डाळिंबउत्पादकांना तीन कोटी 61 लाखांचे अनुदान : विखे 

सतीश वैजापूरकर
Monday, 14 December 2020

शिर्डी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्‍यातील गावांसह एकूण 480 हेक्‍टर क्षेत्रावरील डाळिंबबागांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

राहाता : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील 646 डाळिंबउत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून 3 कोटी 61 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ""सन 2019-20 या वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शिर्डी मतदारसंघात डाळिंबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी, वादळी पावसाने पिके जमीनदोस्त झालेल्या या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या डाळिंबउत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ लवकर मिळावा, यासाठी आपण कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. 

हेही वाचा - अवकाळीचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका

शिर्डी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्‍यातील गावांसह एकूण 480 हेक्‍टर क्षेत्रावरील डाळिंबबागांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, विमा रकमेसाठीचे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आले होते. 

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत शिर्डी मतदारसंघातून 646 शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले होते. या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होईल.

डाळिंबउत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी विविध संकटांचा सामना करावा लागला. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर, या मंजूर झालेल्या विमा रकमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 crore 61 lakh subsidy to pomegranate growers