
अर्थात दोन्ही अधिकारी नवे असल्याने, या कारवाया काही काळापुरत्याच मर्यादित राहू नयेत, याची काळजी सामाजिक कार्यकर्त्यांना आहे. येथील महसूल विभाग व पोलिस दलात जूने लोक आहेत.
श्रीगोंदे : तालुक्यासह शेजारील जिल्ह्यांतील वाळूचोरांनी भीमा-घोड नद्यांची चाळण केली. अजूनही शिल्लक वाळूवर डोळा ठेवून असणारे वाळूचोर बिनधास्त नद्यांचे वस्त्रहरण करीत आहेत. गेल्या काही दिवसांत महसूल पथकासोबतच पोलिसही वाळूचोरांच्या मागे लागले असून, कारवाया सुरू झाल्या आहेत. नवे अधिकारी आल्याने कारवायांची स्पर्धाच रंगली आहे. दुसरीकडे वाळूचोरांनीही पुन्हा उभारी धरण्यासाठी "कार्ड' सुरू करा, ते वाढवून देतो, असा चंग बांधत फिल्डींग लावली आहे.
तालुक्यातील भीमा व घोड नद्यांची चाळण करणाऱ्या वाळूचोरांनी आता त्यांचा मोर्चा गावातील ओढ्या-नाल्यांकडे वळविला आहे. दुसरीकडे नदीत बोटी टाकून बिनधास्त वाळूउपसा सुरू असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. तालुक्यातील काही लोक यात सामील असले, तरी शिरूर, दौंड येथील वाळूचोरही श्रीगोंद्याच्या हद्दीत वाळूचोरीचा गोरखधंदा बिनधास्तपणे करतात.
हेही वाचा - भाजपला जबर हादरा, दोन मातब्बर नेते काँग्रेसमध्ये
तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्यासोबतच येथे रामराव ढिकले हे नवे पोलिस निरीक्षक आले. दोघांनीही वाळूचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी छापासत्र सुरू केल्याचे दिसते. म्हसे येथील बहुचर्चित वाळूचोरीचा अड्ड्यावर तहसीलदार पवार यांनी छापा घातला. या परिसरात अगोदर बेलवंडी पोलिसांनीही कारवाई केली होती. श्रीगोंदे पोलिसांनीही काही ठिकाणी कारवाया करीत, वाळूचोरांना धंदे बंद करण्याचा इशारा दिला आहे.
अर्थात दोन्ही अधिकारी नवे असल्याने, या कारवाया काही काळापुरत्याच मर्यादित राहू नयेत, याची काळजी सामाजिक कार्यकर्त्यांना आहे. येथील महसूल विभाग व पोलिस दलात जूने लोक आहेत. त्यामुळे त्यातील काहींचे वाळूचोरांशी जिव्हाळ्याचे संबंध असू शकतात.
कारवायांची मालिका अशीच सुरू राहिल्यास वाळूचोरीला अंकुश बसू शकेल.
दरम्यान, वाळूचोरांनीही धंदा बंद करणार नाही. "कार्ड' वाढवून देवू; पण धंदा करूच, अशी शपथच घेतल्याचे चर्चा आहे. कार्ड हा वाळूचोरांचा व प्रशासनाचा कोडवर्ड आहे. कार्ड म्हणजे हप्ता, असे समजले जाते. त्यासाठी काही बड्यांनी महसूल व पोलिस ठाण्याभोवती फिल्डींग लावली आहे. काहींनी राजकीय मंडळींसोबत साहेबांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाळूचोरांचा फास आवळणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
अहमदनगर
वाळूचोरी बंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविणार आहोत. त्यासाठी पोलिसांसोबत संयुक्त नियोजन करणार असून, आपल्या काळात वाळूचोरी बंद करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.
- प्रदीपकुमार पवार, तहसीलदार