शेवगाव-पाथर्डी पोलिस पाटलांविना

राजेंद्र सावंत 
Friday, 22 January 2021

पाथर्डी तालुक्‍यात 130 पोलिस पाटलांचे पदे मंजूर आहेत. त्यापैकी 24 गावांत पोलिस पाटील कार्यरत आहेत, तर 106 गावांतील पाटलांच्या जागा रिक्त आहेत.

पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील 239 पोलिस पाटलांच्या जागा मंजूर आहेत. अनेक वर्षांपासून जागा रिक्त असल्याने, दोन्ही तालुक्‍यातील गावचा कारभार केवळ 54 पाटील सांभाळत आहेत. 185 जागा रिक्त आहेत. गावातील वाद, अवैध व्यवसाय व इतर माहिती पोलिसांना पुरविणारे पोलिस पाटील नसल्याने पोलिस यंत्रणेवरील ताणही वाढत आहेत. रिक्त जागा भरण्याची मागणी दोन्ही तालुक्‍यांतून होत आहे. 

जनतेला दिलेला शब्द पाळणार : मंत्री तनपुरे 

पाथर्डी तालुक्‍यात 130 पोलिस पाटलांचे पदे मंजूर आहेत. त्यापैकी 24 गावांत पोलिस पाटील कार्यरत आहेत, तर 106 गावांतील पाटलांच्या जागा रिक्त आहेत. शेवगाव तालुक्‍यात 109 जागा असताना, अवघे 30 गावात पाटील आहेत. 79 गावांतील पदे रिक्तच आहेत. गावातील खडान्‌खडा माहिती पोलिसांना देणारा गावातील प्रमुख म्हणजे पोलिस पाटील. पूर्वी पोलिस पाटलांचा रुबाब खूप असायचा. पोलिसांच्या थेट संपर्कातला माणूस म्हणून गावात पाटलांचा दबदबा असायचा. गावातील अनेक दाखले देण्याचा अधिकार आजही पोलिस पाटलांना आहे. स्थानिक चौकशीत पाटलांची भूमिका पोलिस व महसूल प्रशासनाला मदत करणारी असते. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्याने पोलिसांची स्थानिक गावपातळीची माहिती पोलिसांना मिळत नाही. 

महिला व बालकल्याणच्या सभापतीपदी ज्योती तनपुरे

शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यांत 239 पोलिस पाटलांच्या जागा मंजूर आहेत. 54 जागांवर पोलिस पाटील कार्यरत आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले आहेत. सरकारचा आदेश येताच, जागा भरल्या जातील. 
- देवदत्त केकाण, प्रांताधिकारी, पाथर्डी-शेवगाव 

पाथर्डी तालुक्‍यातील पोलिस पाटलांच्या 106 जागा तातडीने भराव्यात. तेथे स्थानिकांना रोजगार मिळेल व गावात कायदा-सुव्यवस्था राहण्यास मदत होईल. पोलिस पाटलांमुळे पोलिसांना मदतच होईल. 
- अकुंश चितळे, शिवसेना तालुकाप्रमुख, पाथर्डी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 239 police posts have been sanctioned in Pathardi and Shevgaon talukas