esakal | राहुरी दातीर हत्या प्रकरण : मुख्य आरोपीस बेड्या; एक आरोपी अद्याप फरार

बोलून बातमी शोधा

Rahuri Datir murder
राहुरी दातीर हत्या प्रकरण : मुख्य आरोपीस बेड्या; एक आरोपी अद्याप फरार
sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

राहुरी (अहमदनगर) : शहरातील एका साप्ताहिकाचे पत्रकार दातीर यांचे अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) याला सोमवारी राहुरी न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप पसार आहे. त्याचा पोलिस पथके शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

यापूर्वी पकडलेले लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी (रा. राहुरी) व‌ तौफिक मुक्तार शेख (वय २१, रा. राहुरी फॅक्टरी) या आरोपींची पोलिस कोठडी मंगळवारी संपणार आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदतवाढ मागितली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर मंगळवारी (ता. ६) दुपारी सव्वा बारा वाजता पत्रकार रोहिदास राधुजी दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) यांचे अपहरण करून, त्यांची हत्या करण्यात आली. मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर एका मोकळ्या प्लॉटमध्ये टाकण्यात आला. गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जीप (एमएच १७ एझेड ५९९५) तेलकुडगांव (ता. नेवासा) येथून पोलिसांनी ताब्यात घेतली.

म्हैसगांव परिसरातील जंगलात पाठलाग करून पोलिसांनी लाल्या उर्फ अर्जुन माळी याला अटक केली होती. त्याचा साथीदार अक्षय कुलथे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. तो अद्याप सापडला नाही. तिसरा आरोपी तौफिक शेख याला विंचूर (ता. निफाड, जि. नाशिक) येथे पोलिसांनी अटक केली होती.

मुख्य आरोपीचे वेषांतर !

घटनेनंतर बारा दिवस मुख्य आरोपी मोरे पसार होता. रविवारी रात्री साडेआठ वाजता नेवासा येथे औरंगाबाद रस्त्यावरील गुरुदत्त हॉटेल जवळ पोलिसांनी सापळा लावून आरोपी मोरे याला अटक केली. आरोपी मोरे याने पोलिसांना चकवा देण्यासाठी वेषांतर केले होते. कायम पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राहणार या मोरे याने निळा शर्ट व पॅन्ट घातली होती. वर्षानुवर्ष वाढवलेली दाढी काढून टाकली होती.

राजकारण शिगेला..!

घटनेनंतर राजकारण ढवळून निघाले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट हल्लाबोल करून, शहरातील अठरा एकर जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप केला. राज्यमंत्री तनपुरे यांनी सर्व आरोप खोडून काढले. "कर्डिले यांच्याकडे पुरावे असल्यास पोलिसांकडे द्यावेत." खुले आव्हान मंत्री तनपुरे यांनी दिले. माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार दातीर यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राजकारण शिगेला पोहोचले.

दरम्यान, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने राजकीय वातावरण काही अंशी शांत झाले आहे.