रोहित पवार यांच्या आमदार निधीतून कर्जतला अत्याधुनिक रुग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance

आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.

रोहित पवार यांच्या आमदार निधीतून कर्जतला अत्याधुनिक रुग्णवाहिका

कर्जत (अहमदनगर) : येथील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्यविभाग आणि स्थानिक प्रशासन जीव ओतून काम करत आहे. आ.पवार यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आरोग्यासाठी मतदारसंघात गरजेनुसार जम्बो कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे. या सेंटरमध्ये अनेक रुग्णांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या सेंटरसाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा वेळेत मिळवण्यासाठी त्यांच्याकडूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: होम क्‍वॉरंटाईन व्हावे लागल्याने महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्यशासनाकडून आरोग्य सुविधांकडे लक्ष दिले जात आहे. रुग्णांना तात्काळ सुविधा मिळाव्यात, त्यांना अत्यावश्यक उपचारासाठी घेऊन जाणे, त्यांना उपचाराच्या ठिकाणाहून पुन्हा घेऊन येणे शक्य व्हावे, यासाठी ही रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहे. याअगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने कर्जत व जामखेडसाठी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. आता आमदार फंडातून आ. पवारांनी ही तिसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे. १०८ आणि १०२ या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिकेसोबतच ही रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचणार आहे.

हेही वाचा: पोलिस पथकाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-यांविरोधात केली कारवाई

कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यशासनाने प्रत्येक मतदारसंघातील आमदारांसाठी आरोग्यावर खर्च करण्यासाठी ठराविक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र आरोग्य विभाग गतिमान व्हावा आणि प्रत्येक गरजू रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपेक्षा अधिक निधी मतदारसंघातील आरोग्यसेवेसाठी खर्च केला आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून हे माझे कर्तव्य आहे.

- आमदार रोहित पवार, कर्जत जामखेड

Web Title: A State Of The Art Ambulance Has Been Started For Karjat From Mla Rohit Pawars Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagarmla fund
go to top