प्रतिकूल हवामानाचा द्राक्ष बागांना फटका

grapes
grapes
Updated on

जालना -  वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या कडवंची येथील द्राक्ष उत्पादनाची वाट यंदा प्रतिकूल हवामानामुळे अवघड बनली आहे. डाऊनी, घडकूज तसेच मणी क्रॅकिंगच्या समस्येमुळे द्राक्ष उत्पादन संकटात सापडले आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमधील पावसाने बागा जगल्या, पण उत्पादनात मोठा फटका बसल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. 

जालना जिल्ह्यातील कडवंची शिवार म्हणजे द्राक्षाचे आगार. या आगाराला यंदा प्रतिकूल हवामानामुळे फटका बसला आहे. तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या कडवंची शिवारातील द्राक्ष उत्पादकांना यंदाचा हंगाम सुरुवातीपासून अडचणीचा ठरला. साधारणपणे कडवंचीसह धारकल्याण, पिरकल्याण, नाव्हा, वरुड, वडगाव, वखारी आदी शिवारांमध्ये जवळपास दीड हजार एकरांवर द्राक्ष बागा आहेत. यामध्ये दरवर्षी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये बागांची छाटणी करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांची संख्या सुमारे ६० टक्‍क्‍यांपर्यंत असते. यंदा १५ ऑक्‍टोबरपूर्वी छाटणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागा हातच्या गेल्या. अशा स्थितीतही काही शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवरही मात करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. परंतू उत्पादनात मोठी घट येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  

१५ ऑक्‍टोबरपूर्वी छाटणी केलेल्या बागांमध्ये डाऊनी व घडकूज मोठ्या प्रमाणात आल्याने बागा संपल्या. २५ ऑक्‍टोबर ते नोव्हेंबरदरम्यान छाटणी केलेल्या बागा बऱ्या स्थितीत असल्या तरी अलीकडे होत असलेला पाऊस व पुन्हा निर्माण होणारे प्रतिकूल हवामान द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ करीत आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या तुरळक पावसामुळे द्राक्ष बागांना दहा ते पंधरा टक्‍के फटका बसला. असेच प्रतिकूल हवामान कायम राहिल्यास उत्पादनाची आशा असलेल्या बागांमधील नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. शिवारातील द्राक्षांना व्यापाऱ्यांकडून २० ते ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर दिला जात आहे. टिचक्‍या मण्यांचे प्रमाण वाढल्याने दराचा मोठा फटका बसला आहे. यंदा उत्पादनात फटका बसला असला तरी ऑक्‍टोबरमध्ये आलेल्या अवेळी पावसामुळेच पाण्याची उपलब्धता झाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे हवामानाने साथ दिल्यास ऑक्‍टोबरअखेर व नोव्हेंबरमधील छाटणीच्या बागांपासून उत्पादनाची आशा आता द्राक्ष उत्पादकांना आहे. 

यंदा कडवंचीसह आसपासच्या शिवारातील ५० टक्‍के बागा हातच्या गेल्या. माझ्या सात एकरावरील उत्पादनक्षम बागेपैकी २ एकरवरील अर्ली छाटणी केलेल्या बागेत द्राक्ष नाहीत. १० ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान छाटणी केलेल्या ३ एकरांत केवळ १२५ क्‍विंटल द्राक्ष उत्पादन निघाले. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये छाटणी केलेल्या दोन एकर बागेतून उत्पादनाची आशा आहे, पण पुन्हा प्रतिकूल हवामानाचे संकट येते की काय अशी स्थिती आहे. 
— चंद्रकांत क्षीरसागर, सरपंच, द्राक्ष उत्पादक शेतकरी,  कडवंची, जि. जालना. 

यंदा प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष उत्पादनाची वाट अवघड आहे. घडकूज, डाऊनीने बागा संपविल्या. मणी क्रॅकिंगही वाढले आहे. उत्पादन घटले, शिवाय दरही कमीच मिळताहेत. 
— विष्णू क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com