esakal | रेमडेसिव्हिरचा अतिरेक नको : जमधडे
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir Injection

रेमडेसिव्हिरचा अतिरेक नको : जमधडे

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी काही अंशी प्रभावी ठरलेले रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आपल्या नातेवाईक रुग्णालाही देण्याचा अनेकांचा आग्रह असतो. त्यासाठी रुग्णालयात डॉक्‍टरांकडे आग्रह केला जातो. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर होतो. त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमधडे यांनी केले. डॉ. जमधडे श्रीरामपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : महापालिकेने लावले दिवे! बंद पथदिव्यांमुळे नागरिक झाले त्रस्त

पुढे जमधडे म्हणाले, कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन प्रभावी ठरत असले, तरी ते कोणत्या रुग्णांना द्यावे, याबाबत राज्य शासनासह "आयसीएमआर'ने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आरटीपीसीआर तपासणीत कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची ऑक्‍सिजनची पातळी, तसेच रुग्णाची परिस्थिती पाहून त्याला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन देण्याचा निर्णय संबंधित डॉक्‍टर घेऊ शकतात. "कोरोना चाचणी न करता केवळ एचआरसीटी तपासणीच्या आधारे किंवा कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांनादेखील हे इंजेक्‍शन देण्याचा आग्रह अनेकदा केला जातो. कोरोनाची लक्षणे नसलेले, अथवा सौम्य लक्षणे असलेले; मात्र शरीरातील ऑक्‍सिजन पातळी चांगली असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन देण्याची फारशी गरज नसते. त्यामुळे नातेवाईकांनी, तसेच संबंधित डॉक्‍टरांनीदेखील सरकारसह "आयसीएमआर'च्या सूचनांचे पालन करूनच रेमडेसिव्हिरचा वापर करणे बंधनकारक आहे,'' असे ते म्हणाले.

हे ही वाचा : जामखेडची "ऑक्‍सिजन' लेव्हल घटली; 425 रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली धाकधूक

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन रुग्णाला दिले म्हणजे रुग्ण तत्काळ बरा होईल, असा अनेकांचा समज आहे. मात्र, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन हा कोरोना संसर्गावरील एकमेव उपाय नसून, केवळ उपचाराचा एक भाग आहे. त्यामुळे हे इंजेक्‍शन मिळाले तरच आपला रुग्ण बरा होईल, असा विचार करणे चुकीचे आहे.

- डॉ. रवींद्र कुटे, राज्य उपाध्यक्ष, आयएमए