कोणीच मागेना शेततळे ! नेवाशात अर्ज आले साडेपाच हजार ; शेततळी झाली 827

सुनील गर्जे
Thursday, 10 December 2020

भाजप-शिवसेना सरकारने 2016 मध्ये 'मागेल त्याला शेततळे' ही योजना मोठा गाजावाजा करीत आणली. या योजनेत नेवासे तालुक्‍याला वर्षाला 325 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने 5782 शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे अर्ज केले.

नेवासे (अहमदनगर) : भाजप सरकारने 'मागेल त्याला शेततळे' योजना सुरू केली होती. त्यासाठी 50 हजार रुपये अनुदानही देण्यात येते. मात्र, शेततळ्यासाठी साधारण एक लाखाहून अधिक खर्च येतो. त्यामुळे अर्ज करूनही अनेक शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.

हे ही वाचा : मुळातील गाळ काढण्याच्या हालचाली ; जलसंपदा विभागाकडून समिती स्थापन, अहवाल तयार करण्याची सूचना
 
भाजप-शिवसेना सरकारने 2016 मध्ये 'मागेल त्याला शेततळे' ही योजना मोठा गाजावाजा करीत आणली. या योजनेत नेवासे तालुक्‍याला वर्षाला 325 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने 5782 शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे अर्ज केले. त्यांना ऑनलाइन मंजुरीही मिळून 1091 शेततळ्यांना कार्यारंभ आदेशही दिले. शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले; परंतु कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले नाहीत. तसेच 4956 पैकी केवळ 827 शेतकऱ्यांनी शेततळी खोदली. त्यांतील 644 शेतकऱ्यांना जवळपास 3 कोटी 12 लाख 35 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडून देण्यात आले. अजून 182 शेतकऱ्यांचे 87 लाख 79 हजार रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. 

हे ही वाचा : 62 हजारांचा गुटखा आश्‍वी बुद्रुकमध्ये जप्त

शेतकऱ्यांना या योजनेतून कमाल 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असले, तरी लागणारा खर्च एक लाखापेक्षा अधिक असल्याने अनेकांनी योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसते. दरम्यान, उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या नेवासे तालुक्‍यात 2016 ते 20 दरम्यान 800 पेक्षा अधिक शेततळी झाली. त्यामुळे तालुक्‍यातील कोरडवाहू क्षेत्रात फळबाग लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

गेल्या वर्षी शेततळे खोदण्यासाठी कार्यारंभ आदेश मिळाला. त्यानंतर हातउसने पैसे, तसेच कर्ज काढून शेततळी खोदली; परंतु आजवर अनुदान मिळालेले नाही. शासनाने या योजनेसाठी एक ते दीड लाखापर्यंत अनुदान द्यावे. 
- विमल अरुण आरगडे, शेतकरी, नेवासे 

30 बाय 30 मीटर शेततळ्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 87 हजार 737 रुपये आहे. जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान देय आहे. सध्या 'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी तात्पुरती थांबविली आहे; मात्र अर्जप्रक्रिया लवकरच पूर्ववत होईल. 
- दत्तात्रेय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे 

 
नेवाशातील शेततळ्यांचा लेखाजोखा 

वर्ष............शेततळे पूर्ण...... वितरित निधी 
2016-18........299............1 कोटी 43 लाख 
2018-19........152...............74 लाख 
2019-20.........193..........95 लाख 35 हजार 
2020-21.........183...... (अनुदान प्रलंबित)

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 thousand 500 applications have been received for shettale in Newase