esakal | दहावी निकालानंतर कनिष्ठ महाविद्यालयांची होणार दमछाक! तुकड्या व शिक्षक वाचविण्यासाठी धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

10th result

दहावी निकालानंतर कनिष्ठ महाविद्यालयांची होणार दमछाक!

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : जिल्ह्याचा दहावीचा निकाल गेल्या अनेक वर्षांनंतर उत्कृष्ट लागूनही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावीसाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ येणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी मंजूर असलेल्या विद्यार्थिसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले असले तरी अकरावीला विद्यार्थ्यांची संख्या कमी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (after-ssc-result-Junior-colleges-admission-jpd93)

‘कनिष्ठ’ची होणार दमछाक

जिल्ह्यात ४३७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या कला, वाणिज्य, संयुक्त, विज्ञान शाखा आहेत. या विविध शाखांच्या जिल्ह्यात ८४८ तुकड्या मंजूर आहेत. या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ७० हजार ५६६ नियमित विद्यार्थी, तसेच २ हजार ५१६ पुनर्परीक्षार्थी असे एकूण ७३ हजार ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी ७० हजार ८५९ विद्यार्थ्यांची आवश्‍यकता असली, तरी ही संख्या गाठताना महाविद्यालयांची कसरत होणार आहे. कौशल्य विकासासाठी सुमारे २५००, आयटीआयसाठी दोन हजार, पदविकांसाठी दोन हजार, तसेच ५०० विद्यार्थी जिल्ह्याबाहेरील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याने, विद्यार्थी शोधमोहीम हाती घ्यावी लागणार आहे. तुकड्या व शिक्षक वाचविण्यासाठी महाविद्यालयांना धडपड करावी लागणार आहे.

शहरांमध्येच होणार प्रवेश परीक्षा काटेकोर

शहरात व नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा काटेकोर घेतली जाणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी परीक्षा जास्त गांभीर्याने घेण्याऐवजी सवलतीत घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकरावी प्रवेशाबरोबरच इतर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यामुळे अकरावीला विद्यार्थिसंख्या कमी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची ओढाताण होण्याची शक्यता आहे. - सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ

कनिष्ठ महाविद्यालये ः ४३७

कला शाखेच्या तुकड्या ः ३०७

विद्यार्थिसंख्या ः २५,५२९

विज्ञान शाखेच्या तुकड्या ः ३८१

विद्यार्थिसंख्या ३१,४१०

वाणिज्य शाखेच्या तुकड्या ः १३६

विद्यार्थिसंख्या ः ११,८४०

संयुक्त शाखा तुकड्या ः २४

विद्यार्थिसंख्या ः २०८०

हेही वाचा: राज्यात नगरचा ‘क्राइम रेट’ सर्वाधिक : पोलिस अधीक्षक पाटील

हेही वाचा: दाखल्यांवर मिळेना अधिकाऱ्याचा शिक्का; चकरा मारून जनता त्रस्त

loading image