esakal | छोटे मासे गळाला, मोठ्यांचे काय? नगर जिल्हा परिषदेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Action against late employees of Nagar Zilla Parishad

कोरोनामुळे जिल्हा परिषदेतील बायोमॅट्रिक हजेरी बंद करण्यात आली. त्याचा फायदा घेत, कर्मचाऱ्यांकडून उशिरा येणे व लवकर घरी जाणे, असे प्रकार सुरू झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या लक्षात आले.

छोटे मासे गळाला, मोठ्यांचे काय? नगर जिल्हा परिषदेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : कोरोनामुळे जिल्हा परिषदेतील बायोमॅट्रिक हजेरी बंद करण्यात आली. त्याचा फायदा घेत, कर्मचाऱ्यांकडून उशिरा येणे व लवकर घरी जाणे, असे प्रकार सुरू झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या लक्षात आले. त्यानंतर मस्टरची अचानक तपासणी करून लेट लतिफांचा अहवाल करून तो संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आला. कर्मचाऱ्यांप्रमाणेच अधिकारीही उशिरा येत असून, लवकर जात आहेत. त्यांची हजेरीही तपासण्याची मागणी होत आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरी बंद केली आहे. त्याचा फायदा घेत, अनेक जण कार्यालयात उशिरा येत व लवकर घरी जात होते. ही बाब सामान्य प्रशासन विभागाच्या लक्षात आल्यानंतर, अचानक बुधवारी (ता.14) सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची हजेरी तपासणी करण्यात आली. त्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार करून, सर्व विभागप्रमुखांना पाठवून तीन वेळा उशिरा येणाऱ्यांचे एक दिवसाचे विनावेतन रजा करण्याचे सामान्य प्रशासनाने सूचित केले.

कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्हा परिषदेतील काही अधिकारीही नेहमीच उशिरा येतात. त्यामुळे अनेकदा अधिकाऱ्यांची वाट पाहात अभ्यागत व कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे प्रशासनाने सर्व विभागाच्या प्रमुखांची हजेरी तपासावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थिती लावून, खासगी कामे करण्यासाठी बाहेर जातात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जादा कामाचा मोबदला द्यावा
कार्यालयात जास्त काम असल्याने, अनेक विभागातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत अन्‌ सुटीच्या दिवशी कार्यालयात येऊन कामे करतात. त्यांच्याकडून हे सर्व काम विनातक्रार होत आहे. या बदल्यात ते ना मोबदला मागतात, ना बदली सुटी. प्रशासनाने जादा कामाचा मोबदला या कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी मागणी होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर