esakal | खरिपाच्या विम्यापोटी नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 12 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

12 crore in the account of farmers in Nevasa taluka for kharif crop insurance

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कपाशीसाठी तालुक्‍यातील सर्व सर्कलमधील 10 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर सुमारे 12 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत.

खरिपाच्या विम्यापोटी नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 12 कोटी

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कपाशीसाठी तालुक्‍यातील सर्व सर्कलमधील 10 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर सुमारे 12 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. 

काही दिवसांपूर्वी रब्बी हंगामातील (2018 व 2019) पीकविम्याचे चार कोटी 17 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा झाले आहेत. त्यापाठोपाठ आता ही रक्कम मिळाली. दोन्ही मिळून तालुक्‍यासाठी एकूण सव्वासोळा कोटींचा पीकविमा मिळवून देऊन मंत्री गडाख यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

मागील खरीप हंगामातील पीकविम्याचा लाभ तालुक्‍यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा व कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी मंत्री गडाख यांनी जिल्हा बॅंक व्यवस्थापनास सूचना करून बॅंकेचे कामकाज सुटीच्या दिवशी, तसेच कामकाजाच्या दिवशी वाढीव वेळेत सुरू ठेवले होते. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध झाल्याने तालुक्‍यात समाधान व्यक्त होत आहे. 

नवीन चांडगाव येथील शेतकरी विष्णू उंदरे म्हणाले, मंत्री शंकरराव गडाख यांनी अडचणीच्या काळात तालुक्‍यातील शेतकरी व नागरिकांना नेहमीच मदत केली आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत आर्थिक अडचण असताना, त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला. 

संपादन : अशोक मुरुमकर