
माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटास त्यांच्या चौंडीसह जामखेड तालुक्यातील अनेक गावांत मतदारांनी नाकारले. आमदार रोहित पवार यांनी तेथे आता चांगलाच जम बसविल्याचे दिसत आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यात मतदारांनी प्रस्थापितांना चांगलेच धक्के दिले. आदर्श गावे हिवरेबाजार व राळेगणसिद्धी येथील बंड अपयशी ठरले. पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार येथे, तर औटी व मापारी गटाने राळेगणसिद्धी येथे सत्ता राखली.
माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटास त्यांच्या चौंडीसह जामखेड तालुक्यातील अनेक गावांत मतदारांनी नाकारले. आमदार रोहित पवार यांनी तेथे आता चांगलाच जम बसविल्याचे दिसत आहे. शेवगावात राष्ट्रवादीचाच वरचष्मा दिसतो. तेथील सात ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले. कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला सर्वाधिक ग्रामपंचायती मिळाल्या. आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी हा मोठा इशारा आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे गटाने एक ग्रामपंचायत राखली.
हे ही वाचा : शिवसेना ५६, राष्ट्रवादी २ तर भाजप ताब्यात १ ग्रामपंचायत ; मुरकूटेंना आत्मपरीक्षणाची गरज
राहुरीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे दिसते. तेथे विखे व कर्डिले गटांना आठ गावांत सत्ता मिळाली. अकोल्यात संमिश्र निकाल लागले. भाजप व महाविकास आघाडीकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. पाथर्डीत भाजपने बाजी मारली. येथे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसते. नेवाशात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला. त्यांचे विरोधक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना फक्त देवगाव ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली.
हे ही वाचा : तीन ग्रामपंचायतींच्या निकालांवर हरकती
राहाता येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला 25 पैकी 23 ग्रामपंचायतींत यश आले. मात्र, लोणी खुर्द येथे सत्तापरिवर्तन झाले. श्रीरामपूरमध्ये अनेक ठिकाणी सत्तापालट झाला. नगर तालुक्यात महाविकास आघाडीचाच वरचष्मा राहिला. काही ठिकाणी सत्तांतर झाले. संगमनेरात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने बाजी मारली. आश्वी गटातही विखे गटाला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली. पारनेर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविल्याचा दावा आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.