
शेतकऱ्यांचा विकास, त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी, तसेच शेती क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी कृषी शिक्षण सर्वांना मिळणे गरजेचे आहे.
राहुरी (अहमदनगर) : शेतकऱ्यांचा विकास, त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी, तसेच शेती क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी कृषी शिक्षण सर्वांना मिळणे गरजेचे आहे. सध्या अनेक शेतकरी विद्यापीठास भेटी देऊन नवनवीन संशोधनाबाबत माहिती घेताना दिसून येत आहेत.
तसेच, विद्यार्थ्यांनाही कृषी विषयाबद्दलचे शिक्षण अनिवार्य आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात ऑनलाइन कृषी शिक्षण दिन साजरा झाला. त्या वेळी ते बोलत होते. सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, जितेंद्र मेटकर उपस्थित होते.
डॉ. फरांदे म्हणाले, ""शेतकरी शिकला, विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान त्याने मिळविले, तर त्यांची प्रगती नक्कीच आहे. विद्यापीठाचे मुख्य ध्येय कृषी शिक्षण असून, सहा दशकांपासून विद्यापीठाचे कृषी शिक्षणाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आजच्या युवकांचा कृषी शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. देशभरात 65 टक्के लोक शेती क्षेत्राशी निगडित व्यवसायांमध्ये आहेत. डॉ. रसाळ यांनी "कृषी शिक्षणानंतरच्या आमूलाग्र संधी' या विषयावर माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत काळे यांनी केले.
संपादन : अशोक मुरुमकर