्हेशन’ (Vesatogo Innovations) या स्टार्टअपने शेतकऱ्यांचे काम सोपे केले आहे. तसेच शेतमालाला चांगली किंमत मिळवून देण्याचे प्रयत्नदेखील या स्टार्टअपच्या माध्यमातून केले जात आहेत. ‘ग्रामीक’ आणि ‘एफपीओ मॅनेजमेंट सिस्टिम’ असे दोन उपक्रम या स्टार्टअपकडून राबविण्यात येत आहेत.
‘जय जवान, जय विज्ञान’ ही संकल्पना डोळ्यापुढे ठेऊन आम्ही कृषी क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. ‘डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर’च्या आणि नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अडचणींचा शोध घेतला जात होता. त्यातून शेतमाल वाहतूक आणि पुरवठा साखळीतील अडचणी समोर आल्यात. डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरच्या माध्यमातून अडचणींवर पर्याय शोधण्यासाठी अभियंत्यांना बोलविले. त्यासाठी मी अर्ज केला होता. त्यातून या स्टार्टअपची सुरुवात झाली, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.
लागवड ते शेतमालाचे उत्पादन आणि ते बाजारपेठेपर्यंत नेण्यापर्यंतची साखळी या प्रकल्पाचे काम आम्ही करतो. एफपीओ मॅनेजमेंट सिस्टिमशी १२ हजारांहून अधिक शेतकरी जोडले आहेत. शेतमाल, खरेदी, दर निश्चिती, काढणी, पुरवठा, वाहतूक, विक्री या बाबी प्रणालीत समाविष्ट आहेत. या माध्यमातून आतापर्यंत ६८० कोटींची उलाढाल झाली आहे.
- अक्षय दीक्षित, सहसंस्थापक, वेसाटोगो
‘ग्रामिक’च्या माध्यमातून मार्केटची माहिती
ग्रामिक ॲपच्या माध्यमातून मार्केटची माहिती देण्यात येते. त्याचा वापर करीत व्यापाऱ्यांना मालाचे बुकिंग करता येते. त्यानंतर माल घेऊन जाण्याची कोणती वाहने उपलब्ध आहेत, याची माहिती तेथे पुरवली जाते.
एफपीओ मॅनेजमेंट सिस्टिम
या सिस्टिमअंतर्गत लागवड, शेतमालाची काढणी आणि काढणीनंतरची सेवा पुरविली जाते. मालाची मागणी कशी असेल, मार्केट विश्लेषण, माल कधी काढावा, मालाची काढणी केल्यानंतर त्याची गुणवत्ता कशी टिकवावी, गोदामाचे व्यवस्थापक, मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेले छोटे-मोठे मार्केट, ग्राहक आणि वेंडर, मालाचे वितरण व व्यवस्थापन करण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येते.
स्टार्टअपची व्याप्ती...
१२,००० हून अधिक शेतकरी कनेक्ट
५०,००० हून अधिक मालवाहतुकीच्या यशस्वी फेऱ्या
१२०० टनाहून अधिक दररोजची मालवाहतूक
५०० हून अधिक दररोजच्या ऑर्डर
३० लाखांहून अधिक रोजची विक्री
३०,००० विविध व्यापाऱ्यांची नोंदणी
Web Title: Vesatogo Develops Agro Business
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..