Leopard : नगर जिल्ह्यात बिबट्याची मोठी झेप ; दोन वर्षांत ३७ हल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Leopard : नगर जिल्ह्यात बिबट्याची मोठी झेप ; दोन वर्षांत ३७ हल्ले

अहमदनगर : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षात एका व्यक्तिला प्राण गमवावे लागले तर ३६ जण जखमी झाले आहेत. यातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची तर जखमी झालेल्या ३६ जणांना १५ लाख ३४ हजार ६५० रुपयांची नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. दोन वर्षात तब्बल ३८ जणांवर बिबट्याने मनुष्यवस्तीवर येत हल्ले केले आहेत.

जिल्ह्यामध्ये राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे व श्रीगोंदे या तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्यांसह वन्य प्राण्यांची संख्यादेखील या तालुक्यांमध्ये जास्त आहे. मागील काही दिवसांपासून बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले व पशुधनातील जखमींची संख्या वाढली आहे. बिबट्या, तरस आणि रानडुकरांच्या हल्ल्यात मनुष्यहानी किंवा दुखापत झाल्यास भरपाई दिली जाते. एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वारसांना १५ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. किरकोळ जखमीला २० हजार ते सव्वा लाख रुपये भरपाई दिली जाते. त्यांना १५ लाख ३४ हजार ६५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. २०२१-२२ मध्ये ८३९ पाळीव जनावरे ठार झाले. त्या बदल्यात ५६ लाख ५७ हजार रुपये भरपाई देण्यात आली. सप्टेंबबर २०२२ अखेर ४९८ जनावरे दगावली आहेत. त्या बदल्यात ३९ लाख ६५ हजार रुपये भरपाई देण्यात आली आहे.

बिबट्या आढळल्यास हे करा

बिबट्या आढळून आल्यास पाहण्यासाठी गर्दी करू नये. दगड मारून पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये, मोबाईलने फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा शेतात बिबट्यांची किंवा रानमांजरांची पिले सापडतात. रानमांजर व बिबट्याची पिल्ले आढळल्यास त्यांच्या जवळ न जाता शेतातील कामे थांबवावीत. वन विभागास माहिती द्यावी.

अन्यथा गुन्हा

बिबट्याची पिले सापडल्यास त्यांना हाताळू नये किंवा त्यांच्यासोबत फोटो काढू नयेत. त्यांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन केल्यास वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वय हा गुन्हा आहे.

संरक्षणासाठी हे करा

शेतीची कामे सुरू असताना लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा त्यांना शेतीची कामे करत असताना खेळायला मोकळे सोडले जाते. लहान मुलांची उंची व बिबट्याची उंची सारख्या प्रमाणात असल्याने बिबट्या भक्ष्य समजून त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी मुलांना ठेवले जाते, तिथे हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणे करून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. शेतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्ल्यूट्रुथ स्पीकरचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत. शेतीची कामे करत असताना समूहाने काम करावे. एकट्या व्यक्तीने शेतीची कामे करू नयेत. मानेभोवती हातरूमाल किंवा मफलरचा वापर करावा.

जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झाला. ऊसशेतीमध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे बिबट्या व इतर वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात मोकळ्या जागी अथवा मनुष्यवस्तीवर येण्याच्या घटना वाढत आहेत. शेतीमध्ये काम करत असताना बिबट्यासोबत संघर्ष टाळण्यासाठी वन विभागामार्फत आता जनजागृती करण्यात येत आहे.

-सुवर्णा माने, उपवनसंरक्षक

तालुकानिहाय जखमी

१८ कोपरगाव

४ राहुरी

२६ पारनेर

७ पाथर्डी

२ श्रीगोंदे

४ नगर

टॅग्स :AhmednagarattackLeopard