esakal | Ahmednagar : काउंट डाऊन... प्रतीक्षा संपतेय!
sakal

बोलून बातमी शोधा

nagar

Ahmednagar : काउंट डाऊन... प्रतीक्षा संपतेय!

sakal_logo
By
मुरलीधर कराळे

अहमदनगर : शहरातील वाहनांचा खुळखुळा अन्‌ नागरिकांची हाडे खिळखिळी करणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दहा कोटी, तर भुयारी गटारांसाठी १२५ कोटींचा निधी तयार आहे. त्यांपैकी रस्त्यांची सुमारे सात कोटींची कामे सुरू असून, तीन कोटींची कामेही नियोजनात आहेत. पाऊस उघडताच ही कामे वेगाने सुरू होतील, असे पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

जूनमध्ये पहिला पाऊस झाला आणि नगरकरांचे हाल सुरू झाले. खड्ड्यांची मालिका वाढली. खड्ड्याला खड्डे जोडले गेले. मुसळधार पावसाने तर रस्ते होत्याचे नव्हते झाले. नगरकर हैराण झाले. निधी मंजूर असूनही काही करता येईना, असे पदाधिकारी, अधिकारी सांगू लागले. दुरुस्ती कधी होणार, याबाबत अनिश्‍चितता होती. मात्र, मागील काही दिवासांपासून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू झाली आणि नगरकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. पावसाने खड्डे पुन्हा पूर्ववत झाले. आता पाऊस उघडल्यानंतरच कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाकडून आले. त्यामुळे हे काम सध्या तरी बहुतेक ठिकाणी थांबले आहे किंवा नव्याने सुरू होऊ शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २०, तर महापालिकेच्या माध्यमातून ३० रस्त्यांचे काम होणार आहे.

हेही वाचा: 'छातीवर बसून एफआरपी घेऊ' - राजू शेट्टी

असा आहे निधी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आधी मंजूर झालेला १० कोटींचा निधी होता. तथापि, शहरातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू न झाल्याने तो वापरता येत नव्हता. ज्या ठिकाणी मोठे गटार करण्याची गरज नाही, तेथे मात्र या योजनेतून कामे सुरू झाली आहेत. या योजनेतील तीन निविदांपैकी दोन निविदा मंजूर होऊन सुमारे सात कोटींची कामे सुरू आहेत. उर्वरित एका निविदेवर काम होऊन, तीन कोटींची कामे सुरू होणार आहेत.

भुयारी गटार योजनेसाठी १२५ कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर झालेला आहे. मात्र, ही कामे प्रत्यक्षात सुरू होत नव्हती. आता या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. शासनाकडून निधीच्या उपलब्धतेनुसार कामे सुरू होतील.

अशी होणार कामे

  1. रस्ता खोदल्यानंतर आतील विविध प्रकारच्या केबलची दुरुस्ती होणार

  2. पिण्याच्या पाण्याचे नळ तुटल्यास त्यांची नव्याने जोडणी

  3. सांडपाणी, स्वच्छतागृहांचे कनेक्‍शन थेट मुख्य गटार योजनेला जोडणार

  4. ही मुख्य गटारे सीना नदीपात्रातून थेट फराहबाग येथील प्रक्रिया केंद्राला जोडणार

  5. प्रक्रिया केंद्रात खत बाजूला होईल, तर पाणी शेती योग्य असेल.

अनेक वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम बाकी असल्याने रस्तेदुरुस्तीला अडथळे येत होते. आता ही सर्व कामे होणार आहेत. सध्या अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. लवकरच शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होऊन चांगले रस्ते तयार होतील.

- संग्राम जगताप,

आमदार

हेही वाचा: श्रीगोंदे : रिक्त पदांमुळे महावितरणमध्येच अंधार

शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून भुयारी गटार, तसेच रस्त्यांची कामे वेगात करण्याचे नियोजन केले आहे. नगरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच गटारीसह रस्त्यांचीही समस्या दूर होतील.

- रोहिणी शेंडगे,

महापौर

पाऊस थांबेल तशी कामेही होतील. भुयारी गटार योजनेचे काम पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर होईल. गटारांसाठी रस्ते खोदावेच लागणार आहेत. त्यादरम्यान नागरिकांची थोडी गैरसोय होईल, मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

- सुरेश इथापे, शहर अभियंता

loading image
go to top