दर्शन घ्यावया आलो देव बंदिस्तच! श्री क्षेत्र पद्‌मालयला संकष्टी चतुर्थीला भाविकांची भावना 

padamalya tempal.jpg
padamalya tempal.jpg

एरंडोल ः राज्यात आजपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळही खुली होतील, या आशेने श्रीक्षेत्र पद्‌मालय येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केली. मात्र, मंदिर बंदच असल्याचे समजल्यावर त्यांचा हिरमोड झाला. प्रशासनाकडून याबाबत पूर्वसूचना मिळणे गरजेचे आहे, अशा भावना भाविकांनी व्यक्‍त केल्या. 
सध्या देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असल्यामुळे सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. आजपासून धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येतील, असे सुरवातीला जाहीर करण्यात आले होते. मात्र, नंतर या निर्णयात पुन्हा बदल झाला व धार्मिक स्थळे बंदच राहतील असे राज्यशासनाने जाहीर केले. मात्र, मंदिर खुली होतील, या आशेने संकष्टी चतुर्थीला आज भाविक श्रीक्षेत्र पदमालय येथे गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. मात्र, मंदिर प्रशासनाने मंदिराचा मुख्य दरवाजा न उघडल्यामुळे भाविकांना गणपतीचे दर्शन घेता आले नाही. विशेष म्हणजे भाविकांना माहिती देण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा एकही पदाधिकारी याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

चतुर्थी असल्यामुळे राज्यातून दूरवरून भाविक पदमालय येथे गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना मुख्य दरवाजाच्या बाहेरूनच गणपतीचे दर्शन घ्यावे लागले. सुमारे तीन महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे या ठिकाणी असलेले सर्व व्यवसाय बंद झाले आहेत. व्यवसाय बंद असल्यामुळे व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

मोरांचा मुक्‍तसंचार 
श्रीक्षेत्र पद्‌मालय परिसरात मोरांचा मुक्त संचार दिसून आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गणपतीचे दर्शन झाले नाही. मात्र, या परिसरात असलेल्या मोरांचा मुक्त संचार पाहता आला. अनेकांनी मोरांचे छायाचित्र काढले. लहान बालक मोरांच्या अवतीभोवती जमा होऊन आनंद लुटत होते. मोरांच्या आवाजाने परिसरात वेगळाच आनंद मिळत होता. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे कायम हिरवेगार असलेले मंदिर परिसरातील डोंगर ओसाड दिसत होते. मंदिराबाबत माहिती घेण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचे भ्रमणध्वनी बंद होते. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com